“त्रिशुंड गणपती मंदिर, पुणे”
मध्ययुगीन पुण्याची शिल्पकला आणि मूर्तीकलेचा एक उत्तम ऐतिहासिक नमुना असलेल्या पुरातन मंदिराची कथा आज वाचणार आहोत. हे “त्रिशुंड गणपती मंदिर”
सोमवार पेठेत असून ते पेशवेकालीन आहे. उंच जोत्यावर बांधलेले आहे कारण खाली तळघर आहे. जप तप साधनेसाठी ते बांधले असावे असे वाटते. मंडपात तळघरात जाण्यासाठी उजवीकडे व डावीकडे जिने असलेले दिसतात.
मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरु गोस्वामी महाराज यांची समाधी तळघरात आहे. गुरू पौर्णिमेच्या दिवशी यापैकी एक दरवाजा उघडून तळघरात समाधीच्या दर्शनासाठी जायला भक्तांना मुभा असते. गोस्वामी यांनी ते बांधल्याचा इतिहास आहे.
ह्याचे वैशिष्टय म्हणजे इथली गणपतीची मूर्ती तीन सोंडेंची, सहा हातांची आहे.गर्भगृहात ती मोरावर बसलेली आहे.
रिद्धी सिद्धी ही बाजूला दिमाखाने उभ्या आहेत. तीनही शिल्प काळ्या पाषाणातील आखीव रेखीव अप्रतिम आहेत. मूर्ती मागे साडेतीन फूट उंचीची शेषशाही विष्णूची मूर्ती आहे. ह्या सर्व मूर्ती अतिशय रेखीव व लोभसवाण्या आहेत. त्रिशुंडाची उजवी सोंड मोदकपात्रास स्पर्श करणारी मधली सोंड पाटावर रुळणारी तर डावी सोंड मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीस स्पर्श करणारी आहे.

मंदिराच्या आतील शिल्पकामे अद्वितीय अशी आहेत. यात शिव पार्वती गंगा नंदी सिंह अशी अनेक शिल्पे आहेत. दर्शनी भागातील बंदूकधारी इंग्रज आणि साखर दंडातले गेंड्याचे शिल्प पाहून आपल्याला आश्चर्यच वाटते. मंदिर बांधणीच्या काळात इंग्रजांनी आसाम बंगाल हा भाग ताब्यात घ्यायला सुुरवात केली होती. त्याचे प्रतीक या शिल्पात उमटले असावे असे इतिहास सांगतो.

मठ आणि मंदिर या स्वरूपातले एकमेवाद्वितीय असे हे पुण्यातील मंदिर आहे. शीलालेखात असणाऱ्या उल्लेखानुसार इथे भगवान शंकराचे रामेश्वर नामक मुळ मंदिर असावे. तर दुसऱ्या एका शिलालेखातील उल्लेखाप्रमाणे श्री दत्ताचे मंदिर असावे असे वाटते. पण प्रत्यक्षात ते त्रिशुंड गणेशाचे स्थान आहे. आहे की नाही मजेशीर आणि हटके गोष्ट !
तर मंडळी आता पुण्याला जेंव्हा जाल तेंव्हा नक्कीच या मंदिराला भेट देऊन या.
क्रमशः

— लेखन : मीरा जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800