“हिंद-दी-चादर” या शहिदी समागमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे नुकतीच; म्हणजे २५ जानेवारी २०२६ रोजी केशरी पगडी परिधान करून दर्शन घेतले. गुरुद्वारा बोर्डतर्फे यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला.

गुरुद्वाराच्या सुवर्णमय वास्तूतून, श्रद्धेच्या शांत पावलांनी केशरी पगडी परिधान करून चालताना अजितदादांचा तो क्षण छायाचित्रात कैद करण्यासाठी मी त्यांना हाक दिली…
“दादा…”
क्षणभर थांबत, चालत-चालतच त्यांच्या खास शैलीत अजितदादांनी दिलेले उत्तर आजही कानात घुमते—

“काय रे, कसा आहेस ?
पगडी बरोबर बसली ना…”

तो क्षण केवळ एक छायाचित्र काढण्याचा नव्हता, तर माणुसकीचा, आपुलकीचा आणि संवेदनशील संवादाचा जीवंत दस्तऐवज होता.

आज, बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादा पवार यांच्या निधनाच्या बातमीने तीच आठवण अस्वस्थ करीत आहे. केशरी पगडीतील तो हसरा, प्रसन्न चेहरा आणि माझ्याशी झालेला तो सहज संवाद; आता स्मृतींमध्येच उरला आहे.

केशरी पगडीतील ती छबी आज केवळ फ्रेममध्ये नाही, तर प्रत्येक संवेदनशील मनात कोरली गेली आहे. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— लेखन, छायाचित्रण : महेश होकर्णे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
