जेष्ठ समाजवादी, वंचिताचे नेते, सत्यशोधक डॉ बाबा आढाव यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सुहृदाने वाहिलेली ही शब्दांजली. डॉ बाबा आढाव यांना विनम्र अभिवादन.
— संपादक.
माझ्या जीवनातील काही प्रसंगांनी, काही व्यक्तींविषयीची सुरुवातीची मतं, पूर्वग्रह बदलली. इतकी की, अशा व्यक्तींकडून मी खूप काही शिकलो. डाॅ.बाबा आढाव यापैकी एक. कष्टकरी, वंचित समाजाचा आवाज असणारे बाबांचे ८ डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या अनेक आठवणी मनाच्या कुपीत आहेत. त्यांपैकी काही;
मी काॅलेजात शिकत असतानाची गोष्ट. एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते एस्.एम्.जोशी यांच्याविषयी बाबा भरभरून सांगत होते, “आण्णा (एस.एम.) याही वयात किती अँक्टिव्ह आहेत !” त्या वेळी एस. एम. ऐंशीच्या घरात होते. बाबा शेवटपर्यंत म्हणजे वयाच्या शहान्नवव्या वर्षीही काम करत होते. खरं तर काही वर्षांपूर्वीच त्यांना कॅन्सर झाल्याचे निदानही झाले होते.मात्र याची मुळीच काळजी न करता बाबा शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. २३ नोव्हेंबर रोजी फणफणत्या तापात देखील व्हीलचेअरवर बसून बाबा महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या वार्षिक बैठकीसाठी मार्केटयार्ड इथल्या कष्टकरी विद्यालयात आले होते. तिथं येण्यापूर्वी ते हमालांशी बोलत होते.
बाबा पेशाने डॉक्टर होते. पुण्यात त्यांनी दवाखाना सुरू केला.तिथे येणाऱ्या कष्टकऱ्यांचे हाल पाहून हमाल पंचायत स्थापन करण्याची कल्पना त्यांना सुचली. यथावकाश समाजातील रिक्षाचालक, मोलकरणी, पथारीवाले, कागद, काच, पत्रा गोळा करणारे, धरणग्रस्त अशा अनेक समाजघटकांना एकत्र करून त्यांच्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी ते कार्य करू लागले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (तेव्हाचे पुणे विद्यापीठ) आमच्या प्रौढ, निरंतर शिक्षण व ज्ञानविस्तार विभागातर्फे एका खेड्यात शेतकरी मेळावा आयोजित केला होता. मी या कार्यक्रमाचा समन्वयक होतो. लोकांच्या आग्रहाखातर बाबांना प्रमुख वक्ते म्हणून आम्ही बोलावलं होतं. कार्यक्रमाच्या गावी जायचा रस्ता अतिशय खडबडीत होता. मात्र त्याची बाबांनी बिलकुल पर्वा न करता तिथं पोहोचल्यावर आणलेल्या पाण्याचा एक घोट घेतला आणि जमलेल्या शेकडो लोकांबरोबर ते प्रश्नोत्तरांतून बोलले. जवळपास दोन तास बाबा बोलत होते.येताना त्यांना म.फुले समता प्रतिष्ठानच्या ऑफिसात सोडलं.
घरी आल्यावर सहज प्रतिष्ठानच्या ऑफिसात फोन केला. बाबा मिटिंगमध्ये असल्याचं समजलं. प्रवासात मी इतका थकलो होतो की, फक्त पाणी पिऊन मी झोपी गेलो. त्यानंतर दोन दिवस सगळं अंग ठणकत होतं.
विद्यापीठात महात्मा फुले अध्यासनाचा मी प्रमुख होतो. तेव्हा सगळ्या महाराष्ट्राला फुले शिकवणाऱ्या बाबांनी मला खूप मदत केली. त्यासाठी मधून मधून मी त्यांच्या महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या ऑफिसात जाऊन त्यांच्याशी चर्चा करत असे. असाच एक दिवस प्रतिष्ठानच्या ऑफिसात गेलो. बाबा नव्हते. कुणाला तरी विचारलं.
उत्तर आलं, “बाबा एकतर कलेक्टर समोर असतील किंवा कलेक्टर ऑफिस समोर एखाद्या आंदोलनात असतील”.
जीवनभर केलेल्या कार्याबद्दल बाबांना अनेक पुरस्कार मिळाले. शासनाकडून मिळणारा एक प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना मिळण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत होते. मात्र ‘सरकारी पुरस्कारामुळे पायात बेडी पडते’ अशा भूमिकेतून त्यांनी तो घेण्याचे नाकारले.
सर्वसामान्य माणूस आणि कष्टकऱ्यांसोबत नाते कायम ठेवण्याला बाबांनी अग्रक्रम दिला होता. संघर्षासोबतच बाबांनी रचनात्मक कार्यही केले. पुरोगामी विचारांवर विश्वास असणाऱ्या व्यक्ती आणि संघटना यांची त्यांनी महाराष्ट्रभर मोट बांधली होती.
निधनानंतर बाबांचा देह सर्वांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्यातील हमाल भवनात ठेवला होता. वैकुंठ स्मशानभूमीत, कोणताही धार्मिक विधी न करता विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा ‘सत्य सर्वांचे आदि घर,सर्व धर्मांचे माहेर…’ हा महात्मा फुले यांचा अखंड साश्रू नयनांनी गात हजारो कष्टकरी आणि नागरिकांनी बाबांना निरोप दिला.

— लेखन : प्रा डॉ सतीश शिरसाठ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
