“गोल भजी”
भजी म्हटली की कोणताही सिझन, कोणतीही वेळ असली तरी तोंडाला पाणी सुटतेच! त्यातून शौकीन खवय्यांसाठी तर कायम वेगवेगळी भजी, पकोडे खाणे ही तर पर्वणीच असते. गप्पांच्या कट्ट्यावरचा, हातगाडी पासून ते छोटे, मोठे होटेल्स, ढाबे कुठेही जा, ही खमंग भजी तुमचे मन आकर्षित करतातच. कोणत्याही सणावारांना सुद्धा कांद्याची नसली तरी भजी लागतातच. मग जिथे देवांना सुद्धा नैवेद्यात भजी लागतात तिथे आपली तर काय गोष्ट वेगळी असेल नाही का? मग बनवायची ना मस्त गोल भजी?
साहित्य :
3 वाट्या बेसन, 2 मोठे कांदे छोट्या चौकोनी आकारात कापून घेतलेले, 1 चमचा कॉर्न फ्लोअर किंवा तांदूळाची पिठी, 3.4 हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,1 चमचा ओवा, पावचमचा हळद, पावचमचा सोडा, चवीनुसार मीठ, तेल.
कृती :
प्रथम एका मोठ्या बाऊल मध्ये बेसन घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर किंवा तांदुळाची पिठी, ओवा, हळद, कांदा, मिरच्यांचे तुकडे, मीठ, कोथिंबीर सर्व घालून हातानी व्यवस्थित चोळून छान मिक्स करावे. म्हणजे कांद्याचे सर्व तुकडे व्यवस्थित सुटे होऊन सर्व मस्त मिक्स होईल. आता त्यात हळूहळू पाणी घालत भिजवून घ्यावे. हे पीठ हातात घेऊन बोटातून सहज पीठ खाली भाजीसारखे सोडता येईल असे झाले की आपले पीठ भज्यांसाठी तयार झाले आहे असे समजावे. थोडे पातळ झाले तरी भजी चपटी बनतात आणि घट्ट झाले तर भजी आतुन् खूप घट्ट बनतात आणी कच्ची लागतात. त्यामुळे हे पीठ परफेक्ट होणे गरजेचे असते. इथे कोणतीही गडबड करु नये.
नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात भजी तळण्यासाठी भरपूर तेल घालावे. तेल कडक तापले की त्यात बोटांनी भजी सोडावीत. सोडा घातल्यामुळे ही आतून ही छान सॉफ्ट आणि स्पंजी बनतात. भजी वरती तरंगायला लागली की गॅस बारीक करून भजी छान लालसर होईपर्यंत मस्त तळावीत. म्हणजे ती आतपर्यंत व्यवस्थित तळली जातात. ही भजी तळून झाली की तारेच्या चालणीत काढुन मग सर्व्हिंग डिश मध्ये काढून गरम गरम सर्व्ह करावीत. भजी तळून झाली की त्याच तेलात मिरच्यांची पोटे फोडून त्या तळून घ्याव्यात. आणि भज्यांसोबत सर्व्ह कराव्यात.
वैशिष्टय :
ही भजी खायला खूप खमंग, टेस्टी लागतात. कांदा छोटा छोटा चिरल्यामुळे तळताना अर्धवट वाफवल्यामुळे मस्त लागतो. गोल भजी खाता खाता फस्त होतात. त्यासोबत तळलेल्या मिरच्या खाताना तर खूपच मज्जा येते. ही भजी कोणत्याही वेळी खाल्ली तरी चालतात.

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
