Tuesday, September 16, 2025
Homeयशकथाएका मेडिकल कॉलेजचे बाळंतपण

एका मेडिकल कॉलेजचे बाळंतपण

डॉ. अमोल अन्नदाते हे बालरोगतज्ज्ञ व नवजात शिशूतज्ञ असून वैद्यकीय क्षेत्रातील नवउद्यमी, लेखक, वक्ते, आरोग्य क्षेत्रातील समाज सुधारक आणि महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक व प्रसार माध्यमांमध्ये सक्रिय असलेले नावाजलेले डॉक्टर आहेत.

मराठवाड्यातील डॉ अन्नदाते प्रगल्भ बुध्दिमत्तेच्या जोरावर केईएम सारख्या प्रतिष्ठित मेडिकल काँलेज मधून पहिल्या क्रमांकाने एम.बी.बी.एस. झाले. पुढे एम.डी. नंतर मुंबईच्या पंचतारांकित रुग्णालयात त्यांनी
प्रँक्टिस केली. मात्र आपल्या गावातील सामान्य रुग्णांचे हाल पाहून ते थेट वैजापूर सारख्या दुष्काळी-दुर्लक्षित गावी येऊन प्रँक्टिस करू लागले.

येथील लोकांचे आयुष्य बदलायचे तर वैजापूर भारताच्या नकाशावर आले पाहिजे, या धेय्यातून भारावून आधी नर्सिंग आणि नंतर मेडिकल काँलेजची त्यांनी उभारणी केली. आनंद चँरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण आरोग्याशी निगडित विविध उपक्रम ते राबवतात. वैजापूर येथे २५० खाटांचें आनंद मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल हे धर्मदाय रुग्णालय त्यांनी स्थापन केले आहे.

डॉ अन्नदाते यांनी आनंद ग्रुप आँफ इन्स्टिट्यूट हा शैक्षणिक संस्थांचा समूह स्थापन करून त्यामार्फत मराठवाड्यातील वैजापूर तालुक्यात अल्पावधीतच पदव्युतर वैद्यकीय शिक्षण संस्था, वैजापूर अकँडमी आँफ हायर एज्युकेशन, आनंद आयुर्वेद मेडिकल काँलेज, आनंद नर्सिंग काँलेज, आनंद इंटरनँशनल स्कूल, आनंद इन्स्टिट्यूट आँफ पँरामेडिकल सायन्सेस या संस्था स्थापन केल्या आहेत.

इतके सारे करून  “It’s high time we talk”  या त्यांच्या इंग्रजी भाषेतील पुस्तकाची नोंद देशातील सर्वाधिक खपाच्या पुस्तकात आहे. याखेरीज हे बोलायलाच हवं, वैद्यकीय बोधकथा व समजून घ्या कोरोना  ही तीन मराठी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

रुढार्थाने राजकारणी, शिक्षणसम्राट नसलेल्या या तरुण डॉक्टरला मेडिकल कॉलेज सूर करण्यासाठी असंख्य अडचणी, अपमान सहन करावे लागले. तरीही त्यांनी चिवटपणे, चिकाटीने, जिद्दीने वाटचाल करून यशस्वीपणे व्यवस्था भेदली आणि वैजापूरचे नाव देशभरात पोहचवले. अनेकांची आयुष्ये त्यामुळे बदलली.

एखाद्या चित्रपट कथेलाही मागे टाकेल असे चित्तथरारक, अद्भुतरम्य वास्तव म्हणजेच “एका मेडिकल कालेजचे बाळंतपण” ही त्यांची कादंबरी ! मेडिकल कॉलेज स्थापन करतांना आलेले सर्व अनुभव त्यांनी या कादंबरीत रसाळपणे व्यक्त केले आहेत.

या कादंबरीचा सर्वात मुख्य भाग म्हणजे उच्च शैक्षणिक हेतूने एखादं काँलेज काढण्यासाठी सरकारी परवानग्या मिळवतांना आलेले अनुभव डॉ. अमोल यांनी प्रामाणिकपणे सांगितले आहेत.

किती प्रकारच्या परवान्यासाठी किती विभागातून फाईल फिरते, या सरकारी खाक्याची आपल्याला कल्पना असूनही ते वाचतांना आपण चक्रावून जातो. मंत्रालयात फाईलच्या पाठोपाठ झालेला प्रवास, त्या वेळी घडलेल्या नाट्यमय घटना, बऱ्यापेक्षा वाईटच आलेले अनुभव, भेटलेल्या व्यक्ती, आणि श्वास रोखून धरायला लावणारी त्याची अखेर, ही एक रहस्यकथाच वाटते !

कागद मिळवणं आणि सादर करणं याचा मासालेवाईक अनुभव लेखकाने कादंबरीत मांडला आहे. त्यातील बऱ्या वाईट गोष्टी साठी करावे लागणारे गैरप्रकार लेखकाच्या नजरेतून सुटलेले नाहीत. त्यामुळे आलेली अस्वस्थता त्यांनी दर्शवली आहे.

आपला स्वार्थ बाजूला ठेवून झपाटून काम करणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे देखील कादंबरीत दिलेली आहेत. मानवी स्वभावाचा हा पैलू विविध अनुभवातून साकार केलेला लेखकाला दिसला आहे. या सर्व कामात मुंबई, दिल्लीची भटकंती, सतत मारावयास लागलेल्या फेऱ्या, मोजकीच कौटुंबिक पार्श्वभूमी या डॉ. अमोल यांनी कुशलतेने रेखाटल्या आहेत. त्यामुळे कादंबरी सलगपणे अखेर पर्यंत वाचाविशी वाटते हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.

विशेष म्हणजे प्रसिद्ध पत्रकार श्री श्रीकांत बोजेवार यांनी कादंबरीची लिहिलेली प्रस्तावना मनोज्ञ वाटते. डॉक्टरांचा विविध कामातील उत्साह नियंत्रणात ठेवण्यासाठी, मित्र म्हणून त्याचं फार कौतुक करणं टाळत असतो, पण या कादंबरी विषयी ते लिहितांना टाळणं म्हणजे स्वताःशीच खोटं बोलण्यासारखे होईल, म्हणून डॉ. अमोलांच्या लेखनशैली बद्दल कौतुकही केले आहे, ते अतिशय उचित वाटते.

श्री. सुधाकर तोरणे.

– लेखन : सुधाकर तोरणे, निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. बॉलिवूड जगतात नावाजलेल्या हिरो, हिरोईन च्या मुलांनाच फिल्म मध्ये काम मिळते. त्यांनाच प्रोमोट केले जाते. आपल्या स्वतःच्या अभिनयच्या हिंमतीवर पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांचा सुशांत सिंग राजपूत होतो. एकतर त्यांना फिल्म इंडस्ट्री मध्ये कामे मिळत नाहीत, अपमानास्पद वागणूक देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले जाते किंवा हत्या होते. त्याच प्रमाणे शिक्षण क्षेत्रात होणारा भ्रष्टाचार, नवीन शैक्षणिक संस्था परवानगी साठी होणारी ससेहोलपट हे नवीन नाही. शिक्षण सम्राट हे एकतर बलाढ्य राजकारणी आहेत किंवा राजकारणी पुढऱ्यांचा वरदहस्त असल्याखेरीज शैक्षणिक क्षेत्रात कोणी पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे राजकीय वरदहस्त किंवा कौटुंबिक राजकीय वारसा नसलेल्या डॉ. अमोल अन्नदाते यांना वेगळा काय अनुभव येणार. तरीही त्यांनी त्यांच्या हिंमतीवर आज शिक्षण क्षेत्रात उच्च स्थान निर्माण केले आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन 🙏

  2. डाॅ. अमोल यांचा अनुभव खुपच बोलका आहे. आपल्या राजकारणी लोक कधी सामान्य माणसाची छळवणूक करतात. तरी हि न हार मानता डाॅक्टर च्या कायॅ ला मनापासून सलाम. 👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments