चित्रपट परीक्षण – “ताठ कणा”
आजपर्यंत आपण अनेक खेळाडू, कलाकार किंवा राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक पाहिलेले आहेत, परंतु एका संशोधक डॉक्टरच्या जीवनावर सिनेमा ? होय! डॉ. प्रेमानंद रामाणी हे जागतिक कीर्तीचे न्युरोसर्जन आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यातील एक आहे ‘ ताठ कणा ’. पुस्तकाच्या नावावरून आणि लेखकाच्या परिचयावरूनच विषय आपल्याला सहज लक्षात येतो. याच पुस्तकावर आधारित ‘ताठ कणा’ हा मराठी सिनेमाचा प्रीमियर चित्र सिनेमागृहात संपन्न झाला.

या सिनेमात वैद्यकीय समस्या आणि त्यांची उत्तरं आहेत, तरीही ही डॉक्युमेंटरी फिल्म नाही; तर कथाचित्र, फिक्शन या प्रकारात मोडणारा मनोरंजक सिनेमा आहे. त्यात नाट्यपूर्ण प्रसंग आहेत, प्रेम आहे, कौटुंबिक समस्या आहेत आणि त्यांची उत्तरंही आहेत.

या विषयावर फिल्म करणे हे खरोखर मोठे आव्हान आहे आणि ते आव्हान निर्माता विजय मूडशिंगीकर (प्रज्ञा क्रिएशन्स) आणि करण रावत (स्प्रिंग समर फिल्म्स) यांनी समर्थपणे स्वीकारले आहे.
कथानकात १९६० च्या दशकातील गोवा, मुंबई आणि लंडन येथे घडणाऱ्या घटना आहेत. सिनेमा पाहताना प्रेक्षक सहजपणे ६० वर्षे मागे जातात, कारण प्रत्येक प्रसंगामधील त्या काळाचे दृश्य, वातावरण पटकथा लेखक श्रीकांत बोजेवार आणि दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी अत्यंत प्रभावीपणे उभे केले आहे.

मराठी चित्रसृष्टीत गुणवंत कलाकारांची कमी नाही आणि यामध्ये त्यांची समर्पक निवड दिसून येते. सर्व कलाकार उत्तम; काही कलाकार अमराठी असूनही ते सिनेमात अजिबात परके वाटत नाहीत. दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गोऱ्हे, अजित भुरे, शैलेश दातार, अनुपमा ताकमोगे, रवी गोसावी आणि इतर सर्व कलाकार आपापल्या भूमिका खरोखर जगलेले दिसतात. उमेश कामतने मध्यवर्ती भूमिका इतक्या अप्रतिम पद्धतीने साकारली आहे की त्याला डॉ. उमेश कामत म्हणावेसे वाटते.

सिनेमात आलेली कुसुमाग्रजांची “तु फक्त लढ म्हण” ही कविता अत्यंत समर्पकपणे वापरली आहे आणि तिचा आशय सिनेमात सार्थ ठरतो. मराठी सिनेमा अधिक समृद्ध करणारा असा हा चित्रपट, आज दिनांक २८ नोव्हेंबर पासून सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
— परीक्षण : चंद्रकांत बर्वे. निवृत्त दूरदर्शन संचालक, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
