Wednesday, September 10, 2025
Homeयशकथाझेप : २

झेप : २

अमेरिकेत झेपावलेली पुनीता !

ठाणे शहरात लहानाची मोठी झालेल्या पुनीता भडसावळे हिचे आजोबा शिक्षक होते. पुढे ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. तिची आईही मुख्याध्यापिका होती.
आजोबांना आणि आईला विद्यार्थ्यांशी एकरूप होत तळमळीने शिकवताना लहानपणापासून बघत पुनीता मोठी झाली. साहजिकच शिक्षणाचे चांगले संस्कार तिच्यावर झाले.

पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुनीता २००५ साली उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. तिने तिथे “मास्टर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग” ही पदवी प्राप्त केली. पुढे २००९ साली नोकरीच्या निमित्ताने ती टेक्सास- ऑस्टिन येथे वास्तव्यास गेली. तिथे तिचा विवाह झाला अन् ती पुनीता परांजपे झाली.

आपला समृद्ध शैक्षणिक वारसा पुढे चालवावा ही एक सुप्त इच्छा पुनीताच्या मनात कायम घर करून होती. अमेरिकेत गेल्यावर ती जास्त प्रबळ झाली. आपली संस्कृती, भाषा अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या मुलांपर्यंत पोचवावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून तिने मराठी शाळा सुरु करण्याचे ठरविले. आपण जर आपली मराठी भाषा ह्या अमेरिकन वातावरणात वाढणाऱ्या आपल्या मुलांपर्यंत नाही पोचवली तर ही समृद्ध भाषा आणि संस्कृती लोप पावेल आणि पुढच्या पिढी पर्यंत हा वारसा पोचू शकणार नाही. अशा विचारांनी आणि उद्देशाने प्रेरित होऊन जन्म झाला तो “ऑस्टिन मराठी शाळेचा”!

ऑस्टिन मराठी शाळेशी पुनीताचं नातं शाळेच्या अगदी स्थापने पासून ; ऑगस्ट २०१३ पासूनच जोडलं गेलंय. अवघ्या १२ वर्षापूर्वी काही मोजक्या अन् समर्पित स्वयंसेवकांनी लावलेल्या ह्या मराठी शाळारुपी बीजाचा आज एक वटवृक्ष झालाय ! खरंच “इवलेसे रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी” ही अभंगवाणी ऑस्टिन मराठी शाळेसाठी अगदी समर्पक ठरली. प्रथमतः ४ – ५ मुलांबरोबर चालू झालेल्या ह्या शाळेने आज ३०० पटसंख्या गाठलेय. सर्व ऑस्टिनकारांसाठी ही एक कौतुकाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे.

पुनीताने स्वतःच्या घरी ४ मुलांबरोबर ह्या शाळेची १ (दक्षिण) शाखा चालू केली. हसत खेळत मराठी शिकणे आणि आपले सणवार एकत्र साजरे करणे हाच मुख्य उद्धेश. ह्या शाळेत ९ इयत्ता आहेत. शिशु मित्र ते प्रवीण मित्र असा प्रवास करताना ही मुले अगदी अ, आ, इ, ई पासून शिकण्यास सुरुवात करून पत्र, निबंध लेखन, संधी फोड हे सगळं अगदी हसत खेळत शिकतात. आज शाळेत ५० शिक्षक आहेत. ह्यातले काही शिक्षक शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत कार्यरत आहेत. तर काही शिक्षक नवीन आहेत जे ह्या अनुभवी शिक्षकांच्या हाताखाली तयार होत आहेत. एवढंच नाही तर आपल्या मराठी शाळेचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून बाहेर पडलेले काही विद्यार्थी शिक्षक म्हणून शाळेत परत रुजू झाले आहेत.

ह्या ताई-दादांकडून शिकायला छोट्या मुलांना मज्जा येते. लहान मुलांच्या कलाने त्यांना शिकवायला ताई-दादा ना पण आवडतं!ही शाळा हे एक विस्तारित कुटुंबच आहे. पालक आणि शिक्षक एकत्रितपणे सहभागी होऊन दर रविवारी वर्ग सेटअप करतात. तर काही पालक शाळेचा पूर्ण वेळ शिक्षकांचा मदतनीस म्हणून आळीपाळीने थांबतातही. वेळोवेळी शाळेत येऊन आपले पालक वेगवेगळ्या प्रकारे शाळेमध्ये सहभागीही होतात, जसे की पर्यायी शिक्षक, शिक्षकांचा मदतनीस वगैरे. काही पालकांच्या पुढाकारामुळे आणि मदतीने शाळेचे ग्रंथालय सुद्धा चालू झालय, ‘वाचेल तो वाचेल’ हे अगदी खरं. शाळा सुटल्यानंतर मुलं पालकांबरोबर येतात आणि त्यांच्या आवडीचं पुस्तक घरी वाचायला घेऊन जातात. ही मुलं एवढ्या उत्सुकतेने पुस्तकं निवडतात आणि हवं असलेलं पुस्तक मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद काही वेगळाच असतो ! वेगळीच अपुर्वाई असते !!

आपले सणवार साजरे करत, माय मराठीचा वारसा जोपासत, आपली संस्कृती आपल्या मुलांपर्यंत पोचवण्यात शाळा सतत कार्यरत असते, मग तो गणेशोत्सव असो अथवा नवरात्र किंवा दिवाळी ! हे सगळेच सण शाळेत मुलांबरोबर साजरे केले जातात आणि मुलांना पण खूप मज्जा येते . गणपतीचा जन्म कसा झाला ते अगदी आईने कसे मोदक, खमंग लाडू आणि खुसखुशीत चकल्या केल्या होत्या ते सगळं ह्या छोट्या मुलांच्या तोंडून आणि ते सुद्धा “मराठीत” ऐकताना एकदम छान वाटते.

असा हा वसा भविष्यात वाढता रहाणारा आहे. भारतातून सातासमुद्रापार जाऊन तेथील मराठी भाषिक कुटुंबांच्या मुलांना मराठी भाषेचे शिक्षण देण्याचे बहुमोल कार्य सुरू केले आहे. घरीच शिक्षण संस्कृतीची गंगा वहात होती त्या पवित्र संस्कृतीचे काही थेंब पावलांवर पावले टाकत अमेरिकेत जिद्दीने शिंपडणे हे अनमोल कार्य पुनीता करीत आहे.
आई आजोबांचे स्वप्नं व मराठी भाषेचे ज्ञानार्जन ती अत्यंत निष्ठेने व परिश्रमपूर्वक करते. तिच्या शैक्षणिक सेवेची, मेहनतीची दखल अमेरिका येथे घेतल्या गेली असून आतापर्यंत तिला तीन पुरस्कारही दिले गेले आहेत हे निश्चित कौतुकास्पदच आहे. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

सुनील चिटणीस

— लेखन : सुनील चिटणीस.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
श्री. समीर मारुती शिर्के on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
अजित महादेव गावडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !