दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस भारतात राष्ट्रीय अग्नि सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. 1944 साली मुंबईतील व्हिक्टोरिया डॉक येथे झालेल्या भीषण स्फोटात अनेक अग्निशामक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो.
आग आणि त्यामुळे होणारे नुकसान हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. या दिनानिमित्ताने दरवर्षी अग्नि सुरक्षे विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. कारखाना, अग्निशमन केंद्रे तसेच हल्ली सामाजिक क्षेत्रात देखील अग्नि सुरक्षा विषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना दिसत आहे.
अग्नी सुरक्षा दिनाची ह्या वेळेची थीम “सुरक्षित शाळा, सुरक्षित रुग्णालये आणि अग्नि सजग समाज, अग्नि सुरक्षेसाठी एकत्र येऊया” ही थीम समाजातील सर्वात संवेदनशील घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि एकत्रित जबाबदारीची जाणीव करून देते.
भारतामध्ये दरवर्षी हजारो आग लागण्याच्या घटना घडतात आणि हजारो लोक आपला जीव गमावतात. मुंबईसारख्या महानगरात दरवर्षी 5000 पेक्षा अधिक आग घटना नोंदवल्या जातात. परंतु या घटना संख्या नसून त्यामुळे अनेक कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त झाल्याचे पाहायला मिळते.
भारतामध्ये मागील एक वर्षात सुमारे आठ हजारांच्या वर मध्यम व मोठ्या आगीच्या घटना नोंदवल्या गेल्या, त्यामध्ये सात हजाराच्या वर लोक आगीमुळे मृत्युमुखी पडले. त्यामधील 55 ते 60% च्या आसपास या घटना निवासी आगी संदर्भात होत्या. ह्यामध्ये निवासी, औद्योगिक व सार्वजनिक मालमत्तेचे हजारो कोटींचे नुकसान झाले. यामध्ये नोंदवल्या न गेलेल्या घटनांचे प्रमाण अधिक पटीने असू शकते.
मागील दोन आठवड्यांचा जरी विचार केला तर मुंबई व परिसरात अनेक गंभीर आग घटना घडल्या आहेत : त्यामध्ये मुंबई विमानतळावरील आग, भाईंदर येथील झोपडपट्टी मधील एलपीजी सिलेंडरचा स्फोट, सायन येथील रुग्णालय, माटुंगा रेल्वे कोच, तुर्भे येथील दुकानांना लागलेली आग अशा अनेक घटना ज्याच्यामध्ये जीवित आणि वित्त या दोघांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते. यातून अग्नि सुरक्षेची तातडीची गरज अधोरेखित होते.
छोटी शहरे मोठी होऊ लागली व मोठी शहरे अधिक व्यापक होऊ लागलेली आहेत. उंच उंच इमारती व त्यामधील आगींसारख्या सारख्या दुर्घटना घडल्यास त्या नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणेपुढे मोठे आव्हान असते. निवासी विभागातील आगींच्या दुर्घटनांमध्ये प्रामुख्याने घरातील वाढणारा लायटिंगचा भार, जुन्या वायरिंग व त्यामुळे होणारे शॉर्ट सर्किट तसेच स्वयंपाक घरातील गॅस गळती यांचे प्रमाण मोठे असते. सर्किट ब्रेकर आहेत परंतु ते कार्यरत आहेत का ? याबद्दल अज्ञानच जास्त पाहायला मिळते. घरगुती गॅसचा वापर व त्याची सुरक्षा याविषयी सगळ्यांना माहिती असते परंतु या घटना निष्काळजीपणामुळेच घडतात. तसेच एकाच्या चुकीचा त्रास हा आजूबाजूच्या लोकांना सोसावा लागतो.
बऱ्याच सोसायट्यांमध्ये अग्नी यंत्रणा लावलेली असते परंतु त्याला खर्चाच्या दृष्टीने दुय्यम स्थान दिल्यामुळे त्याची देखभाल होत नाही व आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या कार्यान्वित नसल्याचीच शक्यता जास्त असते.
अनिवासी भागात परवाण्याच्या सक्तीमुळे अग्निशमन यंत्रणा बसवली जाते परंतु वापराच्या वेळी देखभाली अभावी बऱ्याचदा ती कार्यरत नसल्याचे दिसून येते.

अग्निशमन व्यवस्थापनाकडून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कडक धोरण तसेच लोकांमधील वाढत असलेली जागरूकता यामुळे मागील काही वर्षात आगीच्या प्रमाणात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे असे असले तरी ही आकडेवारी नक्कीच सुखद नाही. आगींपासून होणारे नुकसान कमी करायचे झाल्यास सर्वप्रथम आग लागू नये यासाठीचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रत्येक सोसायटीने तसेच विविध आस्थापनांनी फायर सेफ्टी ऑडिट आणि एनर्जी ऑडिट करून त्यामधील त्रुटी वेळोवेळी दूर करणे आवश्यक आहे. दुसरी बाब म्हणजे इमारतीच्या स्ट्रक्चरनुसार अग्नि सुरक्षा यंत्रणेची पूर्तता व ती कार्यरत राहण्याची खबरदारी तसेच ही यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण संबंधितांना मिळणे आवश्यक आहे. जेणेकरून आगींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊन जीवित आणि वित्तहानी नियंत्रणात येऊन राष्ट्रीय नुकसान व पर्यावरणीय हानी यातील चित्र बदलण्यास नक्कीच मदत होईल.
अग्नि सुरक्षा ही केवळ उपाययोजना नसून तातडीची गरज आहे हे विसरून चालणार नाही.

— लेखन : सुधीर थोरवे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800
दररोज वृत्तपत्रात आग व त्यामुळे होणारे नुकसान याची बातमी ऐकायला मिळते. अग्नि सुरक्षा दिनाचे महत्त्व साधून अग्नी सुरक्षा विषयक घ्यायची काळजी तसेच सुरक्षाविषयक कायदे व त्याच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांची भूमिका याचा परामर्श या लेखातून घेण्यात आलेला आहे
