“राजुरेश्र्वर गणपती मंदिर, जालना”
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. अगाध, असीम श्रद्धा भक्तीचे स्थान. तो दुःख निवारक, संकटनाशक आहे असा विश्वास आहे. गणपतीला समर्पित अशी अनेक पुरातन मंदिरे महाराष्ट्रात आहेत. ही सर्व मंदिरे श्रद्धा, अध्यात्माचे दीपस्तंभ आहेत.
प्रत्येक मंदिराच्या स्वतःच्या दंतकथा आहेत, ज्यामुळे विस्मय आणि आदराची भावना निर्माण होते. ही मंदिरे म्हणजे खोलवर रुजलेल्या परंपरांना मूर्त रूप देणारे सांस्कृतिक खजिनेच आहेत जणू.
असेच एक मंदिर म्हणजे जालन्यातील श्रीक्षेत्र राजुराचे श्री राजुरेश्वर गणपती मंदिर. हे एक इतिहासकालीन मंदिर आहे. राजुरेश्वर हे साडेतीन पिठापैकी एक संपूर्ण शक्तीपीठ आहे. नाभिस्थान आहे, असे गणेश पुराणामध्ये मानले गेले आहे. विघ्न टाळण्यासाठी व इच्छापूर्तीसाठी अनेक वेळा नवस बोलले जातात. आराधना भक्ती केल्यानंतर राजुरेश्वर हमखास विघ्न टाळतो, इच्छापूर्ती करतो अशी अढळ श्रद्धा आहे. अनेक भाविकांना याचा प्रत्यय आलेला आहे. संकष्टी अंगारिका गणेश चतुर्थीच्या वेळेस लाखो भाविक लोक मराठवाड्यातून राजुरेश्वराला येत असतात. येथून नेलेल्या मूर्तीची घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रतीस्थापना केली असता ते पवित्र मानले जाते.
यादव काळानंतर पेशवाईत या मंदिराची लोकप्रियता वाढत गेली. पेशव्यांचे आराध्य दैवत असल्याने पहिल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराला नऊ क्विंटल ची पंचधातूची घंटा अर्पण केली आहे. आजही ती घंटा येथे पहावयास मिळते.

गणेश पुराणात याची एक कथा सांगितलेली आहे. वरण्येश्वर नावाच्या राजाला अपत्य नसत्याने त्याने गणेशाची आराधना केली. त्याच्या भक्तीने श्री गणेश प्रसन्न झाले. राजाला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. यथाशक्ती राजाला पुत्र झाला. मात्र तो कुरूप असल्याने राजाने त्याला वनात सोडून दिले. वनात या मुलाचा संभाळ अगस्ती ऋषींनी केला. त्यांच्या देखरेखी खाली सर्व विद्येचे शिक्षण दिले. पुढे याच मुलाने ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या सिंदुरासुराचा वध केला. त्यांचे अवशेष चारही दिशांना फेकून दिले. हे अवशेष ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी श्री गणेशाची साडेतीन पीठे निर्माण झाली. त्यापैकीच एक राजुरेश्वर देवस्थान. राजाला आपली चूक कळली व तो अगस्ती ऋषींना शरण गेला. आपल्या मुलाला या गडावर आणलं आणि राज्याभिषेक केला तो वरण्य राज्याचा पुत्र म्हणजेच हा राजुरेश्वर गणपती. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात येथे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाद्वारे राजुरेश्वराचा जन्मोत्सव निमित्त मोठी यात्रा भरते.
या मंदिराचे पुनरुज्जीवनाचे बांधकाम सध्या चालू आहे. अशी अनेक पुरातन गणपती मंदिरे आपल्या महाराष्ट्रात आहेत.
क्रमशः

— लेखन : मीरा जोशी.
— संपादन: देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800