आपले राष्ट्र सोडून परराष्ट्रात जाणार्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपले राष्ट्रच आपले तारणहार असून परराष्ट्रात आपण कितीही काही केले तरी तिथे आपण परकेच ठरणार आहोत, असे खडे बोल इतिहासकार, लेखक तथा निवृत्त आयकर आयुक्त श्री विजय आपटे यांनी सुनावले. ते नवी मुंबईतील सानपाडा येथील प्रसिद्ध मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गृहनिर्माण संस्थेने आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहण झाल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

श्री आपटे पुढे म्हणाले की, सर्व प्रथम महानुभाव पंथाने आपल्याला देश आणि राष्ट्रातील फरक समजावून सांगितला. त्यानुसार आपण पारतंत्र्यात होतो तरी आपला देश अस्तित्वात होताच. पण स्वातंत्र्य मिळवून, संविधान लागू केल्याने आपला देश राष्ट्र झाले आहे. संविधान समजावुन सांगताना ते म्हणाले, “धर्म धर्मिता धर्म” या उक्तीप्रमाणे “राष्ट्र रक्षिता राष्ट्र” हे आपण समजून घ्यायला हवे. नागरिक म्हणून आपणच राष्ट्राचे आधार आहोत. त्यामुळे राष्ट्राने मला काय दिले ? असा विचार करण्याऐवजी मी राष्ट्राला काय दिले ? काय देऊ शकतो ? याचा आपण विचार केला पाहिजे. पारतंत्र्यात असताना नागरिक स्वतः पुढे येऊन देशासाठी लढत होते, काम करत होते. पण आज मात्र सर्व काही सरकारने केले पाहिजे, अशी अपेक्षा नागरिक करतात, या विषयी खंत व्यक्त करून त्यांनी आपले राष्ट्र जगात अव्वल राहण्यासाठी एक दिलाने झटत राहू या, असे आवाहन केले.

या प्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव श्री सुनील पाटील यांनी आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून, देशासाठी काय करता येईल, याचा विचार करू या असे सांगून संस्थेच्या वतीने रहिवाशांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
वंदे मातरम राष्ट्र गाण ला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सौ लता जनार्दन यांनी या गाणचा अर्थ सोप्या शब्दात समजावून सांगितला. तर श्री श्रीकांत जोशी यांनी तन्मयतेने वंदे मातरम् राष्ट्र गाण गाऊन दाखविले.

या कार्यक्रमात चौदा वर्षांच्या आतील मुलांच्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविल्याबद्दल निखिल कृष्णन, जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल अरणा हेडाउ, रिनया कुमार, जर्मनीत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयात मास्टर्स पदवी संपादन केल्याबद्दल अक्षता उत्तम चव्हाण, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्वचारोग विषयात एम डी पदवी संपादन केल्याबद्दल डॉ संयुक्ता पाटील, विपणन विषयात पीएच.डी मिळविल्याबद्दल डॉ स्नेहल अभिषेक जुन्नरकर, तंत्रज्ञान विषयात पीएच.डी मिळविल्याबद्दल डॉ आशुतोष डबली, प्रसार माध्यमांमध्ये अनेक पुरस्कार मिळविल्याबद्दल श्री देवेंद्र व सौ अलका भुजबळ यांना स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन सौ अमृता भावे आणि सौ निशा मूल्या यांनी छान केले.

तर आभार प्रदर्शन करताना, आपण येथून जाताना एकीचा संकल्प करून जाऊ या, असे आवाहन सौ अलका भुजबळ यांनी केले.

या कार्यक्रमासाठी समिती सदस्य सर्वश्री श्रीकांत जोशी आणि प्रमोद नांदूरर्डेकर यांनी परिसरातील सर्व झाडांना तिरंगा रंग देऊन प्रत्येक झाडावर प्रत्येक भारतीय भाषेत राष्ट्रहिताचे अत्यंत सुंदर संदेश लिहिल्यामुळे सर्व परिसराला वेगळीच शोभा आली होती.

225 सदनिका असलेल्या या संस्थेतील आबालवृद्ध प्रचंड मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर बहुतेक सर्व जण अल्पोपाहार करीत गप्पागोष्टी करण्यात रंगून गेले होते. या गप्पागोष्टीतून संस्थेतील रहिवाश्यांची काश्मीर सहल आयोजित करण्याची कल्पना पुढे आली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
