ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला आपणही काही देणे लागतो. केवळ हा एकमेव प्रामाणिक हेतू मनात ठेवून कोल्हापूर शहरातील तरुण जैन मुलांनी, “जैन सेवा संघ” नावाची एक संघटनेची स्थापना केली.
हा संघ नेहमीच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्य करतो आहे. प्रत्येक वर्षी जैन धर्मींयांचे अतिशय पवित्र असे पर्युषण पर्व असते. या पवित्र कालावधीमध्ये कोल्हापूर शहरातील तसेच जिल्ह्यातील जैनमंदीरामध्ये जाऊन रोज सकाळी जिनस्तवनाच्या {प्रार्थना} कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
आतापर्यंत वृध्दाश्रम, लहान मुलांचे अनाथालय, तसेच कोल्हापूरातील शिये येथील करुणालय या एचआयव्ही बाधीत एड्सग्रस्त लहान मुलांना जेथे समाजातून बहीष्कृत केले जाते, अशा मुलांकरीता या संस्थेच्या इमारतीमध्ये एक हाॕल बांधून दिला आहे त्यामुळे त्यांना जणू स्वतःचे हक्काचे घर मिळाले आहे.
प्रत्येक वर्षी पांजरपोळ येथील जनावरांसाठी चारा वाटप केला जातो. त्याचप्रमाणे “भगवान महावीर” जयंतीच्या निमीत्त्याने लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. त्याचप्रमाणे एखाद्या सामाजिक विषयावर उत्तम वक्त्याचे व्याख्यान आयोजित केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून दोन वर्षांपूर्वी व्याख्यान कळंबा येथील जेल मध्ये तेथील कैद्यांसाठी व्याख्यान आयोजित केले होते.
कोरोनातील सेवा
आपण सर्वजण मागील वर्षीपासून “कोरोना” या वैश्विक महामारीचा मुकाबला करत आहोत. मागील वर्षी आणि यावर्षी सुध्दा कित्येक निष्पाप लोकांचे बळी या रोगाने घेतले आहेत. आजही कित्येक ठिकाणी रुग्णालयात लोकांना बेड मिळत नाही. अशा लोकांसाठी विविध ठिकाणी “कोव्हिड सेंटर्स” उभारण्यात आलेले आहेत. प्रशासन, पोलिस दल, डाॕक्टर्स, नर्स तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी स्वतःचे प्राण धोक्यात घालून काम करीत आहेत.
“जैन सेवा संघ” यांच्या नावामध्येच सेवा असल्यामुळे आणि “भगवान महावीरांचा” “जगा व जगू द्या” हाच संदेश आत्मसात केलेल्या जैन सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी पण वेगळ्या पध्दतीने कोव्हीड रुग्णांची सेवा करण्याचे ठरवले. आपण सर्वजण जाणता की या रोगामध्ये सर्वात वाईट काही असेल, तर त्या रुग्णाजवळ घरातील सुध्दा व्यक्ती जाऊ शकत नाही आणि अशा वेळी उपचार घेत असताना कोणीही कुटुंबातील व्यक्ती, पाहुणे, शेजारी, जिवलग असा मित्र परिवार कोणीच जवळ नसल्याने वाईट विचाराने, भितीने आणि घाबरूनच रुग्ण दगावायला लागलेत.
अशा या कोरोनाच्या भयाण वातावरणामध्ये “जैन सेवा संघाने” को.म.न.पा.च्या मान.आयुक्तांच्या परवानगीने “शिवाजी युनिव्हर्सिटीच्या” इमारतीमधील कोव्हीड सेंटर तसेच “जैन बोर्ङींग” मधील व्हाईट आर्मीच्या कोव्हीड सेंटरमधील रुग्णांकरीता “संवेदना हेल्पींग हॕन्ड सोशल फाउंडेशन” च्या साथीने एक दिवसाआड तेथे जाऊन त्यांच्याकरीता खास कार्यक्रमांचे आयोजन पंधरा दिवस आयोजन केले.
या कार्यक्रमात सुरुवातीस प्रार्थना घेऊन, नंतर तज्ञ डॉक्टरांमार्फत योग साधने, ऑक्सीजन लेवल वाढवण्यासाठीचे व्यायाम, फुफ्फुसांवरील व्यायामांची प्रात्यक्षिके हे सर्व दाखविले जाते. त्यानंतर प्रत्येक रुग्ण या आजारातून शंभर टक्के बरा होणार यासाठी रुग्णांचे डॉक्टरांमार्फत कॉन्सलिंग केले जाते व त्यानंतर रुग्णांकरीता मनोरंजनाचे कार्यक्रम केले जातात.
मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये संगीत वाद्यांसह गाण्यांचा कार्यक्रम, गिटार वादन, तबला वादन, कराओके साॕंग्ज सादर केले जातात. त्याचप्रमाणे पारंपारिक लेझीम खेळ करुन रुग्णांचे मनोरंजन केले जाते. हा सर्व कार्यक्रम तेथील रुग्ण मनसोक्त एंजाॕय करतात स्वतः नाचतात, गाणी म्हणतात, कविता म्हणतात. बरेच जण आपली कला सादर करतात, आणि कार्यक्रम संपला की, आम्हाला “कोरोना” झालाय हे आम्ही विसरूनच गेलो होतो अशा उत्स्फुर्त प्रतिक्रिया देतात.
काही रुग्णांनी तर “जैन सेवा संघाच्या” कार्यकर्त्यांना पत्रेही लिहिली आहेत, की जिथे आम्हाला आमच्या परिवारातील लोक येऊन भेटू शकत नाहीत तिथे तुम्ही खरच आमच्यासाठी देवदूत म्हणून येताय असे त्यांचे प्रामाणिक मत व्यक्त केले आहेत.
त्याचप्रमाणे ‘जैन सेवा संघाने’ एक ऑक्सीजन काॕंन्संट्रेटीव्ह मशीन विकत घेऊन ते कोव्हीडच्या रुग्णांकरीता विनामुल्य दिलेले आहे व लवकरच आणखी मशिन घेण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे कोव्हीड सेंटरमध्ये लागणारी औषधे सुध्दा देत आहोत.
तसेच “छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय” या सरकारी दवाखान्यात नुकतीच वाॕटर प्युरीफायर मशीन बसवून रुग्णांकरीता पिण्याच्या शुध्द पाण्याची सोय केलेली आहे.
सध्या कोरोनामुळे सर्वत्र लोकडाऊन आहे. त्यामुळे माणसांबरोबरच मुक्या प्राण्यांचेही हाल होत आहेत. प्रसंगी खाद्य न मिळाल्याने उपासमार होवून घोड्यांचे जीव जाण्याची वेळ आल्याने कोल्हापूरातील टांगेवाल्यांनी तसेच इतर घोङेवाल्यांनी नुकतेच मदतीचे आव्हान केले होते त्या घोङ्यांनाही लॉकडाऊन मध्ये पुरेल एवढा चारा व कडबाकुट्टी, हिरव्या गवताचा चारा असे त्यांना खाण्यासाठी लागणारे साहित्याचे वाटप पंचगंगा नदीवर नुकतेच “जैन सेवा संघा” मार्फत देण्यात आले आहे.
“भगवान महावीर प्रतिष्ठान” कोल्हापूर या संस्थेमार्फत नुकतेच हालोंडी व चोकाक या खेड्यातील कोविड रुग्णांच्या गरजू कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. आजवर ह्या संस्थेने मदतीचा हात देऊन जणू माणुसकी अजूनही जिवंत आहे ह्याची उत्तम उदाहरण जाणवते. त्यांच्या ह्या प्रामाणिक कार्याला सलाम व पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ.9869484800.