Sunday, February 1, 2026
Homeसाहित्यअष्टपैलू आचार्य अत्रे

अष्टपैलू आचार्य अत्रे

आज, १३ ऑगस्ट. आचार्य अत्रे यांची जयंती. त्यानिमित्ताने हा विशेष लेख. आचार्य अत्रे यांना विनम्र अभिवादन.
— संपादक

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नामवंत लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. त्यांनी केशवकुमार या टोपण नावाने “झेंडूची फुले” हे विडंबनपर काव्य लिहिले. “झेंडूची फुले’ या विडंबनपर काव्यामुळे विडंबनाला मराठी वाड्मयात स्वतंत्र स्थान मिळाले.

आचार्य अत्रे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात मोलाची भर घातली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. १९५७ मध्ये ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तिकिटावर विधानसभेत निवडून आले. तिथे त्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते.

आचार्य अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट, १८९८ रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कोडित खुर्द या गावी झाला. सासवडच्या एमईएस वाघिरे हायस्कूलमधून त्यांनी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. १९१९ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले.
अत्रे यांनी १९२८ मध्ये लंडन विद्यापीठातून टी.डी. ही शिक्षणविषयक पदविका प्राप्त केली. लंडनहून भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी लंडन येथे प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला.

आचार्य अत्रे यांनी काही काळ अध्यापनाचे कार्यसुद्धा केले. मुंबईत पहिले सहा महिने सॅंढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित हे विषय शिकवले. नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल) मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व त्या शाळेचा मोठा विस्तार केला. ती शाळा म्हणजे अत्रे यांच्या नाट्यलेखनाची आणि समाजसेवेची जणू प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र त्यांना या शाळेतच मिळाला.
पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी “नवयुग वाचनमाला” व दुय्यम शाळेसाठी “अरुण वाचनमाला” ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या.

आचार्य अत्रे १९३७ साली पुणे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले. आचार्य अत्रे आणि गिरीश दोघेही हाडाचे द्रष्टे शिक्षक होते. त्यावेळी ते अनुक्रमे कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे मराठीचे अध्यापक होते. अत्रे तर लंडनहून शिक्षणशास्त्रातील उच्च पदविका घेऊन परतले होते; आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा अशा जाणकारांच्या अनुभवातून ही पुस्तके तयार झाली आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अवघ्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शकाचे काम करू लागली. पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषा-शिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली होती. पुस्तकांची रचना करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला होता

इ.स. १९२३ साली अत्रे यांनी ‘अध्यापन’ मासिक सुरू केले. त्यानंतरही त्यांनी ‘रत्‍नाकर’ ‘मनोरमा’, इत्यादी नियतकालिके काढली. जानेवारी १९४० मध्ये त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले, ज्याने मराठी पत्रकारितेत एक वेगळा ठसा उमटवला.

आचार्य अत्रे यांनी १५ नोव्हेंबर १९५६ रोजी मराठा हे दैनिक सुरू केले. मराठा मध्ये रोखठोक आणि निर्भीड भाषेत लिहिलेले त्यांचे अग्रलेख खूप गाजले. मराठा हे दैनिक त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.

आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था मुंबई, ठाणे, पुरंदर पिंपरी, सासवड इत्यादी ठिकाणी स्थापन झाल्या. आचार्य अत्रे यांनी चित्रपटसृष्टीतही आपले वेगळे स्थान निर्माण केले. अनेक चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. नारद-नारदी, धर्मवीर, प्रेमवीर, ब्रह्मचारी यातील काही चित्रपटांच्या कथा तर काही चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद त्यांनी लिहून दिले. त्यांनी लिहिलेला ‘ब्रॅंडीची बाटली’ हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला.
आचार्य अत्रे यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने ‘नवयुग चित्रपट कंपनी’ काढली. पुढे ‘हंस पिक्चर्स’ मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हे देखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे ‘लपंडाव’ चित्रपटाची कथा अत्रे यांनी लिहिली. ‘लपंडाव’ चित्रपटानंतर त्यांनी ‘संत सखू’ या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु पुढे काही वाद झाल्यामुळे आचार्य अत्रे यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.

१९४२ साली ‘अत्रे पिक्चर्स’ची निर्मिती असलेला वसंतसेना हा चित्रपट मराठी व हिंदी भाषेतील आवृत्त्यांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती, कथा, पटकथा, संवाद व गीते अत्रे यांची होती. गजानन जहागीरदार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते, तर संगीतकार होते मास्टर कृष्णराव.

आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या “श्यामची आई” चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार” सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले “सुवर्ण कमळ” मिळाले होते. जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी. टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला.

आचार्य अत्रे यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. उदाहरणार्थ, सामाजिक बांधिलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला.

आचार्य अत्रे हे उत्तम नाटककार होते. त्यांनी पंचवीसपेक्षा जास्त एकाहून एक सरस नाटकांचे लेखन केले. त्यांची डॉ.लागू, बुवा तेथे बाया, लग्नाची बेडी, पाणिग्रहण, प्रीतिसंगम, तो मी नव्हेच, मोरूची मावशी ही आणि इतर काही नाटके खूप गाजली. नाटक, कथा, काव्य. कादंबरी, लेख असे चौफेर लेखन त्यांनी केले. कऱ्हेचे पाणी हे त्यांचे पाच खंडातील आत्मचरित्र त्यावेळी खूप गाजले होते.

विष्णूदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० साला पासून विष्णूदास भावे पुरस्कार देत आली आहे. आचार्य अत्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आज महाराष्ट्रातील अनेक संस्था त्यांच्या नावाने पुरस्कार देतात.

अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन असलेला ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम आहे. ’मी अत्रे बोलतोय’ हा एकपात्री कार्यक्रम करणारे अनेकजण आहेत. सदानंद जोशी हे त्यांपैकी एक प्रमुख होत. दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिनी म्हणजे १३ ऑगस्ट रोजी सासवड येथे आचार्य अत्रे साहित्य संमेलन भरते. अनेक कार्यक्रमांसोबत त्या संमेलनात आचार्य अत्रे यांच्या नावाने काही पुरस्कार दिले जातात.
आचार्य अत्रे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

— लेखन : उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9