असं म्हणतात की, परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते.आजपर्यंत असा परीस कुणी पाहिलेला नाही. परंतु लाक्षणिक अर्थाने
परीसस्पर्श ही कल्पना वास्तवात आहेच आहे. मी उगीच काही पुरावा असल्याशिवाय हे म्हणत नाहीय. कारण मला स्वतःला अशा परीस स्पर्शाचा अनुभव आला आहे. तुम्ही म्हणाल खोटं बोलायची कमाल सीमा ओलांडली तुम्ही ! कुठे सापडला हा परीस ? सांगू ? अहो सौ अलकाताई व श्री देवेंद्र भुजबळ या दोघांच्या रुपात पाहिला आहे मी परीस. तुम्ही म्हणाल कोणते लोखंड ? सांगायलाच पाहिजे का ? अर्थात मी !
झाले असे की, मी अनेक दिवसापासून साकव्य समूहावर न्यूज स्टोरी टुडे पोर्टल पहात होते. वेगवेगळ्या साहित्य प्रकाराला मिळत असलेली प्रसिद्धी पाहुन मनात विचार आला की, इतके मोठे कार्य करणाऱ्या श्री देवेंद्र भुजबळ यांच्याबद्दल आपण लिहायला हवं ! सगळ्यांना इतकी प्रसिद्धी देणारे हे व्यक्तिमत्व, त्यांचे कौतुक व्हायलाच हवे! इतक्या मोठ्या माणसाशी काय कसं बोलायचं ? मनात धाकधूक ठेवून त्यांच्याशी संपर्क साधला. लक्ष्यात आलं की आपली भीती निराधार आहे ! मला पाहिजे ती माहिती त्यांनी दिली व त्यांच्याबद्दल लिहीलेल्या “एक कर्तुत्ववान मुसाफिर” ह्या लेखाला अमरावतीच्या दै हिंदुस्थान मध्ये, दीपक पटेकरांच्या संवाद मीडिया मध्ये आणि न्यूज स्टोरी टुडे मध्ये प्रसिद्ध झाला. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. खूप छान लिहिलं असे अनेक फोन आले. कौतुक कुणाला नको असतं ?
अशा आनंदात असतांना विचार केला की न्यूज स्टोरी टूडे च्या निर्मात्या अलकाताईबद्दल आपण लिहायला हवं ! त्यांच्याशी ओळख नव्हती. मनात तेच प्रश्न, शंका त्या कशा असतील ? कसा प्रतिसाद मिळेल ? म्हणून पुन्हा देवेन्द्रजी जवळ इच्छा व्यक्त केली, आणखी एक गुण कळला. ते म्हणाले, एकाच कुटूंबातील व्यक्तीबद्दल लागोपाठ लिहिणे बरे दिसणार नाही. किती दुरदर्शिता !
एकदा त्यांच्याशी बोलतांना कळले की अलकाताईचा १८ एप्रिलला वाढदिवस असतो. या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन मी “प्रेरणेचा झरा” हा लेख लिहिला. त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. शिवाय अलकाताईंच्या रुपात एक चांगली मैत्रीण मिळाली. अनेक दिग्गजाच्या प्रतिक्रिया आल्या आणि देवेंद्रजीनी पुन्हा १९ एप्रिल २४ रोजी न्युज स्टोरी टुडे चा विशेष अंक काढून “असा रंगला वाढदिवस” व “छान प्रतिसाद” अंतर्गत माझ्या लेखांवर आलेल्या प्रतिक्रियांना प्रसिद्धी दिली. मन भरून आले !
यात पुन्हा भुजबळ पतीपत्नीचा मोठे पणाच दिसून आला.
मी एक सामान्य वयस्कर स्त्री. विरंगुळा म्हणून लिहिते आणि या लोखंडाला भुजबळ पतीपत्नीच्या मोठेपणाचा परीस स्पर्श झाला आणि लोखंडाचे सोने झाले.
— लेखन : प्रतिभा पिटके. अमरावती.
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800