1
या नवीन वर्षाचा पहिला दिवस, माझ्यासाठी नव्हे तर सबंध मराठी भाषिकांसाठी मोलाचा ठरला कारण या दिवशी सातारा येथे “९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन” सुरू झाले.
यापूर्वी माझ्या कवितेची अखिल भारतीय साहित्य संमेलनात दोनदा (वर्धा आणि उदगीर) झाली निवड होती. पण माझे एकच स्वप्न होते, की जेव्हा कधी साताऱ्यात, माझ्या जिल्ह्यात साहित्य संमेलन होईल, तिथंच मी कविता सादर करणार, आणि आज तो योग आला होता.
मला संमेलनाचे पत्र आल्या पासून तर खूपच आनंद झाला होता.आताच्या WhatsApp च्या युगात ही बातमी सगळीकडे समजली. लेकी, मुले, सुना, बहिणी, भाऊ साऱ्यांना पत्र वाचून आनंद वाटला.
सातारा नगरी ही सजली
साहित्यिकांची जमली मांदियाळी !
आली दिवाळी ही
आली दिवाळी !
साहित्याची ही
आली दिवाळी!!
गुढ्या ,तोरणे मंडप दारी
सजली ही सातारा नगरी
वाजे चौघडा तुतारी
ग्रंथ दिंडी वाजत गाजत निघाली
सडा रांगोळी नी अंगण सजले
अवघे साताराजन हे हर्षोल्लासीत झाले!
शूरवीर ,क्रांतिकारी पराक्रमी, ऐतिहासिक
ही भूमी सातारची !
साहित्यिकांनी गजबजली
आली दिवाळी हीआली दिवाळी साहित्याची ही आली दिवाळी!!
असे म्हणतच साहित्य संमेलनाला जाण्याची तयारी सुरू झाली.आनंदाच्या भरात, खरोखर चकली, चिवडा , करंजी करून घेतली आणि सुंदर ही झाली.
सातारला माझी मोठी बहीण निवृत्त प्राध्यापक शालिनी जगताप, तिचा मोठा मुलगा संतोष कुमार, सुन नंदिनी , मिरजेहून आलेली मुलगी स्वाती हे सारे साहित्य प्रेमी. त्यांच्या घरी दुपारी पोहचले .
खरे तर जगताप दाजींच्या प्रोत्साहनामुळेच मी कवयित्री झाले. आणि आज योग असा आला की त्यांच्याच घरी साहित्य संमेलनासाठी चार दिवस मुक्काम पडला. माझी आणखी एक बहिण उषा ही पण आली. मग काय हे साहित्यिकांचे घर त्यात आणखीन भर चार दिवस सगळे कार्यक्रम खूप एंजॉय केले.
घरातील सारे जन संमेलनात सहभागी झाले. पुण्याहून मोठी मुलगी, श्वेता, जावयी विक्रम आणि मुलगा परेश ही मला सरप्राइज देण्यासाठी हजर झाले.आनंदाला उधाण आले.
खरोखरच दिवाळी असल्या सारखे वाटले !
एका कवितेसाठी जवळ जवळ अख्खे कुटुंब एकत्र आले होते.मध्ययुगीन स्त्री पासून आत्ताच्या कलियुगातील स्त्रियांचे मनोगत व्यक्त करणारी माझी “अस्तित्व” ही कविता या संमेलनासाठी निवडण्यात आली होती. कविता खरे च सुंदर होती. आम्ही सारे आवरुन संमेलन स्थळी चार वाजता पोहोचेलो.
राजवाड्यापासून ग्रंथदिंडी ला ही सुरुवात झाली, तिकडे संतोषदादा पालखीला खांदा देण्यासाठी गेला. आमच्या समोरच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. अतिशय सुंदर सजावट केली होती. जिकडे तिकडे विविध साहित्यिकांचे फलक त्यांच्या सुंदर चित्रासोबत, पुस्तकांसोबत झळकली होती. वातावरण अगदी मराठमोळ झाले होते.अ पासून ज्ञ पर्यंत सर्व अक्षरे आज मानाने मिरविती होती . शिवाजी महाराज, आणि श्री फुले, शाहू आंबेडकरांपासून आजच्या सुप्रसिद्ध लेखकांचे फोटो दिमाखात झळकत होते. एवढ्या मोठ्या प्रचंड जनसमुदायातही मराठमोळ्या सभ्यतेचा अनुभव येत होता. प्रत्येकजन अगदी भारावून गेला होता. सारे वातावरण हे शब्दातीत होते.

कवीकट्टाचेही उद्घाटन आमच्या समोर पार पडले, पहिल्या दहातच माझे कविता सादरीकरण होते.युग कुठलंही असू द्या स्त्रीच नेहमी भक्ष बनते, तरीही ती आपले “अस्तित्व ” सिध्द करते हे सांगणारी माझी कविता आतून आलेली होती. मी सादरीकरण ही उत्तम केले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आज खऱ्या अर्थाने माझे कविता लिखाण सार्थकी लागले. मला खूप समाधान वाटले.
स्टेजवर गेल्याबरोबर तोंडातून वाक्य बाहेर पडलं या व्यासपीठावर एवढंच म्हणावसं वाटतं की “साहित्याने इतकं दिलं की गच्च भरली आयुष्याची झोळी, फाटली जरी उद्या मागे उरतील अजरामर या ओळी “मागे उरतील अजरामर या ओळी” !!
सगळे आप्तेष्ट पाहून कदाचित छान रंग भरला असावा. कविता संपल्यावर थोडे फोटो काढले आणि इतरत्र काय आहे हे फेरफटका मारायला निघालो.
खचाखच भरलेले पुस्तकांची स्टॉल येथे झालेली वाचकांची गर्दी . काही पुस्तके खरेदी केली. बाल साहित्य युवा साहित्य, पुस्तक प्रकाशन कट्टा, असे बरेच इतरही कार्यक्रम सुरू होते.
मुख्य व्यासपीठावर मान्यवरांची भाषणे चालू होती सारं डोळ्यात साठवून आनंदाने घरी परतलो.
नंतर चार दिवस रोज मनसोक्त साहित्याचा आनंद लुटला. मुलाखती ऐकल्या ,पुस्तक परिचय ऐकलं, कथाकथन ऐकलं परिसंवाद,ऐकला विचारवंतांचे विचार ऐकले. भारुड, हास्य जत्रा साऱ्याचा आनंद लुटला आणि शेवटी अध्यक्षांचे समारोपाचे भाषण ऐकूनच घरी आलो.
कार्यक्रमात खूप विविधता होती. एकूणच काय हे साहित्य संमेलन सुंदर पद्धतीने पार पडले. आता शंभरावे साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे तिथेही माझ्या कवितेला न्याय मिळावा अशी आशा करून थांबते.
— लेखन : आशा दळवी, दूधेबावी, जिल्हा सातारा

2
“परीसंवादाने होई समाजाचे घडतर” हा विकास
या साहित्य संमेलनात सामान्य नागरिक व विचारवंतासाठी अनेक विविध विषयांवर चर्चा विचारण्याचे सत्र आयोजित करण्यात आले. भारताच्या गावा शहरातून मराठी विचारवंतांना व्यासपीठावर निमंत्रित केले. परीसंवादामार्फत शब्दांना धार असणारे, भारदस्त व्यक्तित्व उजळून आले. त्यामुळे ऐकणाऱ्यांच्या विचारांना गती मिळाली.
परीसंवादाचे बारकावे, विषयाचे आकलन करून प्रश्न विचारणारे विचारांचे धनी सूत्रसंचालक म्हणून लाभले.
जगभरातून आलेले नामवंत साहित्यिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकारांमुळे संमेलन शोभनीय झाले. तर एकीकडे आजुबाजुच्या गावा शहरातून आलेल्या लोकांमुळे गर्दी इतकी झाली की मंडप माप देखील कमी पडत होते.
आपले अज्ञान बाजु सारून ज्ञानाची पातळी वाढवणे आणि या नैतिक समाजाचा अंग होणे किती महत्वाचे आहे याची जाणीव परीसंवादातून होत गेली. विचारवंतांना मुक्तपणे विचार मांडताना कुठेही आरोपाचे बोल नव्हते. कुठल्याही वादाला स्थान नव्हते. लोकहिताचे माध्यम म्हणून पाहिले जाणारे असे परीसंवाद समाजाचा कणा ठरतात हे प्रामुख्याने जाणवले.
जखमांचे मुळ शोधण्यासाठी झाकलेल्या जखमा उघडाव्या लागतात. समाजाचे ऋण कर्तव्य समजून उचलून घ्यावे लागतात. मी, माझे आणि माझ्यापुरतेच न राहता त्यापलीकडे जगून बघावे लागते. आपल्यामुळे, आपल्यासाठीच असतो समाज तेव्हा सर्वांना सामावून घेणारे असे समाजाचे कार्य आपल्याहून वेगळे असूच शकत नाही. ज्ञानसंपन्न व्यक्तींनी व विचारवंतांनी एकत्र येणे गरजेचे असते हे परीसंवादातून समजले, उमजले.

— लेखन : दिपाली वझे. बेंगळूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ व91 9869484800

संमेलनाचा वृतांत आवडला. या व्यतिरिक्त मान्यवरांनी काय संदेश दिला किंवा संवाद साधला ते वाचायला आवडेल. यातून साहित्यिकांना कोणता बोध घेता येईल? इ. सविस्तर माहिती वाचायला आवडेल.