कोवळं ऊन. (कथासंग्रह)
लेखिका : नीला बर्वे.
प्रकाशिका : सौ अलका देवेंद्र भुजबळ. (न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन)
प्रथम आवृत्ती : २३ ऑगस्ट २०२५
न्यूज स्टोरी टुडे प्रकाशन तर्फे लेखिका नीला बर्वे यांचा “कोवळं ऊन” हा कथासंग्रह नुकताच वाचनात आला.
या कथासंग्रहात एकूण सोळा कथा आहेत. विविध विषयांवर या कथा लिहिल्या आहेत. आयुष्य जगताना, समाजात वावरताना, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा, तेथील वातावरणाचा, मानसिकतेचा, मानवी स्वभाव वैशिष्ट्यांंचा, डोळसपणे आणि जाणीवपूर्वक वेध घेत या कथा लिहिल्या गेल्या आहेत हे जाणवतं. शिवाय अत्यंत साध्या, सोप्या, सरळ पण प्रभावी शब्दशैलीत या कथांची मांडणी केलेली असल्यामुळे विषय आशयासकट या सर्वच कथा वाचकांपर्यंत हवा तो परिणाम साधत पोहोचतात.

“कोवळं ऊन” ही या संग्रहातील पहिलीच शीर्षक कथा. मूल होत नाही म्हणून अनाथ आश्रमातून दत्तक घेतलेल्या एका दांपत्याची ही भावनिक कथा आहे. आश्रमाच्या नियमाप्रमाणे दत्तक मुलीस “आम्ही तुझे खरे आई वडील नाहीत” हे सांगण्यासाठी मनाची तयारी करत असतानाचा हा एक कष्टदायी मानसिक प्रवास या कथेत वाचायला मिळतो.
“अंतरीचे बंध” ही हृदयाला भिडणारी अशी कथा आहे. पती-पत्नीच्या प्रेमाच्या नात्याची एक विलक्षण कथा वाचण्याचा अनुभव या कथेद्वारे मिळतो. या कथेत बद्रीधाम केदारनाथ यात्रा केल्याचाही सुखद अनुभव वाचताना मिळतो. ही एक योगायोगाची कथा आहे असेही म्हणू शकतो पण कथेचा ओघ आणि सुरुवातीपासूनच कथेची मनावर बसलेली पकड “असेही घडू शकते” हे अगदी सहजपणे मान्य करते आणि ही मान्यता म्हणजेच या कथेचं यश आहे.
“निर्णय” ही कथा तशी लहान आहे पण या कथेतला आशय मोठा आणि चांगला आहे. जीवनात आपण घेतलेल्या निर्णयावर नेहमीच इतरांची टीका होत असते. त्याकडे दुर्लक्ष करून आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून संतुष्ट कसे राहता येऊ शकते अशा प्रकारचा एक संदेश या कथेतून मिळतो.
“नाते” ही एक अतिशय सुंदर कथा आहे. लग्नाआधी जोडीदाराला अपघात झाल्यानंतरची नायिकेची मनस्थिती वर्णन करणारी आणी तिच्या निर्णयाची उत्सुकता वाढवणारी एक परिणामकारक कथा.
“मुक्त मी स्वच्छंद मी” एक अतिशय मनोरंजक अशी नवल कथा. पाळलेला एक अज्ञात पक्षी त्या मानवी परिवाराच्या सहवासात वाढतो. त्या परिवाराकडून त्याला खूप प्रेमही मिळतं पण काही दिवसांनी त्या परिवाराला त्या पक्ष्याला मुक्त करावेच लागते. का ते कथा वाचल्यावरच कळेल ना ? ही कथा वाचकांसमोर इतकी सहजतेने उलगडते की त्या पक्ष्याशी वाचकांचेही नाते जडते शिवाय एखाद्या पक्ष्याला पिंजऱ्यात बंद ठेवून त्याचं मुक्त आयुष्य हिरावून घेणे हे किती संवेदनाहीन आहे हाही संदेश या कथेतून मिळतो.एक वेगळाच विषय यात हाताळला आहे.
“हल्लीचीच एक गोष्ट” ही कथा लिव्ह इन रिलेशनशिप” विषयी असली तरी यात कोरोनाचा भयंकर काळ आणि त्या पार्श्वभूमीवर उलगडणारं प्रेम, घटना, नातेसंबंध,“आजचा आणि कालचा” यातल्या सीमारेषा ओलांडून एकेकाळच्या विरोधाला दूर सारत गोड आणि सकारात्मक शेवटाकडे नेणारी ही कथा नक्कीच मनोरंजक आहे.
“मनू चा आनंद” या कथेत मनू आणि आनंद हे नायिका नायक आहेत. मनूचा आनंद हे शीर्षक द्व्यर्थी आहे. यात विशेषनामे आणि आनंद हे भाववाचक नाम यांची कल्पकतेने केलेली गुंफण आवडली. थोडक्यात ही एक हळुवार प्रेम कथा आहे.
“अपघात” सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवणारी आणि एका मुलीच्या भोवती फिरणाऱ्या समंजस कुटुंबाची ही कथा खरोखरच सुरेख आहे.
“वंशाचा दिवा” ही कथा वाचताना खरोखरच काळजाला चटका बसला. मोठी माणसं अशी का वागतात आणि अशा त्यांच्या वागण्याला कधीतरी धारदार उत्तर का देऊ नये ? त्यांच्या चुका त्यांना दाखवून एखादा धाडसी पण आदर्श निर्णय घेणे हे कौतुकास्पदच आहे ना ? या कथेतला निश्चल या तरुण नायकाची ही कथा वाचताना मन भरून जाते.
“पहिली दिवाळी” नव्या जुन्याची सामोपचराने सांगड घालणारी ही कथा हलकीफुलकी असली तरी चांगला संदेश देणारी आहे.
“स्वप्न” या कथेतूनही खूप सुंदर विचार लेखिकेने मांडला आहे. कॉलेजमध्ये होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून इंजिनियर बनण्याचे स्वप्न अर्धवट सोडून एक दुर्बल मनाचा पण बुद्धिमान युवक पुन्हा गावी परततो आणि वडिलांना शेती कामात मदत करता करता स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शेतीविषयक नवनवे तांत्रिक प्रयोग करून भरपूर यश व पैसा मिळवतो. मिळालेल्या संपत्तीचा उपयोग गावाचा उद्धार करण्यासाठी तो करतो. त्यामुळे साऱ्या गावाचा कायापालट होतो. त्याच दरम्यान याच नायकाच्या मुलाबाबत पुन्हा तीच रॅगिंगची समस्या उद्भवते त्यावेळी मात्र तो कॉलेजच्या संपूर्ण व्यवस्थापनेला आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून कॉलेजमधला हा गलिच्छ प्रकार समन्वयाने कसा सोडवतो हे सांगणारी ही एक सुंदर सामाजिक कथा आहे.
“अस्मिता” – मनाला सुन्न करणारी कथा. ऐन तारुण्यात बेदरकारपणे तान्ह्या मुलाला आणि संपूर्ण परिवाराला सोडून गेलेल्या नवऱ्यामागे त्याची बायको कशी खंबीरपणे जीवनाला सामोरी जाते आणि वीस-बावीस वर्षानंतर ठोकरा खाऊन परतलेल्या नवऱ्याला ती कशी सामोरी जाते हे सांगणारी ही कथा हृदय पिळवटून टाकते.
“कांदा भजी” – कोरोना काळातली ही एक कौटुंबिक, भावनिक, मानसिक ओढाताणीची हलकीफुलकी कथा आहे, मात्र वाचताना ती वाचकाचे रंजन नक्कीच करते.
“चुकलेलं कोकरू” – तारुण्याच्या उंबरठ्यावर मित्र-मैत्रिणींच्या मेळाव्यात काहीतरी थ्रिलिंग अनुभव घेण्याच्या जोशात मुलं भरकटतात, वाट चुकतात. पुढे काही गंभीर परिणाम होण्याच्या आतच त्यांना विश्वासात घेऊन सावरणं ही खरं तर पालकांची कसोटी असते. त्यासाठी लागणारं धैर्य, संयम, सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचं दर्शन या कथेत अतिशय प्रभावी पद्धतीने होतं. ही कथा वाचल्यानंतर मन जडावतंही आणि हलकंही होतं.
वरील सर्व कथांचा आढावा घेताना मी प्रत्यक्ष कथानक सांगण्याचा मोह मुद्दाम टाळला आहे. मी फक्त कथेची रूपरेषा, आशय या परीक्षणात मांडले आहेत जेणेकरून कथा वाचनाचा निखळ आनंद वाचकाला मिळावा. त्यांची उत्सुकता टिकावी.
माननीय देवेंद्र भुजबळ यांची सुरेख प्रस्तावना या कथासंग्रहाला लाभली आहे. प्रस्तावनेत त्यांनी म्हटलं आहे की, “जगाच्या कुठल्याही देशातील, संस्कृतीशील माणूस हा या ना त्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या द्वंद्वात अडकलेला असतो आणि त्यातून शब्दबद्ध होणाऱ्या कथा या वैश्विक ठरतात.”
माननीय नीला बर्वे यांच्या सर्वच कथातून हे अंतर्द्वंद्व जाणवतं हे या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य आहे.

या पुस्तकाचं मुखपृष्ठही मला फार आवडलं. संपूर्ण पांढऱ्या पार्श्वभूमीवर कोवळं ऊन पसरवणारं सूर्यबिंब, चार पानं फुटलेलं एक रोप आणि प्रातिनिधिक स्वरूपात एक रेखांकित चेहरा. चित्रातलं रोप हळूहळू उलगडणार्या आयुष्यासाठीचं रूपक वाटतं आणि रेखांकित चेहऱ्याच्या माध्यमातून माणसाचं जगणं टिपणारी एक संवेदनशील लेखिकाच दृश्यमान होते. अर्थात या मुखपृष्ठाचा हाच अर्थ असेल असेही नव्हे. मात्र पुस्तक हातात घेतल्यावर पाहता क्षणीच माझ्या मनात हे विचार आले ते व्यक्त केले.
एकंदरच एक सुंदर पुस्तक वाचल्याचा अनुभव मला मिळाला.

न्यूज स्टोरी टुडे प्रकाशनाच्या संपादिका माननीय सौ.अलका भुजबळ यांच्या या सुरेख देखण्या प्रकाशनाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि माझ्यासवे समस्त वाचकांतर्फे धन्यवाद!
सिंगापूरस्थित माननीय नीला बर्वे यांची मराठी साहित्याविषयीची तळमळ, संवर्धन वृत्ती खरोखरच प्रशंसनीय आहे. पुढील साहित्यिक वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा !
धन्यवाद !

— परिक्षण : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
