“बाजरीचा हेल्दी खिचडा”
सध्या मस्त गुलाबी थंडी आहे. अशावेळी बायकांना साग्रसंगीत स्वयंपाक करून सर्वांना वाढा.. काढा करून सर्वांच्या नंतर जेवायचे, नंतर सर्व पसारा एकटीने आवरत बसायचे याचा खुप कंटाळा येतो. त्यापेक्षा पोटभरीची एखादी गरम गरम डिश करावी, सर्वांनी त्यावर मनसोक्त ताव मारावा आणि पुन्हा ऊबदार गोधडीत शिरून ताणून द्यावे असे मनापासून वाटत असते.
आता मंडईमध्ये सुंदर, ताज्या, रसरशीत भाज्या असतात . पाहूनच किती आणू असे होते आणि प्रत्येक सिझन मधील भाज्या, फळे ही प्रत्येकानी खायलाच हवीत, म्हणजे आरोग्य उत्तम राहते. पण सर्वांना सगळ्याच भाज्या आवडतात असे नाही आणि भाज्या तर खाल्ल्या गेल्याच पाहिजेत, म्हणूनच या सर्वांवर सुरेख उपाय म्हणून एक उत्तम डिश घेऊन आले आहे. तुम्ही नक्की करून पहा, बनवणाराही खुश आणि खाणारेही खुश नक्कीच होणार ! चला मग..
साहित्य :
१ वाटी बाजरीचा भरडा, पाव वाटी तांदूळ पाव वाटी मुगाची डाळ, 2 चमचे चणाडाळ, १ वाटी- बीन्स, गाजर, फ्लॉवर, सिमला मिरची यांचे तुकडे, अर्धी वाटी- मटार, कॉर्न, शेंगदाणे,१५-२० ठेचलेल्या लसुण पाकळ्या, लाल तिखट, काजू, बदाम यांचे तुकडे, तेल, कढीपत्ता, मीठ,फोडणीचे साहित्य, साजूक तूप, १लहान कोळशाचा तुकडा, मातीचे सुगड.
कृती :
प्रथम एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढईत 1 चमचा तेल घालून ते सर्वत्र आतून लावून घ्यावे.त्यामुळे खाली चुकून बुडाला थोडे लागले तर चिकटत नाही उलट त्याची खरपूस पापडी खूप छान लागते.नंतर त्यात छोट्या पळीभर तेलाची सर्व फोडणीचे साहित्य घालून कढीपत्ता घालून खमंग फोडणी करून घ्यावी. त्यात धुतलेली डाळ, तांदुळ, कॉर्न, मटार, शेंगदाणे परतून घ्यावेत. अडीच वाट्या गरम पाणी घालून त्याला १ उकळी आली की त्यात भाज्या, लसूण, लाल तिखट , मीठ, बाजरीचा भरडा घालून छान मऊ होईपर्यंत व्यवस्थीत शिजवून घ्यावे. शिजत आले की १ चमचा तुपाची धार त्यावर सोडावी, सुगडात पेटता कोळसा ठेवून वर झाकण ठेवून गॅस बंद करावा. २ मिनीटात हेल्दी खिचडा तयार होईल. सर्व्ह करताना एका खोलगट डिशमध्ये काढून त्यावर तूप आणि ड्रायफ्रट्स घालून गरम गरम सर्व्ह करावे.
सोबत एखादा पापड, मठ्ठा तर आणखीनच बहार येते.
वैशिष्ट्य :
Pबाजरीचा भरडा नसेल तर बाजरी धुवून रात्रभर पाण्यात भिजवून कुकरमध्ये घालून त्यात कमीतकमी अडीच वाट्या पाणी घालून 7..8 शिट्ट्या काढून व्यवस्थित शिजवुन् घ्यावी व त्याचा खिचडा बनवावा. डाळ, तांदूळ, भाज्या, कॉर्न,मटार आणि बाजरी यांचा समावेश असल्यामुळे ही एक पूर्णान्न डिश आहे. थंडीच्या दिवसांत बाजरी,लसूण यामुळे शरीरात ऊब निर्माण होते.आणि भाज्या,डाळी, ड्रायफ्रुट्स, तूप यामुळे पौष्टिकता वाढतेच , तुप ,तेलामुळे शरीराची या दिवसात लागणारी स्निग्धतेची गरज सुद्धा पुर्ण होते आणि त्याचबरोबर हा खिचडा चवदारही लागतो. मातीच्या भांड्यातील कोळशाच्या धुरामुळे त्याला चुलीवरचा फील येतो आणि खमंगपणा वाढतो. यामध्ये ताज्या भाज्यांची मिक्स चव तर कमालीची बहारदार येतेच आणि मधून मधून शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स, चनादाळ दाताखाली आले की खाताना आणखीनच मजा येते. मुगाची डाळ घातल्यामुळे याला छान टेक्श्चर येते आणि टेस्ट ही मस्त येते. तिखट आवडीनुसार कमी जास्त घालावे, पण लसूण मात्र आवर्जून घालावा त्यामुळे एकतर टेस्ट खमंग येतेच शिवाय या दिवसात शरीराला ऊर्जेची गरज असते ती लसूणातून भरपूर प्रमाणात मिळते. हा खिचडा थोडा सैलसरच ठेवावा तो तसाच जास्त टेस्टी लागतो, पटापट खाता येतो आणि थंड होत आला की तो थोडासा घट्ट होतो. ही ‘वन डिश मिल’ सर्वांना नक्की आवडणारच. कोळशाचा धूर दिल्यामुळे गावाकडील चुलीवरच्या खिचड्याचा फिल येतो. मस्त थंडी सुरु आहे, लगेंच लागा मग तयारीला..

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694844800
