८४ लक्ष योनीच्या स्थित्यंतरानंतर ‘माणूस’ नावाचा ‘प्राणी’ जन्माला आला असं म्हणतात. असा हा सस्तन प्राणी कळपात राहाण्यास प्राधान्य देतो. अशा या कळपात राहणाऱ्या प्राण्यात ‘माणूस’ नावाचा प्राणी हा सुद्धा येतो. तर असो..
कळपात राहणाऱ्या सस्तन प्राणांच्यात सुध्दा हेवे-दावे, राग- लोभ, मतभेद, भांडण, मैत्री, परोपकार वृत्ती या स्वाभाविक वृत्ती-प्रवृत्ती असते नव्हे तर आहेतच. साहजिकच हे सर्व गुण-अवगुण जसे प्राण्यात आहेत तसेच ते मनुष्य नावाच्या प्राण्यातही आहेत. काही अपवाद वगळता सहसा त्यांच्या मैत्रीत खंड पडत नाही. बालपणी ते शालेय जीवनातातील मित्र/मैत्रिणींच्या शैक्षणिक, नोकरी, बदली आदीच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटी-गाठींचे प्रमाण जरी दुर्मिळ झाले तरी हल्ली दूरध्वनी, मोबाईल आदी अत्याधुनिक प्रचार प्रसार माध्यमांच्या सुविधामुळे किमान संपर्कात तरी राहू शकत आहेत.
‘मैत्र जीवाचे’ या व्यक्ती विशेष सदरात माझा खास मित्र मा. प्रफूल्ल गोपाळदास भानुशाली याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तसं पाहू गेल्यास तो मला दोनेक वर्षानी मोठा असूनही आम्ही जीवाभावाचे मित्र झालो. त्या आमच्या मैत्रीला सहा दशकं साक्षीदार आहेत.
आम्ही १९५९/६० पासून शासकीय वसाहत, बांद्रा पूर्व येथे राहात होतो. त्यावेळी मला नोकरी करणे गरजेचे होते. त्याच दरम्यान महाराष्ट्र शासनाने शिधावाटप योजना अंमलात आणली. मी एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्यावर १९६५ साली शिधावाटप कार्यालय उद्योग भवन, स्वामी विवेकानंद रोड, गोरेगाव (पश्चिम) मुंबई येथे नोकरीस लागलो. तेथेच प्रफूल्ल भानुशाली याच्याशी ओळख झाली.. नंतर परिचय झाला. पुढे या परिचयाचे ‘मैत्री’त रुपांतर कधी कसे केव्हा झाले हे आम्हा दोघांनाही समजले नाही. प्रफूल्ल पण याच शासकीय वसाहतीत राहत होता. ही घटना आमच्या मैत्रीला पुरकच ठरली. दोघेही मिळूनच शिधावाटप कार्यालयात येत-जात होतो. सोबतीने (डबा) लंच मध्ये एकत्र जेवत होतो..

नंतर ते कार्यालय बांद्रा पच्छिमेला तलावाशेजारी जागेत आले. साहजिकच आम्ही सुध्दा बांद्रा कार्यालयात बदली निमित्ताने आलो. घर ते कार्यालय, बरोबरीने लंच वेळेत डबा (जेवण) खाणे.. नंतर ‘लकी रेस्टॉरंट’ येथे ‘पानी कम‘ कटिंग चहा पिणे..अन्य सुट्टीच्या दिवशी मनसोक्त भटकंती हा दिनक्रम ठरलेला असायचा.
आई-वडिलांसह ७/८ जणांचा मोठा परिवार होता. आई गृहिणी तर वडील शिक्षक होते. अलिबाग, वाडा येथे होते. त्याचा मोठा भाऊ मंत्रालयात होता आणि माझे वडीलही मंत्रालयात होते. दोन मोठे भाऊ उच्चशिक्षित अन् शासकीय खात्यात अधिकारी होते.
आमच्या घरी सुध्दा दहा सदस्यांचे (आजी, आजोबा, वडिलांची आत्या, माझे आई-वडील, दोन बहिणी (एक मोठी मंगलताई व धाकटी सुधा) असे कुटुंब होते. एकत्र कुटुंब पध्दती होती. एवढ्या या कुटुंब कबिलासह शासकीय वसाहतीत आम्ही राहात होतो. बांद्रा (पश्चिम) येथील ‘लकी’ या इराणी हॉटेल मध्ये पानी कम चहा पिणे हीच आमची त्यावेळची चंगळ होती. नंतर माझे वडील गोपाळराव उपाख्य अण्णा हे मंत्रालय, गृहखात्यातून निवृत्त झाले. साहजिकच आम्हाला त्या शासकीय वसाहतीतील घर सोडावे लागले. प्रफूल्ल आधी शिधा वाटप कार्यालय नंतर भाषा संचालनालय, मग विक्रीकर खात्यात (आधी नवी मुंबई मग माझगाव) नोकरी केली आणि तेथूनच ते विक्रीकर अधिकारी म्हणून निवृत्त झाले.
मध्ये आमच्या दोघांच्या जीवनात अनेक स्थित्यंतरे झाली.. (माझं शिक्षण, लग्नादी) त्यात परत दोघांच्याही नोकरी वेगवेगळ्या अन् कार्यालयीन वेळा पण वेगवेगळ्या होत्या. त्यापायी पुर्वीप्रामाणे भेटीगाठी कमी झाल्या तरी पण मैत्री आमची मैत्री अबाधित राहिली आहे. (त्याकाळी दूरध्वनी, मोबाईल वगैरे या अत्याधुनिक अशा सोयीसुविधा नव्हत्या ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे) मी पण विविध शासकीय आहे कार्यालयात नोकऱ्या केल्या.. शेवटी स्टेट बँकेत चिकटलो.
माझे कु. पुष्पा महादेव जोशी, तळा, जि. रायगड (माहेरचे नाव) हिच्याशी १९७६ साली लग्न साली झाले. नंतर हभप सौ.मीरा नंदकुमार रोपळेकर झाली. प्रफूल्लचा त्यांच्याच कार्यालयातील (विक्रीकर, माझगाव, मुंबई) येथे कार्यरत असलेल्या कु.रेखा हनमटटेकर या तरूणीशी प्रेम विवाह १९८२ साली झाला.

लग्नानंतर आता त्या रेवती प्रफूल्ल भानुशाली झाल्या. सध्या हे दांपत्य कांदिवली पूर्व मुंबई येथील ठाकूर कॉम्प्लेक्स येथे राहात आहेत. दोघेही अधिकारी म्हणून कार्यरत होते. २००४ प्रफूल्ल निवृत्त झाला. नंतर २०१५ साली रेखाभाभी यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आम्हा दोघांचा संसार सर्वार्थाने सुख, समृद्ध अन् समाधानीचा आहे.
माझी पत्नी ह.भ.प सौ मीरा (माहेरचीची कु पुष्पा महादेव जोशी, तळा, जि.रायगड) ही रिझर्व बँकेतून अधिकारी म्हणून निवृत्त झाली. आम्हाला एक मुलगा व एक कन्या आहे. लेक पुणे येथे राहते. लेक, अमृता ही गृहिणी तर जावई इंजिनिअर आहेत. प्रफूल्लची लेक सौ.रिधिमा ही इंजिनिअर असून ती व्हाईस प्रेसिडेंट, कोटक महिंद्रा येथे या उच्च पदावर, तर त्याचे जावई रोहित बागेश्रा हे एका खासगी कंपनीत इंस्ट्रमेंटल इंजिनियर, या पदावर सिमेन्स या कंपनीत कार्यरत आहेत.
प्रफूल्ल पती पत्नी हे दोघेही दर रविवारी सायंकाळी मुलुंडला लेकी कडे घर सांभाळायला जातात आणि शुक्रवारी पुन्हा आपल्या कांदिवलीच्या राहत्या घरी येतात. हा त्यांचा नित्यक्रम आहे.
दोघेही भानुशाली पती पत्नी हे हौशी, नव्याचा ध्यास घेणारे, आपल्या ऐपतीत छान शौकीत मस्त राहणारे, मनमौजी -हरफन मौला म्हणजे अर्थात या लेखाचा नामक भानुशाली दांपत्य होय.
माझ्या जीवनात आलेल्या सर्वं सुख-दुःखात धावून येणारा हा माझा जिगरी दोस्त. आम्ही दोघांनी खूप भटकंती केलीय. भारतातील प्रेक्षणीय स्थळे तसेच थंड हवेच्या ठिकाणी आम्ही पाहिली आहेत. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी केलेली अमेरिका (पूर्व-पश्चिम) ही सहल लक्षणीय ठरली होती.
स्वच्छ मनाचा, व्यवहार कुशल असलेला हा दोस्त प्रसंगी सुद्धा कठीण धावून येत असतो नव्हे आजही येत आहे. विशेष म्हणजे त्याची दांडगी स्मरणशक्ती. हे दोघेही पती पत्नी (लक्ष्मी नारायण म्हणाना) एकमेकांना अनुरूप आहेत.
मूलभूतत: आम्हा दोघांच्या स्वभावात खूप फरक आहे. मतभेद झाले सुध्दा. काही काळ अबोलाही धरलेला असायचा. शेवटी हा प्रेमाचाच अबोला ना! पुन्हा आम्ही मागचे सर्व मतभेद विसरून परत एकत्र येत होतो. तसं पाहू गेल्यास गेली सहा दशके आमच्या मैत्रीला झाली आहेत. हल्लीच्या काळात ही अशी मैत्री दुर्मिळ म्हणावी लागेल.
आम्ही दोघेही मध्यमवर्गीय वर्गातील माणसं. खाऊन पिऊन सुखी होतो. आज ही दोन्ही कुटुंबात घरोबा आहे. आज या व्यावहारिक जगतात फक्त स्वार्थासाठी मैत्री केली जाते/करतात. आपला स्वार्थ साधून झाला की मग एकमेकांना ओळख दाखणार सुध्दा नाहीत.
या पार्श्वभूमीवर आमच्या मैत्रीचे मोल अनमोल आहेत हे नक्की. सामान्यामध्ये असामान्यत्व असतं नव्हे आहे अशी आमच्या सारखी अनेकजण मैत्रीला जागणारी सृजन नागरिक आहेत. त्यापैकी एक असलेल्या प्रफूल्ल आणि माझ्या मैत्रीला सहा दशकं होऊन जास्त काळ गेला आहे म्हणून हा लेखन प्रपंच केलाय.
आपल्या सनातन/प्राचीन ग्रंथामध्ये अशा या अतुल्य अन् अतुट मैत्रीवर अनेक कथा सांगितल्या आहेत शिवाय त्यावर साहित्यही प्रकाशित झालेले आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात या मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.. उदा..’दोस्ती‘ गेल्या पाचेक दशकांपूर्वी प्रकाशित झालेला “शोले“ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद यांच्या सर्वार्थाने “मैत्रीची“ उमटविलेली मोहोर ही भारतीय सिनेमाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे.
वाढत्या वयाबरोबर शारीरिक मानसिक आणि भावनिक ताण – तणावांना समोरे जाणं जरा कठीण जरी असलं तरी आपल्या बालपणीच्या खास मित्राच्या स्मृती म्हणजे उतारवयातील जबरदस्त असं ‘टॉनिक’ आहे. उर्वरित आयुष्य गतस्मृतींना उजाळा दिल्यावर जो आनंद मिळतो तो चिरस्मरणीय असा आनंद ठेवा आहे. म्हणूनच माझ्या आणि प्रफूल्लच्या मैत्रीला दिलेला हा उजाळा तर आहेच शिवाय ती सुगंधी शब्द स्मरणांजली सुध्दा आहे.
आज आम्ही दोघेही वयाच्या “सहस्त्रचंद्रदर्शन योगा‘’ जवळ आलो आहोत. थोडक्यात ‘ पिकली पानं ’ झाली आहोत.. पण… आम्ही दोघेही ‘अभी तो मैं जवान हूं’ या प्रफूल्ल वृत्ती- प्रवृत्तीने आयुष्याची वाटचाल मोठ्या उमेद, उत्साहाने, दिमाखात, हसत खेळत करीत आहोत.
नियमितपणा हा आमचा स्थायी भाव आहे. धार्मिक अनुष्ठानामुळे आयुष्याकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करणे सुकर झाले आहे. हे मात्र नक्की.
एका इंग्लिश लेखकाने असं म्हटलं आहे, “THE SECRET OF STAYING YOUNG IS TO LIVE HONESTLY, EAT SLOWLY AND LIE ABOUT YOUR AGE’’ [LUCILLE BALL ]
“समाधानी वृत्ती हीच खरी सुखी आयुष्याची गुरुकिल्ली किल्ली आहे” यानिमित्ताने आमच्या समस्त परिचित, परिवार सदस्य, मित्र मंडळीने आमच्यावर जे अपार, निर्व्याज, निरसल असे अस्सल प्रेम केले शिवाय आमच्या कडून कळत नकळत झालेल्या चुकांकडे कानाडोळा करून प्रसंगी आम्हाला आदरयुक्त धाकाने ताब्यात ठेवले त्या बद्दल या समस्त सदहृदयांचे मनोमन आभार. हे असंच प्रेम निरंतर राहो या साठी आपल्या समस्त परिवारास निरोगी निरामय आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना.
“मैत्र जीवाचे” याला उजाळा दिल्याबद्दल माझे परम मित्रवर्य पत्नी- पती सौ.अलका व देवेंद्र भुजबळ, माजी संचालक, माहिती आणि प्रसिध्दी संचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्या बद्द्ल कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे परम कर्तव्य आहे. धन्यवाद.

— लेखन : नंदकुमार रोपळेकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
