महानुभव पंथाच्या तीर्थस्थान जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र भगवान श्री चक्रधरस्वामी यांच्या कृपेने तसेच दानशूर सद्भक्त यांच्या सहकार्याने आणि पंथातील संत महंतांच्या मार्गदर्शनामुळे महानुभाव पंथाच्या देशभरातील एकूण १६५० तीर्थस्थानांपैकी २५० पेक्षा अधिक स्थानांच्या जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण होऊ शकले अशी माहिती देऊन यापुढे देखील तीर्थस्थानांच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरूच राहील’ अशी ग्वाही महंत कापूसतळणीकर बाबा यांनी दिली. ते अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या सहकार्याने व नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने आयोजित भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती महोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अंतर्गत नाशिक जिल्हा महानुभाव समिती यांच्यावतीने महानुभाव पंथाचे संस्थापक व मराठी भाषेचे आद्य प्रणेते भगवान श्री चक्रधर स्वामी अवतारदिन तथा जयंती महोत्सव व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अंतर्गत नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने गेल्या ५६ वर्षापासून अखंडपणे भगवान श्री चक्रस्वामी अवतारदिन तथा जयंती उत्सव साजरा केला जातो. जयंती उत्सवाचे यंदाचे ५७ वर्ष आहे. स्वामींचा अवतार दिन तथा जयंतीचा मुख्य कार्यक्रम धर्मसभा व सत्कार सोहळा गुरुवारी, दि. २८ रोजी पंचवटी परिसरातील कोणार्कनगर येथील श्री पंचकृष्ण लॉन्स येथे संपन्न झाला. यानिमित्त पहाटे ६ वाजता देवास मंगल स्नान, श्रीमद्भगवद्गीता पाठपारायण, सकाळी ९ वाजता ध्वजारोहण, त्यानंतर सभामंडप उद्घाटन आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यानंतर आयोजित धर्मसभेत अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महामंत्री महंत कापूसतळणीकर बाबा (फलटण); महंत मुधोव्यास बाबा शास्त्री (वरोरा, चंद्रपूर); भागवताचार्य महंत चिरडे बाबा (निफाड); महंत तळेगावकर बाबा शास्त्री (साळवाडी, पुणे); महंत कृष्णराज बाबा पंजाबी (शिक्रापूर, पुणे), महंत परमपूज्य आत्याबाईची (छ. संभाजी नगर ) यांची व्याख्याने झाली. या सर्वांनी भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे कार्य तत्वद्न्यान, त्यांचे कार्य सध्याच्या काळात समाजासाठी किती उपयुक्त आहे, याची आपापल्या व्याख्यानात मांडणी केली.
माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी त्यांच्या मनोगतात राज्य शासनाच्या वतीने महानुभव पंथाच्या विविध कार्यासाठी कोट्यावधीचा निधी देण्यात आला असून रिद्धपूर येथे मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ स्थापन झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष महंत सुकणेकर बाबा यांनी अध्यक्षीय समारोप केला. व्यासपीठावर विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. आभार प्रदर्शन महंत गोपीराज शास्त्री सुकणेकर यांनी केले.
याप्रसंगी स्थानजिर्णोद्धार यासह विविध ग्रंथांचे संत महंत आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. माजी आमदार बाळासाहेब यांच्या हस्ते आहे संत, महंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. त्यानंतर १२ वाजता विडाअवसर, महापूजा, आरती व उपहार आदि कार्यक्रम संपन्न झाले.
कार्यक्रमास विविध संत, महंत, उपदेशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
