मन भिरीभिरी वारा उडे वावडी आभाळी
भेडसावते मनाला कधी छाया काळी काळी
कधी बनून ते डोह गरागरा फिरवते
काठ सापडत नाही तेव्हा भयभित होते…
कधी बनून ते भुंगा आत आत पोखरते
कीड लावते जीवाला देहालाही सुकविते
कोंडमारा कोंडमारा कासाविशी कासाविशी
कशी करतो रे मना अवस्था तू वेडीपिशी…
तोंडदाबून तो मार वर बुक्याचाच बसे
मन पिसाट पिसाट घाव मुकाटयाने सोसे
भीड कशाची पडते मना समजत नाही
वेडं पाखरू घायाळ घाव सोसतच राही…
मन करावे मोकळे कोणी सापडत नाही
सापडले कोणी तरी मन बोलतच नाही
मग बनते ”कुरूप” ठसठसतच राही
आणि धावत सुटते मोकळ्या त्या दिशा दाही…
मन डोह आहे खोल तळ सापडत नाही
प्रतिबिंब स्वत:चे त्यात दिसतच नाही
मन वर्णायाला शब्द शब्द सापडत नाही
देऊ शकतच नाही कोणी मनाची त्या ग्वाही..
मन प्रचंड नाटकी चाली चालते ते किती
अभिनय सम्राट ते चट मारते पलटी
भल्याभल्यांना फसवी असे साळसूद दिसे
आणि मनात मनात छद्मी ते मग हासे…
मन आहे बहुरूपी रोज सोंगे घेई नाना
वाटे जाऊच नका हो त्याचा नादच सोडाना !…

— रचना : प्रा.सौ.सुमती पवार. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अतिशय सुंदर कविता मॕडम.