Thursday, September 4, 2025
Homeसेवाहव्यात अशा शाळा, असे शिक्षक !

हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !

त्या शाळेचा पट आता उरला होता जेमतेम चौदा ! शाळा पहिली ते सातवी पर्यंत. तशी शाळा खूप जुनी. म्हणजे इमारतीलाच जवळपास दिडशे वर्षे होऊन गेलेली. परंतु अजूनही ते ब्रिटिश कालीन बांधकाम जसेच्या तसे. फक्त आता माकडांनी उच्छाद मांडल्याने कौले फुटून पावसाळ्यात त्यातून पाणी गळायचे. भिंती जुन्या काळच्या दगडी, उंचच्या उंच.. पावसाळ्यात कोण छपरावर चढेल..

दिवस मे महिन्याचे.. माकडांनी बरीच कौले फोडून ठेवलेली. आताच ती बदलली नाहीत तर पावसाळ्यात काही खरे नव्हते..!! त्यामुळे नवीनच आलेले दोन तरुण शिक्षक काही उत्साही पालकांना घेऊन शिड्या लावून त्या उंच छपरावर चढून नवीन कौले बसविण्याचे काम करीत होते. आतापर्यंत पालकांनी आणि शिक्षण खात्यानेही दुर्लक्षिलेल्या शाळेत, ही लगबग पाहून येणारे जाणारे नागरिक किंचित थबकून आश्चर्याने पाहत आणि ‘सांप्रती हा कोण नवा अवतार अवतरला..’ असे म्हणून पुढे जात..

त्या नव्या अवतारांचे नाव होते श्री. संतोष घोटुकडे सर आणि श्री. सुनील बैकर सर..!!

तर मंडळी एका तालुक्याच्या मुख्य ठिकाणच्या या शाळेचे नाव “रायगड जिल्हा परिषद” मराठी शाळा, तळे.

गावात एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेने आता चांगलेच बाळसे धरले होते आणि गावातीलच संस्थेची एक सेमी इंग्लिश मिडीयम शाळाही चालू होती. त्यामुळे या गरीब बिचाऱ्या जिल्हा परिषद शाळेत कोण मुले पाठवणार.. आसपासच्या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा असेच आचके देत चालू होत्या. त्यामुळे हे आता असेच चालणार.. आणि एके दिवशी ही शाळा इतिहास जमा होणार हे सत्य गावातील लोकांनी स्वीकारले होते !!

हल्ली इतिहास हा फक्त मतलबापुरता उरला असल्याने या शाळेचाही इतिहास कोणाला ज्ञात असण्याची शक्यता नव्हतीच !!

रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि स्वतंत्र भारताचे अर्थमंत्री, पद्मविभूषण डॉ. सी .डी. देशमुख यांनी ज्या दगडी शाळेत पहिली मुळाक्षरे गिरविली आणि इयत्ता चौथी पर्यंत ते ज्या शाळेत शिकले तीच ही शाळा हे आता फारसे कोणास माहीत असण्याचे कारण नाही.. असो..

तर मंडळी आज शिक्षण क्षेत्राची किती वाताहत झालेली आहे, आणि शाळा आणि शिक्षण हे सुद्धा धंदा झालेला आहे हे आपण पाहत असतानाच अजूनही काही ध्येय वेडे शिक्षक इथे उरलेत हे पाहून प्रचंड आश्चर्य वाटते आणि आशेचे किरण दिसू लागतात.

वर उल्लेख केलेले श्री. संतोष घोटुकडे सर इथे आले तेंव्हा शाळेच्या पटावर फक्त चौदा मुले उरली होती. पहिली ते सातवी शाळा आणि चौदा विद्यार्थी..!! त्यांनी जीवाचे रान केले आणि विद्यार्थी संख्या पन्नास वर नेली. त्यासाठी उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षण, अगदी सुरुवाती पासून उत्तम इंग्लिश शिकविणे, पालकांचा प्रत्यक्ष सहभाग आणि चोवीस तास विद्यार्थ्यांसाठी देण्याची तयारी हे त्यांचे गुण उपयोगी पडले.

सुनील बैकर सर

त्या नंतर श्री. सुनील बैकर सर हे मुख्याध्यापक म्हणून आले. वर्ग सात..शिक्षक दोन.. समोर आव्हानांचा डोंगर.. परंतु श्री. सुनील बैकर सर हे एक ध्येय वेडे शिक्षक !! दोन हजार एकोणीस साली श्री. सुनील बैकर सर यांची जिल्हा परिषद तळे मराठी शाळेत बदली झाली आणि या आमच्या ऐतिहासिक शाळेचे नशीब पालटले. अर्थात तेंव्हा कोणाला याची जाणीव झाली असण्याची शक्यता नाही.. एक नियमित बदली म्हणून आलेला हा मुख्याध्यापक.. किती दिवस उत्साह दाखवतो ते पाहू.. असाच एकूण आविर्भाव असावा..

परंतु आता इतिहास घडणार होता.. श्री. सुनील बैकर सर यांनी आता संकल्प केला होता की या शाळेला मी गतवैभव प्राप्त करून देईन. आव्हान प्रचंड मोठे होते. येणारे विद्यार्थी निम्न स्तरातील होते. पालक शैक्षणिक बाबतीत फारशी मदत करू शकणार नव्हते. स्पर्धा दोन प्रस्थापित शाळांशी होती. स्पर्धा आजिबात तुल्यबळ नव्हती. त्यातच आता श्री. संतोष घुटुकडे सरांची सांगलीला बदली झाली. आव्हान अधिक खडतर झाले !

परंतु हार मनातील ते बैकर सर कसले !! त्यांनी विचार केला, जिल्हा आणि राज्य स्तरावरील स्पर्धा परीक्षा हे आता आपले लक्ष.. बस्स.. ध्येय निश्चित झाले.. परंतु जिथे सामान्य वार्षिक परीक्षा देणे ज्या विद्यार्थ्यांना अवघड आहे, अशा विद्यार्थ्यांना थेट स्पर्धा परीक्षांचे आव्हान कितपत पेलवेल हा मोठा प्रश्न होता.

आता श्री. सुनील बैकर सर यांची कसोटी होती. त्यांनी हे आव्हान स्वीकारले. आठवड्याचे सातही दिवस. एकही सुट्टी न घेता विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांचे वर्ग सुरू झाले. श्री.सुनील बैकर सर यांनी एक यज्ञ आरंभीला होता. त्यात स्वतःच्या खासगी आयुष्याची आहुती त्यांनी आनंदाने दिली होती. उद्दिष्ट एकच होते,इतर दोन्ही शाळांनी आजवर एकही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण करून दाखविला नव्हता.मी हे करून दाखवीन !

आणि मग जे घडले तो इतिहास आहे !!

आज रा. जि. प. मराठी शाळा तळे या शाळेचे पंचवीस विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालयात शिक्षण घेत आहेत..!! या बाबतीत शाळेने केवळ तालुक्यात नाही तर जिल्ह्यात टॉप केले आहे !! त्या शिवाय साठ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून पैकी तीस विद्यार्थी मेरिट मध्ये आले असून त्यांना राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळते !! वर्ष २०२४ – २५ मध्ये चोवीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते, पैकी अठरा उत्तीर्ण झाले आणि नऊ जणांना स्कॉलरशिप मिळाली !! आर टी एस रायगड परीक्षेत दोन विद्यार्थी यशस्वी झाले. गणित संबोध, होमी भाभा बाल वैज्ञानिक, मंथन प्रज्ञाशोध या परीक्षांमधूनही विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविले. पैकी एका परीक्षेत जिल्ह्यातील तीस यशस्वी विद्यार्थ्यांपैकी फक्त एक विद्यार्थी म्हणजे विद्यार्थिनी जिल्हापरिषद शाळेतील होती.. बाकी सर्व खासगी शाळेतील होत्या.. आणि ती विद्यार्थिनी आपल्या तळे शाळेतील होती..!!

सुनील बैकर सर २०१९ साली आले आणि लगेच २ शिक्षक येथून बदलून गेले. वर्ग १ ते ७ आणि शिक्षक दोन.. बाजूला दोन खाजगी शाळा.. त्यांच्याशी स्पर्धा करायची तर शिक्षक संख्या वाढवावी लागणार म्हणून तूर्त का होईना शिक्षक मिळावेत अशी त्यांनी प्रशासनाला विनंती केली. ती प्रशासनाने मान्य केली. पालकांचा अढळ विश्वास आणि स्पर्धा परीक्षेत दिसलेली गुणवत्ता या बळावर कमी शिक्षक असूनही यश मिळत गेले. आज एकशे आठ विद्यार्थ्यांचा पट आहे. पूर्वी मुलींची असलेली शाळेची इमारत आता या शाळेला मिळाली आहे. तिचे नूतनीकरण समाजसेवक रायगड भूषण कृष्णाजी महाडिक यांच्या सहकार्याने घडवून आणून एक आकर्षक इमारत आता तेथे तयार झाली आहे. सुसज्ज सभागृह, ऑफिस, सी सी टीव्ही, स्टीलची टेबल्स, या सारख्या विविध भौतिक सुविधा त्यांनी ट्रस्ट च्या माध्यमातून पुरवल्या त्यामुळे पालकांचा ओढा वाढला.

सन २०१९ अगोदर ज्या शाळेला स्पर्धा परीक्षा माहित नव्हती ती शाळा आज जिल्ह्यात टॉपची शाळा आहे.. म्हणूनच ती एक अद्भुत शाळा आहे.. शिक्षणासाठी सर्वस्व वाहिलेल्या त्यागी शिक्षकांची ही एक कथा आहे.. बदनाम झालेल्या शिक्षण खात्याविषयी आपुलकी निर्माण करणारी ही सफल कहाणी आहे.. अगदी एक किंवा दोन झपाटलेले शिक्षक कसे आणि किती परिवर्तन घडवून आणू शकतात याचे हे चालते बोलते उदाहरण आहे !!

दिनांक १८ ऑगस्ट २५ रोजी या माझ्या शाळेत.. जिथे मीही माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला त्या माझ्या या शाळेत, प्रमुख पाहुणा म्हणून या सर्व स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला जाण्याचा योग आला.चौपन्न वर्षांनी मला पुन्हा शाळेत जाता आले आणि शाळेचे हे यश समजले.. अक्षरशः छाती अभिमानाने भरून आली.

आज शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. सुप्रिया जामकर, केंद्र प्रमुख श्री. मुबिन वासकर सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.भास्कर गोळे.. आणि या सर्व यशाचे सूत्रधार श्री. सुनील बैकर सर यांच्या हातात आमची शाळा सुरक्षित आहे.

सध्या श्री. सुनील बैकर सर यांना जिल्ह्यातून प्रचंड मागणी आहे. खात्याने त्यांचा रायगड जिल्ह्याचे आयडॉल शिक्षक म्हणून गौरव केला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी थेट रोह्या पासून कर्जत पर्यंत असे त्यांचे दौरे चालू असतात. जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्यासी द्यावे या उक्ती प्रमाणे त्यांचे हे ज्ञान दानाचे कार्य चालू आहे !

आज ना उद्या श्री. सुनील बैकर सर येथून बदलून जाणार. ते अपरिहार्य आहेच.. परंतु त्या नंतर सौ. मितल वावेकर सारख्या कार्यक्षम शिक्षिकेच्या हाती किंवा श्री. सुनील बैकर सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या इतर नवीन पिढीकडे आता पुढील सूत्रे असतील. आणि अत्यंत समर्थ पणे ही नवी टीम ती पेलतील हे ही नक्की..

शाळेतून निघताना, मनात विचार आला, देशातील सर्व शाळा अशा हव्यात आणि सर्व शिक्षक बैकर सरांसारखे हवेत, तर आपल्या देशाला महान होण्यापासून कोण रोखू शकेल ?

सुनील कुळकर्णी

— लेखन : सुनील कुळकर्णी. तळे, जिल्हा रायगड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ,
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

8 COMMENTS

  1. सुनील बैकर सरांवर लिहिलेला हा लेख वाचून खूप आनंद झाला. ते फक्त उत्तम शिक्षकच नाहीत तर खरी प्रेरणा आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी केलेलं योगदान अतुलनीय आहे. वैयक्तिकरित्या मला विशेष अभिमान वाटतो कारण सर माझे मामा आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवी पिढी घडते आहे, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.🙏♥️

  2. रायगड मधील सहकारी मित्र यांनी केलेलं काम अतिशय वाखण्याजोग आहेत कारण मराठी शाळा ही पटसंख्या कमी होत असताना सरांनी केलेलं जे कार्य आहेत ते अजूनही आहे हे कार्य करताना त्यांनी जो मुलांच्या प्रती असणारा प्रेम आपुलकी व जिव्हाळा जोपासून विद्यार्थ्यांची सर्वोत्तम प्रगती करणे हे एकमेव ध्येय ठेवून असा हा ध्येयवेळा शिक्षक यांनी केलेले कार्य हे खरोखर कौतुकास्पद आहेत आणि तो आमचा खरा मित्र आहे याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे बेकर सर असेच आपण उत्तरोत्तर आपल्या हातून नवोदय आणि शिष्यवृत्ती मध्ये अतुलनीय असे कार्य घडो त्यासाठी खूप खूप सदिच्छा
    आपलाच मित्र
    श्री सचिन घाटे
    सांगली

  3. श्री. बैकर सर म्हणजे ऊर्जेचा अखंड स्रोत आहे.त्यांचे शिक्षणक्षेत्रातील कार्य खूपच प्रेरणादायी आहे. त्याची विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ ही वाखणन्या जोगी असते. त्यांच्या कार्यास सलाम
    🙏🙏🙏🙏

  4. शाळा विद्यार्थी यांच्यासाठी सतत झटणारा शिक्षक म्हणजेच माझा मित्र श्री सुनील बैकर सुरुवातीपासूनच विद्यार्थी गुणवत्तेला प्राधान्य देऊन आपल्या शिक्षकी पेशाला आपल्या गावातूनच सुरुवात केली ज्या गावात आपण स्वतः शिकलो त्याच ठिकाणचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक आणि ते सातत्याने अशी परंपरा सुनीलने कायमच ठेवले त्यानंतर सोनसडे तळे मराठी या शाळांमध्ये परंपरा कायम ठेवली शिष्यवृत्ती व नवोदय या परीक्षा मधील यशाबद्दल रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षक बायकर सरां कायमच अभिनंदन करत आले आहेत परंतु तळे मराठी शाळेमध्ये शहरातील शाळा तसेच घटत चाललेली पटसंख्या या सर्वांचे आव्हान पेलत सुनील हे काम आपल्या वैयक्तिक कामापेक्षा शाळेला महत्त्व देऊन केलं त्यामुळेच हे सर्व शक्य झाले तळे मराठी शाळेला सुवर्णक्षण मिळवून दिल्याबद्दल श्री सुनील बैकर सर यांचे हार्दिक अभिनंदन

  5. खरंच श्री. बैकर सर यांचे शैक्षणिक काम कौतुकास्पद आहे गेली 23 वर्ष तळा तालुक्यामध्ये ज्ञानदानाचे काम करत आहेत 2003 ते 2009 या काळात मी सुद्धा रायगड जिल्ह्यामधील तळा तालुक्यातील महागाव केंद्रामध्ये त्यांच्या अध्यापनाचे कार्य जवळून पाहिले आहे. त्यावेळी बायकर सर त्यांच्या स्वतःच्या गावात ज्ञानदानाचं काम करत होते त्यावेळी ते स्वतः सकाळी आठ पासून शाळेत मुलांना घेऊन बसायचे. त्यावेळी त्यांच्या शाळेतील मुलांना 30 पर्यंतचे पाढे पाठांत असायचे. बैकर सर खरंतर स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्त्व आहे त्यांना एखादी गोष्ट खटकली तर ते समोर अधिकारी असले तरी आपल्या मतावर ठाम असायचे. मी जिल्हा बदलीने कोल्हापूर या ठिकाणी आल्यानंतर शिष्यवृत्ती व नवोदय यासारख्या परीक्षांचे मार्गदर्शकाची भूमिका बजावली. शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये आमचा कोल्हापूर जिल्हा व भुदरगड तालुका राज्यात सतत पहिला येत असतो. पण त्याचा त्याचा अभिमान बाळगत मी श्री बैकर सरांचा शिष्यवृत्ती चा निकाल आमच्या तालुक्यातील माझ्या सर्व मित्रांना अभिमानाने दाखवत असतो. कारण शैक्षणिक वातावरण नसतानाही त्या ठिकाणी आपल्या कामाच्या बळावर बंद पडायच्या मार्गावर असलेली शाळा सरांनी आपल्या उत्तुंग अशा शैक्षणिक कार्यातून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नावालौकिकास आणली आणि त्यामुळेच रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला. तसेच रायगड जिल्हा परिषदेचा आयडॉल शिक्षक म्हणून त्यांची शिफारस करण्यात येत आहे. यापुढील काळात त्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान व्हावा आमच्यासारख्या मित्रांना अभिमानाने बैकर सर माझे मित्र आहेत असे सांगण्याचा योग यावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. भविष्यात त्यांच्या या उत्तुंग कार्यातून अनेक बहुजनांची मुले शिकून मोठी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.

  6. आपण स्वतः जातीने उपस्थित राहून शाळेचे केलेले वर्णन अतिशय रोखठोक आणि खरीखुरी परिस्थिती दर्शविते. एक ध्येयवेडा शिक्षक आपल्या प्रयत्नांतून शाळेचा कशा प्रकारे कायापालट करू शकतो याचे दर्शन आपण आपल्या शब्द प्रपंचातून करून दिले आहे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. मी स्वतः तळा केंद्राचा केंद्रप्रमुख या नात्याने श्री बैकर सर व त्यांच्या सहकाऱ्यांची शाळेप्रती असणारी धडपड पहात असतो आणि शक्य असेल तेवढे सहकार्य करतो.

  7. आपण एका ध्येयवेड्या शिक्षकाबद्दल लिहिलेला हा लेख वाचून खूप खूप आनंद झाला. आजच्या या युगात चांगलं काम करून सुद्धा एखाद्याचे कौतुक करणे ही गोष्ट फार दुर्मिळ झाली आहे. चांगल्या गोष्टींचे कौतुक झाले तर करणाऱ्या व्यक्तीस चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते. ती ऊर्जा आपण या लेखाच्या माध्यमातून बैकर सरांना दिली आहे . बैकर सरांकडून खूप गोष्टी शिकण्यासारखे आहेत. मराठी शाळेला त्यांनी संजीवनी प्राप्त करून दिली. आज छोट्या शहरातील बऱ्याच शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना वेळ पैसा या गोष्टीचा विचार न करता,त्यांनी हे केलेले कार्य हे एक अलौकिक कार्य म्हणता येईल .शिक्षण क्षेत्रातले त्यांचे योगदान तर खूप मोलाचे आहे.तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपल्या आईच्या नावाने संस्था काढून अनेक चांगले उपक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
    त्यांच्या कामाचे करू तेवढे कौतुक कमीच आहे त्यांना त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गणपती : युवकांचा पुढाकार
Nitin Manohar Pradhan on हलकं फुलकं
जयश्री चौधरी on श्री गणेश : ४
श्री सुहास नारायण चांदोरकर, माणगाव रायगड on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !