Thursday, August 7, 2025
Homeयशकथासातारची सागरकन्या

सातारची सागरकन्या

साधी नदीही नसलेल्या सातारा येथील चिमुरडी सागरी जलतरण स्पर्धा जिंकते हे आश्चर्यच आहे. ही आश्चर्यचकित करणारी प्रेरक कथा सांगत आहेत, आपल्या विशेष प्रतिनिधी रश्मी हेडे….

लहानपणी अत्यन्त अशक्त असणाऱ्या आणि अशक्त जुळी बहीण गमावणाऱ्या सातारा येथील मृदुला पुरीगोसावी दुसरीत गेल्यावर तिला पोहण्याचा छंद जडला. 

एकदा कुटुंबियांसोबत कन्हेर धरण येथे सहलीला गेली असता मृदुलाने पोहण्याचा हट्ट धरला. ही चिमुरडी, हिला काय पोहायला काय जमणार ? असा मोठा प्रश्न तिच्या बाबांना पडला. पण म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे मृदुलाचे पाय पाण्याकडे वळायला लागले.

रोजच अंघोळीला गेली असता तासनतास पाण्यात बसणे, कास तलाव, नद्या, धरणे अशा ठिकाणी फिरायला जाणे असा तिचा हट्ट व्हायला लागल्याने तिला पोहण्यासाठी कोण शिकवेल का असा शोध सुरू झाला. पण तिचे वजन, उंची बघून प्रत्येक जण तिला नकार देत असे.

दरम्यान, फुटका तलाव येथे नाना गुजर पोहायला शिकवतात असे समजले. एक दिवस तिची आई तिला नानांकडे घेऊन गेली. आई नानांना हिला पोहायला शिकवाल का असे विचारत असतानाच मृदुला ने फुटका तलाव येथे पाण्यात उडी मारली. तिची जिद्द पाहून नाना ही तिला पोहायला शिकवण्यासाठी तयार झाले. ती पोहायला शिकली.

नानांसोबत पाण्यात लपंडाव ती रोजच खेळायची. तळ्यातील मासे, कासव, साप, बदके जणू हिचे आता मित्रच…

गोवा पणजी येथे ३ सप्टेंबर २०१९ रोजी राष्ट्रीय जलतरण स्पर्धा होती. मृदुला स्पर्धेला उतरली होती. अथांग सागर बघून ती आनंदून गेली. आता आपल्याला समुद्रात पोहायला मिळणार हा आनंदच तिच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता. पण…… मृदुलाचे वजन १५ किलो उंची २ फूट असल्याने ती एवढ्या मोठ्या समुद्रात पोहणार कशी ? हा प्रश्न परीक्षक आणि मेडिकल करणारे शिक्षक यांना पडला. त्यांनी ती या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही असे तिच्या आई बाबांना सांगितले. मृदुलाचे आई-बाबा नाराज होऊन परतणार इतक्यात सातारचे जलतरणपटू श्री श्रीमंत गायकवाड सर यांना म्हणाले ती मेडिकलमध्ये बसत नाही. यावर गायकवाड सरांनी आयोजकांना सांगितले एक चान्स देऊन बघा. ती बुडणार नाही याची हमी मी घेतो. त्यामुळे मृदुलाला होकार मिळाला.

स्पर्धा सकाळी सात वाजता सुरू होणार होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार स्पर्धा नऊ वाजता सुरू करण्यात आली. छोटी मृदुला आपल्या आईकडे एकटक पाहत होती. आईच्या मनातील ती काळजी ओळखत होती. पायात सेन्सर घालण्याआधी ती आपल्या आईजवळ गेली. आईला तिने घट्ट मिठी मारली. आईची एक पापी घेत आईच्या चेहऱ्यावरील केस तिने बाजूला सारले अन म्हणाली, “आई, काळजी नको करू माझ्याकडे बाप्पा वाली पावर आहे ना ! मी ३० मिनिटांत स्पर्धा पूर्ण करून येते”.

गणपती बाप्पाला खूप मानणारी, रोज नित्य नियमाने पोहून फुटका तलाव येथे गणपतीला अकरा प्रदक्षिणा घालणाऱ्या मृदुलात खरच बाप्पा वाली पावर आली होती.

अनौन्समेंट झाली… मृदुला पुरी गोसावी आप अपना सेंसर डालने के लिए आईए. तिचे आई-बाबा तिला स्टार्टिंग पॉईंट वर घेऊन आले. मृदुलाला उजव्या पायात सेंसर घालण्यात आले. ती मात्र बिनधास्त होती. स्विमिंग करून झाल्यावर रण करून फिनिशर पॉइंटला पोहोचायचे आहे. ती हो म्हणाली आणि समुद्राच्या दिशेने मागे वळून न पाहता तिने पावले टाकली.

पन्नास मिनिटांमध्ये तिने दोन किलोमीटर सागरी अंतर पार करून ती आपल्या फिनिशर पॉइंटला पोहोचली होती. ज्या परीक्षकांनी तिला हे जमणार नाही असे म्हणाले त्याच परीक्षकांनी तिला रौप्यपदक घालून सबसे छोटी स्वीमर ये अपने पिता का नाम जरूर रोशन करेगी असं म्हणून तिचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. भारतातील सर्व राज्यातून आलेले सर्व स्वीमर यांनी कोणी उचलून घेऊन तर कोणी सेल्फी घेत तिचे कौतुक केले.

साताऱ्यात येताच सातारकरांनी फटाक्यांची आतषबाजी करून मृदुलाचं स्वागत केलं. बाल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात न्या. प्रवीण कुंभोजकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या सातारातील एक चिमुकली सातासमुद्रापार एक अनोखा विक्रम करते ही बाब कौतुकास्पद असून भविष्यात याहीपेक्षा मृदूला मोठी कामगिरी करेल अशा शब्दात न्यायमूर्ती कुंभोजकर यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

पोरबंदर येथील स्पर्धेसाठी जाताना मृदलाची ट्रेन चुकली. कडाक्याच्या थंडीत ती बसून होती. तिला फक्त आणि फक्त पोरबंदर कसा असेल ? समुद्र कसा असेल ? हेच जणू तिचे डोळे सांगत होते. असा तीन दिवसांचा प्रवास केल्यानंतर ती पोरबंदर ला पोहोचली होती.

पोरबंदर स्टेशनला पोहोचल्यावर तिने पूज्य महात्मा गांधीजीना वंदन केले. तेथील चरखा पाहिल्यावर ती खूप खुश झाली. ती रूमवर पोचली. स्पर्धेच्या आदल्या दिवशी ती स्पर्धेचे ठिकाण पाहून आली. स्पर्धेचा दिवस उजाडला. ती तयारीतच होती. वरून ड्रोन कॅमेऱ्याकडे पहात आपल्या बाबांची आणि दादाची आठवण काढत ती स्पर्धेसाठी पाण्यात उतरली.

स्पर्धा पूर्ण झाल्यावर पुढे भारतीय नौदल सेनेने सेकंदाचा विलंब न करता स्पीड बोटने तिला फिनिशर पॉइंटला पोहोचवले. त्यावेळी तिला आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटला.

आता प्रॅक्टिस रोजच चालू होती. पुढच्या स्टाईल शिकण्यासाठी ती सातारा येथील शाहू स्टेडियम मधील श्री भगवान चोरगे सर यांच्याकडे जाऊ लागली.

मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी होऊन तिने दोन किलोमीटर सागरी अंतर पार करून गोल्ड मेडल पटकावले. तेथे फिनिशर पॉइंट ला पोहचत असताना तिच्या पायाला दगड काचळ्या लागल्या होत्या. त्यातून रक्त येत होते. मेडल घेऊन येताना तिच्या आजोबांनी तिला विचारलं, “बेटा लागलं का तुला” ? असं म्हटल्यावर, ती नाही म्हणाली. पण तिथेच मेडल सारखी तिच्या आजोबांना दाखवत होती. तिला जणू तिच्या मेडल पुढे सारं काही फिकं होतं.

पुढे जाऊन ती भारतीय नौदलात जाण्याची इच्छा व्यक्त करते रोज दोन तास प्रॅक्टिस करणे, सायकल चालवणे एक्टिंग करणे असे तिचे छंद आहेत. पंधरा दिवसांपूर्वी तिने हिंदी फिल्म दोबारा मध्ये स्विमरचा रोल केला. प्राण्यांची मैत्री करणे, गोष्टी वाचणे हे तिचे छंद. कधीतरी आपल्या कोच सोबत म्हणजेच श्री भगवान सर यांच्यासोबत ती फोनवर गप्पा देखील मारते आणि आपण कोरोना च्या काळात कसे प्रॅक्टिस करायचे यांची विचारपूस करते. काही दिवसांपूर्वी ती कोरोनाच्या महामारीतून सुखरूपपणे घरी परतली आहे.

मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे असं सांगताना ती म्हणते, “मी भारतासाठी ऑलम्पिक खेळेल आणि सातारचा झेंडा सातासमुद्रापार लावेल”.

मृदुलाने आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय सुवर्ण व रोप्य पदक पटकविले आहेत. अनेक संस्थांनी तिला गौरविले आहे.

अशा ह्या सातारच्या अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकली चा जीवन प्रवास सर्वांना अचंबित करणारा व प्रेरणादायी आहे.

ज्या छोट्या मुलीचा म्हणजे मृदुलाचा जन्म एका काचेच्या पेटीत झाला, जिला श्वास घेताना ही त्रास होत होता तिने निर्भीडपणे, जिद्दीने, कष्ठाने, चिकाटीने व आत्मविश्वासाने एक जलतरण कन्या म्हणून आपले नाव कोरले व आई वडिलांच्या, नातेवाईकांच्या, गुरूंच्या व डॉक्टरांच्या कष्ठाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले. जिचा सर्वानाच अभिमान वाटावा. असा संघर्षमय जीवन प्रवास जिला कौतुकाची थाप व तुम्हा सर्वांचे आशीर्वाद व साथ लाभावी जेणे करून तिचे भविष्य उज्ज्वल असो हीच मनोकामना.

रश्मी हेडे.

लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on पांढरी काठी : प्रशिक्षण संपन्न
Dr.Satish Shirsath on अनुवादित कथा
सौ. सुनीता फडणीस on श्रावण : काही कविता
सौ. सुनीता फडणीस on काही भक्ती रचना