रंगपंचमी
या वर्षासाठी न्यूज स्टोरी टुडे या आपल्या वेबपोर्टल साठी नवी सदरे सुचवा, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून निवृत्त माहिती संचालक, समीक्षक श्री सुधाकर तोरणे यांनी सुचविलेले “मी वाचलेले पुस्तक” हे सदर दर मंगळवारी प्रसिध्द करीत आहोत.
श्री तोरणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.
वपु काळे यांनी या पुस्तकाच्या अगदी प्रारंभीच म्हटलं आहे की, माणसावर मनापासून प्रेम करणाऱ्या एका साध्या माणसाचे हे लेखन आहे.
कथाकथनच्या निमित्ताने साध्या माणसावरही जीवापाड प्रेम करणारी असंख्य माणसं त्यांना भेटली. त्यांचे स्वभाव चित्रण त्यांनी या पुस्तकात अत्यन्त मनस्वीपणे केले आहे.
तसे वपुंना मी तरी साधा माणूस मानत नाही. स्वतः आर्किटेक्ट असलेले एक उत्तम लेखक, २८ कथासंग्रह, १२ ललित पुस्तके, ४ कादंबऱ्या, ८ व्यक्ती चित्रासहित वैचारिक पुस्तके त्यांच्या साहित्यसेवेत अनेक पुरस्कारासहित रूजू आहेत.
स्वतः उत्तम लेखक वैशिष्ट्यपूर्ण कथाकथनकार,
हार्मोनियम, व्हायोलिन वादक, कलात्मक फोटोग्राफर, चित्रकार, सुंदर हस्ताक्षर आणि कमालीचे सुंदरतेचे वेड असणारे ते उत्तम रसिक !. तितकेच मनाने सुंदर
असणाऱ्या माणसांचे चाहते. म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुंदर मनांवर आणि विचारावर आधारित असतात.
‘रंगपंचमी‘ या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातल्या छोटया छोट्या प्रसंगांची आणि माणसांच्या व्यक्तिमत्वाची
रसिकतेने घेतलेली बोलकी चित्रेच दिसून येतात. कुठेतरी आपल्या आयुष्यात देखील असं काही घडलं होतं याची वाचकांना मनस्वी साक्ष देतात.
माणसांच्या उत्साही सहभागामुळे व विविध रंग उधळणीमुळे रंगपंचमी साजरी होत असते. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसं, रंगबेरंगी करायला, बहरायला, फुलायला हातभार लावतात.
वपुंच्या ‘रंगपंचमी’ त अशाच माणसांच्या शहाणपणाचे, कधी वेडेपणाचे, कधी उत्साहाचे तर कधी नैराश्याचे निरनिराळे रंग उधळलेले दिसतात, जे आपणास देखील आपल्या अवती भोवती दिसतात. त्यांचे अत्यंत सुबोधपणे कथन वपुंनी केले आहे. काहीसे हसवणारे, काही तर खिन्नता आणणारे प्रसंग वाचकांना विचार करावयास लावतात. जाता जाता मनाशी शल्य भिडवत चटका लावूनही जातात हे या ‘रंगपंचमी’चे वैशिष्ट्य आहे.
विशेषतः प्रत्येक प्रसंगात ‘वपु’पँटर्न’च्या माणसांच्या जीवनावरील सोप्या शब्दातील दाद देणाऱ्या सुभाषितांची ‘रंगपंचमी’त मस्तपैकी रेलचेल आहे. इतकेच नव्हे तर प्रसिद्ध चित्रकार शि.द.फडणीस यांची अनेक प्रसंगातील रेखा चित्रे देखील आहेत. म्हणून वाचकांना हे पुस्तक क्षणभर हसवितांना तसेच विचार करतांना आत्मशोध घेत निश्चितच आवडेल. …!

– समीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अतिशय सुंदर विश्लेषण करून समीक्षण केलें आहे. श्री तोरणे सरांची समीक्षा करण्याची हातोटी फारच छान.
वपु माझेही आवडते. त्यांचे कथाकथन मी प्रत्यक्ष ऐकले आहे. अतिशय छान पुस्तक परिचय.