मराठी भाषा पंधरवाड्याच्या निमित्ताने विश्वभरारी फाउंडेशन आणि नॅशनल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील नॅशनल लायब्ररीच्या सभागृहात नुकतेच आयोजित करण्यात आलेले पहिले एक दिवसीय साहित्य संमेलन उत्तरोत्तर रंगत गेले.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी बोलताना त्यांनी साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. तर स्वागताध्यक्ष आमदार पराग अळवणी यांनी संमेलनाच्या आयोजिका सौ लता गुठे या मराठी भाषेसाठी देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. लेखिका रेखा नार्वेकर यांनी संत साहित्याचे योगदान मोजक्या शब्दात विषद केले. तर संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक श्री किरण येले यांनी मराठी भाषा आणि साहित्य या विषयी केलेले विवेचन विचार प्रवर्तक होते.

याच उद्घाटनपर कार्यक्रमात मराठी भाषेच्या, संस्कृतीच्या संवर्धनासाठी योगदान देणार्या एकता फाऊंडेशन, बहुउद्देशीय संस्था, मनस्पर्षी साहित्य, कला क्रिडा प्रतिष्ठान, अंधेरी वाचन कट्टा आणि न्यूज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय वेबपोर्टलचा उत्कृष्ट स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. न्यूज स्टोरी टुडे चा सत्कार या पोर्टलचे संपादक तथा निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी स्विकारला.

तसेच उद्घाटनपर कार्यक्रमात लता गुठे लिखित काहूर वाटा या पुस्तकाचे, भरारी प्रकाशनच्या आणखी दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामुळे आता भरारी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची संख्या 325 इतकी झाली आहे.

उद्घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी आभार प्रदर्शन डॉ संपदा पाटगावकर यांनी केले.
“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पुढे काय ?” या परिसंवादात बोलताना एस एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील रामटेके यांनी मराठी भाषा केवळ प्रमाण मराठी पुरती मर्यादित न राहता, मराठीतील समृद्ध अशा सर्व बोली जगण्याचे महत्व प्रतिपादित केले.

माध्यमतज्ञ रविराज गंधे, लेखिका प्रतिभा सराफ यांनीही या परिसंवादात भाग घेतला. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान लेखक तथा जेष्ठ अभिनेते प्रकाश राणे यांनी भूषविले. तर निशा वर्तक यांनी सूत्र संचालन केले.
रंगलेल्या “गझलरंग” मध्ये ज्योत्स्ना राजपूत, रवींद्र यशवंतराव देशमुख, दीपाली घाडगे, बंडू अंधेरे, डॉ. सुनीला बेडसे यांनी दमदार हजेरी लावली. गझलरंगच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष कटकदौड हे होते. सूत्रसंचालन चारुलता काळे यांनी केले.
कथाकथन सत्रही चांगलेच लक्षवेधी ठरले. बाल साहित्यिक श्री एकनाथ आव्हाड,लेखक श्री भास्कर बडे, लेखिका सौ मेघना साने यांनी प्रभावीपणे स्वरचित कथा सांगितल्या.

पंकज पाडाळे आणि त्यांच्या सहकलाकारांनी सादर केलेल्या दिलखेचक नृत्यांनी सभागृहाचा माहौल बदलून गेला. तर बुरगुंडा ने मनोरंजनातून छान प्रबोधन केले.
कवी किरण येले यांच्या कवितेवर आधारित “बाई बाई गोष्ट सांग” हा नाट्यविष्कार सुधाकर वसईकर आणि पुष्पांजली कर्वे यांनी संवेदनशीलपणे सादर करून रसिकांच्या काळजाला हात घातला.

छंद काव्य संमेलनात जीतू लाड, कविता मोरवणकर, कविता राजपूत, गितेश शिंदे, हेमांगी नेरकर, रजनी ताजने, चारुलता काळे, डॉ. स्मिता दातार, डॉ. अलका नाईक, ज्योती कपिले, राजेंद्र जाधव, प्रशांत राऊत, सोनाली जगताप यांनी तन्मयतेने आपापल्या कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
सुप्रसिद्ध कवी अजय कांडर हे या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी होते.तर वृषाली विनायक यांनी बहारदारपणे सूत्रसंचालन केले. डॉक्टर स्मिता दातार यांनी आभार मानले
विविध मान्यवर व्यक्तींचाही संमेलनात यथोचित सत्कार करण्यात आला.

अतिशय सुंदर, शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या साहित्य संमेलनास केवळ मुंबईतीलच नव्हे तर मुंबई बाहेरूनही आलेल्या साहित्य रसिकांची भरगच्च उपस्थिती आणि त्यांची मिळत गेलेली दाद यामुळे हे संमेलन स्मरणात राहील, असे झाले.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
