Saturday, January 31, 2026
Homeकलास्नेहाची रेसिपी : ४५

स्नेहाची रेसिपी : ४५

टॉपसिक्रेट चाट
आपण आलू चाट, पापडी चाट, शेवपुरी दहिपुरी, बास्केटचाट असे कित्ती तरी चाट प्रकार नेहमीच आवडीने खातो. कधी घरी बनवतो, तर जास्त करून स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध असलेले हे चाटचे प्रकार बाहेर खास करून कॉलेज, क्लासेस, गार्डन यांच्या आसपास तरी हे नक्कीच असतात कारण बागेत खेळायला येणाऱ्या मुलांपासून ते निवांतपणे वेळ घालवावा म्हणून येणाऱ्या आजी आजोबांपर्यन्त, शाळा, कॉलेज मधील तरुण पिढी यांना,थोडक्यात काय तर, सगळ्यांनाच आकर्षित करणारा,आवडणारा असा लाडका खाद्यपदार्थ आहे हा! म्हणूनच आज असाच एक सुरेख आणि झटपट बनणारा चाट बनवूया.. सुटले ना पाणी तोंडाला ? लागा मग लगेंच तयारीला !

साहित्य :
साध्या ब्रेडचे आठ स्लाईस, अर्धा लिटर गोड दही, सातआठ काजूचे तुकडे, सातआठ बदामाचे तुकडे, एक वाटी चिंचगुळाची चटणी, अर्धी वाटी हिरवी मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, पुदिना यांची चटणी, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी बारीक शेव, थोडेसे डाळिंबदाणे,मीठ चाट मसाला, मिरपूड चवीनुसार, वरून भुरभूरण्यासाठी थोडेसे लाल तिखट.

कृती :
प्रथम ब्रेडच्या कडा काढून घ्याव्यात. या वाळवून त्याची पावडर बनवून ठेवली तर ब्रेडक्रमस म्हणून छान उपयोग होतो. दह्यामधील 2..3 चमचे दही घेऊन त्यात किंचित मिठ घालून दीड ते दोन मध्यम वाट्या पाणी घालून व्यवस्थित घुसळून घ्यावे.आता एकेक ब्रेडचा स्लाईस त्यात बुडवून दोन्ही हातानी घट्ट दाबून घ्यावा. त्यात तीन चार काजू व बदामाचे तुकडे घालून त्याला लाडू सारखा गोल आकार द्यावा व एका खोलगट सर्व्हिंग डिश मध्ये ठेवावा. असे सर्व बनवून झाले की, उरलेल्या दह्यात एक..दोन चमचे पिठीसाखर घालावी. दह्याच्या आंबटपणा नुसार आणि आवडी नुसार, आणि थोडेसे मिठ सुद्धा चवीसाठी घालावे. मस्त फेटून घ्यावे. आता हे फेटलेले दही या वाड्यांवर घालावे. मग त्यावर चिंच गुळाची आंबट – गोड चटणी, हिरवीगार तिखट चटणी घालावी.त्यावरून बारीक शेव घालावी. मग एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवडत असेल तर एकदम बारीक चिरलेली थोडीशी कांद्याची पात, घालावी.
वरून चवीसाठी चाट मसाला व मिरपूड भुरभूरावे. आकर्षक दिसण्यासाठी वरून डाळिंब दाणे आणि लाल तिखट भुरभूरावे. आणि हे चाट सर्व्ह करावे.

वैशिष्टय :
हे चाट आयत्या वेळीही झटपट होते. चिंचगुळाची चटणी बहुतेक घरात असतेच. हिरवी चटणी अगदीच झटपट बनते. यासाठी बटाटे वगैरे उकडावे लागत नाहीत आणि ब्रेडचे बॉल्स पण अगदीच झटपट बनवता येतात. त्यामुळे हे चाट दिसायला खूपच आकर्षक आणि खायला एकदम चटपटीत,मजेदार, सॉफ्ट बनते. मधून मधून दाताखाली येणारे ड्रायफ्रुट्सचे तुकडे आगळीच मजा आणतात. वरून खारे शेंगदाणे किंवा डाळिंब दाणे नसतील तर लाल तिखट बुंदी घातली तरी चालते.पांढरेशुभ्र टेस्टी दही, हिरवीगार कोथिंबीर,चटणी, ब्राऊन चिंगू चटणी, लाल तिखट आणि डाळिंबदाणे , पिवळी,सोनेरी बारीक शेव असे सुंदर कलरफुल चाट नक्कीच आवडेल सर्वांना.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9