“शंकरराव चव्हाण साहेबांचे वेगळे रूप”
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वृत्तांकन करणारे अधिकारी, उपसंपादक, टीव्ही कॅमेरामन, फोटोग्राफर असे आम्हा सर्वांना मंत्रालय, सह्याद्री गेस्ट हाऊस, वर्षा बंगला अशा विविध ठिकाणी कव्हरेज करण्यासाठी ड्युटी लागत असे.
बरेचदा सी एम साहेबांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सीएम साहेब व त्यांच्या पत्नी यांचे पासपोर्ट व इतर फोटोच्या कामासाठी आम्हाला बंगल्याच्या आत जावे लागत असे.

मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेबांचा कडक आणि शिस्तप्रिय स्वभाव सर्वांनाच माहिती आहे. एकदा ते मुख्यमंत्री असताना माझी वर्षा बंगल्यावर ड्युटी लागली होती. मला फोटोच्या कामासाठी वर्षा बंगल्याच्या आत अधिकाऱ्याने पाठवले. मी ताईसाहेब म्हणजे सीएम साहेबांच्या पत्नी सौ. कुसुमताई चव्हाण यांना भेटलो. त्यांनी मला फोटो विषयी सांगितले. मी त्यांना फोटो करून देतो असे सांगितले. मी निघणार तेवढ्यात त्यांनी मला, देशमुख बसा असे सांगून माझ्यासाठी चहा नाश्ता मागवला. आम्ही बंगल्याच्या आत गेल्यावर नेहमीच सर्व सीएम साहेबांच्या पत्नी सर्व कर्मचाऱ्यांना चहा नाश्ता विचारत. मी ताईसाहेबांशी बोलता बोलता चहा व नाश्ता घेत होतो. तेवढ्यात समोरून साक्षात चव्हाण साहेब आले. त्यांना बघताच मी ताडकन उभा राहिलो.पण त्यांनी मला हसत हसत हातानेच, खाली बसा असे खुणवले व ते बंगल्याच्या आत गेले.

केंद्रीय गृहमंत्री पदावर असताना शंकरराव चव्हाण साहेब जेव्हा कधी मुंबईत येत, तेव्हा सह्याद्री गेस्ट हाऊस किंवा वर्षा बंगल्यावर ब्लॅक कॅट कमांडोच्या सुरक्षेसह येत. पंतप्रधान राजीव गांधी यांनी विराट या युद्ध नौकेला भेट दिली. त्यावेळी ते शंकरराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरची मंत्रालयातील मीटिंग, आपले माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी दिवाकर गंधे साहेब यांनी लोकराज्य मासिकासाठी घेतलेली स्पेशल मुलाखत व इतर विविध कार्यक्रम, मीटिंगच्या वेळेचा त्यांचा कठोर चेहरा माझ्यासमोर आला. या प्रत्येक वेळी मी फोटो काढायला होतो आणि आज साहेबांनी मला हसत हसत हात करून मला बसा म्हणून सांगितले. मीटिंग मधील आणि घरातील शंकरराव चव्हाण साहेब असे त्यांचे एकदम वेगळे प्रेमळ स्वरूप मला बघायला मिळाले. मी चहा नाश्ता घेतला व ताईसाहेबांना येतो सांगून मंत्रालयात निघालो.
या माझ्या शासकीय नोकरीने मला भरपूर काही दिले. उत्तम अधिकारी आणि सहकार्यांमुळे हे सर्व शक्य होत होते.
— लेखन : गिरीश देशमुख. निवृत्त छायाचित्रकार, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800