एकीकडे तब्येतीने चांगले असलेले, फार काही वयही न झालेले मतदार, मतदान करण्यासाठी जाण्याचा कंटाळा करतात. खरे म्हणजे, लोकशाहीच्या दृष्टीने ही अतिशय चिंताजनक बाब आहे.
अशा या पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर नगर पालिकेच्या नऊ वर्षानंतर होत असलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी विजयनगर येथील रहिवासी श्रीमती कुसुम मधुकर घोगे (साळी) यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी येथील ब. ना. सारडा विद्यालयात अत्यंत उत्साहात मतदान करून एक आदर्श निर्माण केला. इतकेच नाही तर, यावेळी त्यांनी “मी अजुन पुढेही दहा वर्षे उत्साहात मतदान करणार” असल्याचा निर्धार व्यक्त करून समवेत उपस्थित मतदारांचा उत्साह वाढविला.
निवडून येणार्या नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी प्रसिध्द केलेल्या आपापल्या जाहिरनाम्याप्रमाणे वचनपुर्ती करुन निस्वार्थीपणे जनतेची सेवा करावी, आपापल्या परीसर, प्रभागामधील मुलभूत व आवश्यक प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कामे प्राधान्याने पुर्ण करावीत अशी रास्त अपेक्षा यावेळी कुसुमताईनी व्यक्त केली. यावेळी त्यांचे समवेत त्यांचे कुटुंबीय राजेंद्र, रवींद्र, सौ. नुतन, सौ. स्वाती घोगे व परिसरातील मतदार उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
