“प्रेमचंद”
‘कलम के सिपाही’ व ‘उपन्यास सम्राट’ ही मुंशी प्रेमचंद यांची पुस्तके हिंदी विश्व साहित्यात फार लोकप्रिय आहे. हिंदीचे श्रेष्ठ साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती आहे.
विशेष सांगायचे म्हणजे भारतीय स्वातंत्र्यानंतर ज्यांनी ज्यांनी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण घेतले आहे त्यांना प्रेमचंदांचे नांव माहिती नाही असे म्हणता येणार नाही. प्रत्येकांनी प्रेमचंदच्या अल्प प्रमाणात का होईना कथांचा अभ्यास केला आहे. तसेच भारतातील प्रत्येक शहरातील रेल्वे स्टेशन व बस स्थानकावरील बुक स्टॉलवर प्रेमचंद यांच्या कादंबऱ्या आणि कथा विक्रीसाठी अल्प दरात उपलब्ध आहेत. अशा या लोकप्रिय लेखकाचा जन्म दि.३१ जुलै १८८० रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) येथून जवळच चार मैल अंतरावर असलेल्या ‘लमही’ या गावी झाला. प्रेमचंद हे नाव त्यांचे टोपण नाव आहे. इंग्रज सरकारने १९१० मध्ये ‘सोजे वतन’ हे पुस्तक जप्त करुन जाळण्यात आले तेंव्हा त्यांनी प्रेमचंद हे नाव धारण केले आणि या नावाने लेखन केले.

प्रेमचंद यांचे मुळ नाव ‘धनपतराय’ हे होते. तर त्यांच्या वडिलांचे नाव ‘अजबराय श्रीवास्तव’, आईचे नाव ‘आनंदी देवी’ असे होते. अजबराय हे पोस्ट ऑफिस मध्ये क्लर्क होते. आनंदी देवी गृहिणी होत्या. प्रेमचंद यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावीच झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांना वाराणसी येथे जावे लागले. १९०५ मध्ये अध्यापनाची ट्रेनिंग घेतली. ते इसवी सन १९१० मध्ये इंटर पास झाले. १९१९ मध्ये बी.ए. उत्तीर्ण झाले. बी.ए.पर्यंत त्यांचा फारसी हा एक विषय होता.
प्रेमचंद यांना लहानपणापासूनच आर्थिक विवंचनेत दिवस काढावे लागले. शेती हा त्यांच्या घरचा मुख्य व्यवसाय होता. त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी आईचे निधन झाले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. पहिला विवाह असफल झाला म्हणून त्यांनी दूसरा विवाह बालविधवा ‘शिवरानी देवी’ यांच्याशी केला.
प्रेमचंद यांच्या साहित्यिक जीवनाचा आरंभ 1901 मध्येच झाला होता. त्यांनी प्रथम उर्दूमध्ये लेखन सुरू केले. त्यांची पहिली कथा ‘संसार का अनमोल रतन’ १९०७ मध्ये ‘जमाना’ मासिकात प्रकाशित झाली.
१९०८ मध्ये त्यांनी प्रथम उर्दू कहाणी संग्रह ‘सोजे वतन’ प्रकाशित केला. १९३० मध्ये त्यांनी ‘हंस’ नावाचे मासिक सुरू केले. तसेच त्यांनी जागरण, मर्यादा वृत्तपत्र चालवली. पुढे ‘हंस’ हे मासिक त्यांचे पुत्र अमृतराज, नंतर राजेंद्र यादव आणि आता रचना यादव चालवत आहे. ८ ऑक्टोबर १९३६ ला प्रेमचंद यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
कथाकार कादंबरीकार म्हणून प्रेमचंद प्रसिद्ध आहेत. प्रेमचंद हे जसे श्रेष्ठ कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच ते श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून ही ख्यातीप्राप्त आहेत. जवळ जवळ त्यांनी ३०० कथा लिहिल्या ज्या ‘मानसरोवर’ शिर्षकाने आठ खंडात प्रकाशित झालेल्या आहेत. नमक का दरोगा, प्रेम पच्चीसी, प्रेमप्रसून, प्रेम द्वादशी, प्रेम प्रमोद, पांच फुल, नवजीवन, शांती हे त्यांचे प्रसिद्ध कथा संग्रह आहेत.

प्रेमचंद यांनी सेवासदन, प्रेमाश्रय, निर्मला, रंगभूमी, गबन, कर्मभूमी, गोदान, मंगळसूत्र (अपूर्ण) इ.कादंबऱ्या लिहिल्या. संग्राम, कर्बला, प्रेम की बेदी इ.नाटके लिहिली. तसेच अनेक विश्व प्रसिद्ध रचनांचे हिंदी अनुवाद केले.
कथेची व्याख्या करताना प्रेमचंद म्हणतात की, “कहानी में जीवन के किसी एक छोटे से हिस्से या एक मनोभाव को दर्शाया जाता है. कहानी का कथानक, चरित्र और शैली उसी एक मनोभाव को मजबूत करती है, न कि मानव जीवन के संपूर्ण रूप को दर्शाती है.” तद्वतच कादंबरी विषयी ते लिहितात, “मैं उपन्यास को मानव जीवन का चरित्र मात्र समझता हूं. मानव चरित्र पर प्रकाश डालना और उसके रहस्यों को खोलना ही उपन्यास का मूल तत्व हैं.” अर्थात कथा ही मानवी जीवनातील एक छोटासा अंश आहे वा एक मनोभाव दर्शविते आणि कथानक, चरित्र व शैली त्याच एका मनोभावनेला दृढ बनवते.
येथे प्रेमचंद यांच्या काही कथा आणि कादंबऱ्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. ईदगाह, पुस की रात, पंच परमेश्वर, सद्गती, कफन, ठाकुर का कुंआ, नशा, बुढी काकी, नमक का दरोगा, गुल्ली डंडा इ.सुप्रसिद्ध कथा आहेत. ‘पूस की रात’ प्रेमचंद यांच्या श्रेष्ठकथांपैकी एक आहे. ही कथा शेतकऱ्यांचा जीवनावर आधारित समस्या प्रधान अशी महत्वपूर्ण कथा आहे. प्रेमचंद यांच्या भाषेत सांगायचे झाले तर त्यांची ‘गोदान’ कादंबरी’ शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित वृत्तांत आहे. तर ‘पूस की रात’ ही कथा शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित एक छोटासा कथाभाग आहे. ही कथा ‘कलम का सिपाही’च्या मते, मे १९३० मध्ये ‘माधुरी’ या मासिकात प्रसिद्ध झाली आहे. या कथेचा विकास ‘गोदान’ ही कादंबरी आहे. ही कथा शेतकऱ्यांच्या अभावग्रस्ततेचे आणि ऋणग्रस्ततेचे प्राथीनिधीक रूप आहे. भारतीय शेतकरी शेकडो वर्षांपासून ऋणग्रस्तता आणि शोषणाचा स्वीकार होत आलेला आहे.
शेतकरी हा आधिपासूनच जमीनदार, सेठ-सावकार, विदेशी आक्रमण करणाऱ्यांकडून शोषित, ग्रसीत आणि त्रस्त झालेला आहे. स्वातंत्र्य काळात शेतकरी राजनेत्यांकडून चुकीची धोरण, चुंगी नाका टॅक्स, आडती आणि दलाल व्यापारी यांच्याकडून शिकार होत गेला आहे. भारतीय शेतकऱ्यांना नेहमी काही ना काही संकटांना तोंड द्यावे लागते. कधी नैसर्गिक संकट तर कधी मानवनिर्मित तर कधी पशु-पक्षी यांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी या संकटांना सुद्धा सामोरे जावे लागते. म्हणून भारतीय शेतकरी नेहमी आर्थिक संकटात व दारिद्रयात आपले जीवन जगत असतो.
प्रेमचंद यांची ‘पुस की रात’ ही कथा शेतकऱ्यांच्या सेठ- साहुकार आणि पशुंच्या संकटाचा सामना करताना दिसून येते. कथा नायक ‘हल्कु’ हा शेतकरी नेहमी वरील समस्यांनी ग्रस्त आणि त्रस्त होतो. शेवटी शेती विकुन शेतमजूरी करण्या शिवाय त्याच्याकडे कुठलाही पर्याय उरत नाही. ‘हल्कु’ आणि त्याची पत्नी ‘मुन्नी’ यांचा संवाद अत्यंत मार्मिक व त्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकणारा आहे. “तुम छोड दो अब से खेती, मजूरी में सुख से एक रोटी खाने को तो मिलेगी. किसी की धौंस तो नहीं रहेगी. अच्छी खेती हैं. मजूरी करके लाओ, वह भी उसी में झौंक दो, उस पर धौंस… तकदीर की खूबी है, मजूरी हम करें, मजा दूसरे रूपें.”
‘सद्गती’ ही कथा भारतीय समाजातील जाती व्यवस्थेवर कठोर प्रहार करते. लेखकाने या कथेच्या माध्यमातून भारतीय समाजातील दलितांवर होत असलेल्या अन्याय,अत्याचाराचा पर्दाफाश केला आहे. हिंदू परंपरेनुसार कथा नायक ‘दुखिया’ चांभार आपल्या मुलीच्या सोयरीकीचा मुहूर्त पाहण्यासाठी ‘पंडित घसीराम’च्या घरी जातो. तेंव्हा पंडित घासीरामची पत्नी ‘दुखिया’ कडुन गायीला चारापाणी करणे, साफसफाई करणे, शेतातील भुसा घरी घेऊन येणे, जळतनाची लाकडी फोडने इ.कामे दिवसभर करून घेतली जातात. गाठीचे लाकुड फोडता फोडता बेहोश होतो आणि शेवटी ‘दुखिया’ अन्न पाण्यावाचून तडफडून मृत्यू पावतो. परंतु पंडित वा पंडिताईन कुणालाही त्याची दयामाया येत नाही. ‘गावभर याची चर्चा होते पण कुणी पंडितांच्या घरी येण्याचे धाडस करीत नाही. ‘दुखिया’ चांभाराच्या शवाची विल्हेवाट लावण्यासाठी पण कुणी येत नाही. ते रात्रभर अंगणात पडून राहते. त्याची दुर्गंध येते. शेवटी ते शव स्वतः पंडित ‘घसीराम’ पहाटे उठून अंधारात ओढत नेऊन गावाबाहेर फेकून देतो. अर्थात दलितांवर होत असलेले अन्याय अत्याचार आणि शोषण हे आजही काही प्रमाणात समाजात पाहावयास मिळते. आम्ही एकीकडे स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केल्यानंतर दुसरीकडे आपल्या देशात दलित, आदिवासी, स्त्री, अल्पसंख्याक वर्गातील लोकांवर होत असलेला अन्याय समूळ नष्ट होत नाही. आजही हे वास्तव आम्हाला नाकारता येत नाही.
क्रमशः
— लेखन : प्रा डॉ एम डी इंगोले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800