आजपासून दिवाळी सुरू झाली आहे. यानिमित्ताने वाचू या काही कविता. दिवाळीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
१. दिवाळी
आली दिवाळी प्रमोद उधळी l
लक्ष लक्ष दीप झगमग उजळी ll
अंगणी शोभते, सुंदर रांगोळी l
बसु बारशी, गाई पूजा आगळी ll १ ll
धनत्रयोदशी या शुभ दिवशी l
भावे पूजू सु – गुण धनराशी ll
आयु आरोग्याचे अमोल धन l
सु – मन फराळ करू जतन ll २ ll
नुकसान निराशेचा नरकासुर l
शेतकरी राजास करे चिंतातुर ll
मदत अस्त्राने तया मारू या l
दिवाळी अशी साजरी करू या ll ३ ll
भगवान महावीर मोक्षास गेले l
लक्ष्मी पूजनाचे महत्त्व आगळे ll
जगा आणि जगू द्या हा महावीर संदेश l
आचरणी आणू आपण विशेष ll ४ ll
राम राज्य देई सण पडावा l
भाऊबीजेचा प्रचंड गोडवा l
बंधू भगिनी प्रेम विश्वात बहरो l
आनंदाची दिवाळी ब्रह्मांडी लहरो ll ५ ll
— रचना : अलका मोहोळकर. पंढरपूर
२. धनत्रयोदशी
त्रयोदश्यांदीपदानात
सूर्य ज प्रयताम् मम
दीपदान करे सकला
विशेषतः पूजावा यम
मृत्यूनांदंडपाशाभ्याम्
स्वस्थायुष्य देही मम्
उजळावे दीपोत्सवाने
करा काही पुण्यकरम
धन्वंतरी देवांचा वैद्य
या शुभदिनी घे जनम्
ऋण कृतज्ञता करता
रे आनंद लाभेलं परम
लक्ष्मी देवता प्रकटली
समुद्र मंथनातून चरम
धर्मा मागे शास्त्र कळे
मिटेल तेंव्हा ते संभ्रम
सढळ हस्ते दान करी
पाळा मानवता धरम
आळसात नको जीणे
सार्थ जीवना परिश्रम
आयु अल्प सांगी यम
आखा नीट कार्यक्रम
पाप टाळ पुण्य संचय
सुनियोजित दिनक्रम
श्रेष्ठतम जीवनसुसंधी
जनम् ना माणसासम
आयुष्य करावे सुगंधी
गुणवर्धन रे ईश्वरासम
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
३. सोनपावली दिवाळी
दिवाळी आली आले उधाण आनंदाला
सण साजरा करू तोरण बांधू घरादाराला
आला सण हा भारतवर्षाचा
आनंद उत्साह नवचैतन्याचा
करवे भरले कराष्ठमीला
पुजले गायवासरू वसुबारसला
धन धनी धान्याचे पुजन
धनत्रयोदशीचे महत्त्व जाण
नरकासुराचा वध नरकचतुर्दशीला
दिप दिव्यांची रास अवस दिवाळीला
गोड स्वर कानी पडे पहाट पाडवा
घरोघरी लक्ष्मी पुजन शुभदिन पाडवा
बहिण भावास ओवाळीते दिन भाऊबीज
प्रेमाच्या नात्याचा पाहिला सोहळा साज
सुगंधी उटण्याने अभ्यंग स्नान
गोडधोड जीवनात वर्दळ पंचपक्वान्न
नवे वस्त्र नवरंग रोषणाईत घर सुशोभिले
फटाके आतषबाजी अंगण पणत्यांनी सजले
देव पहावया आले भुमी, स्वर्ग दिवाळी दिवाळी
सोनपावले उल्हासित आली दिवाळी दिवाळी
— रचना : चंद्रशेखर कासार. धुळे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800