Saturday, September 13, 2025
Homeलेख"ऑपरेशन सिन्दुर": डॉ कलाम यांना सलाम

“ऑपरेशन सिन्दुर”: डॉ कलाम यांना सलाम

“ऑपरेशन सिन्दुर” मुळे प्रत्येक भारतीयाला जितका अभिमान वाटतो आहे त्याहीपेक्षा किती तरी जास्त पटीने समाधान वर आकाशात डॉ कलाम यांना वाटत असेल. त्यांना मिसाईलचे जनक म्हणतात ते उगाच नव्हे.

आपल्या कारकिर्दीची सुरुवात इस्रो मध्ये केलेल्या डॉ अब्दुल कलाम यांनी साधारण ८१ /८२ च्या सुमारास हैदराबाद येथील डी आर डी ओ प्रयोगशाळेचे संचालक म्हणून स्थलांतर केले. त्यानंतर त्यांच्याकडे येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या रिसर्च सेंटर इमारत या प्रयोगशाळेची स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली. त्याच बरोबर इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईलस या संरक्षण मंत्रालयाच्या नव्या प्रकल्पाची जबाबदारी देखील देण्यात आली. याच सुमारास म्हणजे ८३ साली माझेही आय आय टी खरगपूरहून उस्मानिया विद्यापीठात प्रोफेसर म्हणून स्थलांतर झाले. त्यामुळे मला डॉ कलामांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीचा साक्षीदार होता आले.

डॉ कलाम येण्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाच्या प्रोजेक्ट्स मध्ये बाहेरच्या शैक्षणिक संस्थांची किंवा खाजगी उद्योग समूहाची फारशी गुंतवणूक नव्हती. थोड्या प्रमाणात दिल्लीच्या हेड ऑफिसने पाच जुन्या आय आय टी ना आधुनिक रडार प्रणाली संबंधी काही अनुदान दिले होते. या भरघोस अनुदानातून या सर्व आय आय टी त नवे संशोधन केंद्र उभारले गेलेत. सुरुवाती पासून या केंद्रात आधी संशोधक विद्यार्थी म्हणून अन् नंतर प्राध्यापक म्हणून दहा वर्षे काम करण्याचे सदभाग्य मला लाभले. याच काळात माझा डॉ कलाम यांच्याची प्रथम परिचय झाला. तो हैदराबाद ला आल्यानंतर साहजिकच वाढला.

आय आय टी त निर्माण झालेल्या सेंटर मध्ये रडार संबंधी संशोधनाबरोबर आर्मी, नेव्ही, एअर फोर्स च्या तसेच डी आर डी ओ प्रयोग शाळेतील सायंटिस्ट देखील एम टेक साठी येत. त्यामुळे डॉ कलाम यांच्या प्रयोग शाळेतील बरेच सायंटिस्ट माझे एम टेक चे विद्यार्थी होते. एकदा तर ते विनोदाने म्हणाले देखील, “मी ज्याला ज्याला भेटतो तो तुमचा विद्यार्थी असल्याचे सांगतो !” एका अर्थी ते खरेही होते. कारण अर्धा डझन मी शिकविलेले सायंटिस्ट पुढे वेगवेगळ्या डी आर डी ओ लॅब चे डायरेक्टर झालेत. दोघे तर पंतप्रधानाचे वैज्ञानिक सल्लागार, डी आर डी ओ चीफ देखील झालेत !

कलाम यांनी आर सी आय या प्रयोगशाळेत इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईलस चा प्रकल्प धडाक्याने सुरू केला. तो पर्यंत बरेच बजेट मिळूनही या संरक्षण प्रयोग शाळांचे प्रकल्प रेंगाळत असत. त्यात शैथिल्य आले होते. ही मरगळ दूर करून नवे चैतन्य निर्माण करण्याचे श्रेय निश्चितच डॉ कलाम यांना जाते. ते स्वतः अकेडेमिकली तेवढे सक्षम नसले (त्यांची डॉ पदवी ही सन्माननीय आहे) तरी उत्तम टेक्नॉलॉजी मॅनेजर होते. कुणाकडूनही वेळेत काम कसे करून घ्यायचे याची शिस्तबद्ध कला त्यांना अवगत होती. माणूस म्हणून तर ते अतिशय ग्रेट होते. कुणाला न दुखावता, त्याच्या अडचणी समजून त्याच्याकडून काम कसे करून घ्यायचे हे त्यांचे कौशल्य वादातीत होते. त्यांनी स्वतः काही मूलभूत संशोधन केले नसले तरी आपल्या हाताखालील सायंटिस्ट ना प्रोत्साहन देऊन, संधी देऊन त्यांच्या कडून उत्कृष्ट काम करून घेतले.

त्यांच्या प्रयोगशाळेतील एक सायंटिस्ट अधिकारी माझ्या मार्गदर्शनाखाली पी एच डी करीत होता. तेव्हा ते सारखी त्याच्या प्रगतीची चौकशी करायचे. मी जेव्हा त्यांना सांगितले की तुमच्या ऑफिसच्या कामामुळे त्याला पुरेसा वेळ मिळत नाही, त्याचे काम रेंगाळते आहे तेव्हा त्यांनी त्याला ताबडतोब सहा महिन्याची पगारी रजा मंजूर केली. अन् त्याची पी एच डी वेळेत पूर्ण झाली. तेही परदेशातील दर्जेदार पेपर पब्लिकेशन्स सह! हे काम मिसाईल एन्टेना संबंधीच होते. त्यात बरीच गुप्तता असल्याने पेपर प्रसिद्ध करण्यात दिल्ली हेड ऑफिसची परवानगी लागत असे. त्याला विलंब व्हायचा. त्यावेळी डॉ कलाम स्वतः लक्ष घालून ती अडचण दूर करायचे !

उस्मानिया विद्यापीठात भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक विभागाने एक नेवीगेशन रिसर्च सेंटर उभारले होते. यात डॉ रेड्डी समवेत माझाही सक्रिय सहभाग होता. दहा वर्षे डॉ कलाम या सेंटरच्या अडवायझरी बोर्डाचे आधी सभासद अन् नंतर अध्यक्ष होते. त्यामुळे सारख्या भेटीगाठी व्हायच्या. त्यांच्या नाग मिसाईल साठी नेवीगेशन चे सॉफ्टवेअर याच केंद्राने तयार केले. त्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी “विंग्ज ऑफ फायर” या पुस्तकाच्या सुरुवातीस केला आहे.

मी डी आर डी ओ च्या निवड समितीवर पंचवीस वर्षे तंत्रज्ञ म्हणून, अध्यक्ष म्हणून काम केले. तेही निर्देशक या नात्याने या समितीत असायचे. तेव्हा आपल्या अधिकाऱ्याचे प्रमोशन व्हावे म्हणून ते प्रयत्नशील असायचे. प्रसंगी रदबदली करायचे. त्याचे काम किती महत्वाचे आहे हे पटवून द्यायचे (मुलाखत नीट झाली नाही तर अशी गरज भासत असे त्यांना). हा त्यांचा दिलदारपणा वाखाणण्यासारखा होता. यावेळी आम्ही एकाच गेस्ट हाऊस मध्ये राहत होतो. डिनर नंतर एकत्र फिरायला जात असू. त्यावेळच्या त्यांच्या गप्पात ही मिसाईल प्रोजेक्ट, सॅटेलाईट लाँच हेच टेक्निकल विषय असायचे.

एकदा बंगलोर येथे डिनर नंतर आम्ही गेस्ट हाऊस शेजारी असलेल्या इस्रो प्रयोगशाळेत गेलो. दोन दिवसांनी आपले रॉकेट रशियाच्या तळा वरून लाँच होणार होते. त्याचे शेवटचे काम रात्री देखील चालले होते. तिथे ते तिथल्या सायंटिस्टशी बोलण्यात, त्यांना प्रोत्साहन देण्यात इतके रमले की आम्ही गेस्ट हाऊस ला परतलो तेव्हा रात्री चे साडेबारा वाजले होते. ही त्यांची आपल्या कामातली भावनिक गुंतवणूक होती.

डॉ कलाम घरी आले तेव्हा….

माझ्या मते डॉ कलाम यांच्या सारखा तत्वनिष्ठ, स्वतःला झोकून देणारा, प्रामाणिक तळमळीचा अधिकारी दुर्मिळ म्हटला पाहिजे. निवृत्त झाल्यावर त्यांनी शालेय, कॉलेज विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले. पंडित नेहरू नंतर मुलाना आकर्षित करणारे फक्त एकमेव डॉ कलाम ! मी कुलगुरू असताना केवळ एका फोनच्या निमंत्रणाने ते पदवी प्रदान समारंभासाठी आले होते. त्यावेळी सूची बद्ध कार्यक्रमामुळे त्यांना विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद साधता आला नव्हता. तेव्हाच त्यांनी मी पुन्हा येईन हे कबूल केले. त्याप्रमाणे दुसऱ्या भेटीचा कार्यक्रम देखील ठरला. आम्ही जय्यत तयारी देखील केली. पण आदल्या दिवशी पाय घसरून पडल्याने त्यांना दवाखान्यात भरती व्हावे लागले. सोहळा रद्द झाला. सर्वांचीच निराशा झाली. पण आधीच्या भेटीत कुलगुरू निवासात त्याच्या आवडीचे डिनर आतिथ्य करण्याचे सदभाग्य लाभले.

आता या ऑपरेशन सिन्दुर मुळे डॉ कलाम आठवणे स्वाभाविक आहे. कारण ज्या मिसाईलस ने हा पराक्रम केला त्या भारतीय मिसाईल प्रोजेक्ट चे जनक डॉ कलाम होते. मला खात्री आहे, ते निश्चित वर टाळ्या वाजवत असतील !

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे.
माजी कुलगुरू, हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. विनम्र अभिवादन ,लेखाद्वारे आपण मिसाइल्स जनक डाॅ अब्दुल कलाम यांना नमन करत आहात तर आमचेही हात आपोआपच जोडले जात आहेत.शतशः नमन !!
    जय हिंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा