मृगजळात अडकतो चेहरा
भासातून फसतो चेहरा
वाट त्याला गवसत नाही
दशदिशात फिरवतो चेहरा…..
ओढतात त्यालाही भूते
जी त्यालाही दिसत नाही
विसरून जाता सर्वस्व तरी
मुखवट्यात उरे ना त्या काही…
शोधायचे असते बरेचसे
तरीही शोध अर्धवट असतो
फसतात डाव ते अर्ध्यावर
शून्यात मग खाली बसतो….
चेहऱ्याआड अनेक चेहरे
तरी नेमका कोणता म्हणावा
जर गवसला खरोखरच तर !
काय ? म्हणून त्यास गणावा…
चेहऱ्यांची रूपं अनेक ती
बदलत जाती वेशीवरती
काळ रात्र वैरीणीची यावी
स्वप्न पाहताना उशीवरती……
चेहऱ्यास ठाऊक नसतेच
फसवणारे होते कैक चेहरे
खेदात आनंद शोधताना
दु:ख होत जाईल ते गहिरे…
–– रचना : माधवी प्रसाद ढवळे. राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
