“बागेश्री पारीख “
खूप दिवसांनी मंडळात गेले होते .“कुटूंब कोर्टातल्या एक निवृत्त न्यायधीश बाई व्याख्यान देण्यासाठी येणार आहेत“ इतकंच कळलं होतं. ”न्यायधीश” या शब्दातच इतकं काही सामावलं आहे की एक आदरयुक्त व्यक्तीमत्व समोर उभं रहातं.
आपल्यासारख्या सामान्य लोकांचा पोलीस आणि कोर्ट ह्यांच्याशी संबंधच कधी येत नाही. आपण त्यांना सिनेमातच जास्त पहातो. त्यामुळे प्रत्यक्ष त्यांना भेटून, त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी फार कमी वेळा मिळते. कार्यक्रम सुरू झाला आणि पाहुण्यांना रंगमंचावर बोलावण्यात आले..
“माननीय निवृत्त न्यायधीश बागेश्री पारीख” …..आणि माझ्या शेजारी बसलेल्या, माझ्याशी अगदी मृदू आवाजात बोलणाऱ्या, प्रेमळ टिपीकल, ८० वर्षाच्या, आजी वाटतील अशा बाई, उठून रंगमंचावर आल्या. त्यांच्या साध्या पण प्रेमळ, आश्वासक व्यक्तिमत्वाची ही पहिली ओळख. नंतरही त्या अनेक ठिकाणी, अनेक कार्यक्रमात दिसत राहिल्या, त्यांचे अनुभव ऐकायला मिळत गेले आणि त्यांची वैचारिक, सामाजिक कार्याची ऊंची किती मोठी आहे, ह्याचा प्रत्यय येत गेला.
बागेश्रीताई पार्ल्यात पार्ले टिळक शाळेत होत्या. नंतर टाटा इन्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून त्यांनी समाजकार्य या विषयात एम.ए केले. त्यानंतर त्यांनी काही वर्ष एका संस्थेत सामाजिक कार्यकर्त्यां म्हणून काम केले.
बागेश्रीताईंचा विवाह १९७० साली श्री योगेन परीख यांच्याशी झाला. ते एक उच्चशिक्षित, विचारवंत आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ आहेत. बागेश्रीताईंच्या उन्नतीत योगेन परीख ह्यांचा मोलाचा वाटा आहे असे त्या आवर्जून सांगतात.
१९७३ ते १९८०, मुलीच्या जन्मानंतर ती पूर्णवेळ शाळेत जाईपर्यंत, बागेश्रीताई बाहेर काम करीत नव्हत्या. तो वेळ त्यांनी मुलींसाठी ठेवला होता. पण परत जेव्हा नव्यानी काम त्यांनी सुरू केले त्यानंतर मात्र कधी मागे वळून पाहिले नाही.
आधी सर्वच खटले सिटी सिव्हील कोर्टात यायचे. विवाहातील समस्या, घटस्फोट हेही त्यात असायचे. त्या वेळच्या न्यायधीशांना वाटले की यातले अनेक खटले पोकळ आहेत, समुपदेशांनी, सामंजस्यांनी ते सोडवले जाऊ शकतात. ते बाहेर कोणी सोडवले तर कोर्टाचा खूप वेळ वाचू शकेल. म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ॲाफ सायन्सेस कडे हे प्रोजेक्ट आले आणि अनुभव असल्यामुळे बागेश्रीताईंना ॲाफिससाठी जागा व इतर सहकार्य देऊन समुपदेशकाचे हे काम सोपवण्यात आले. ४ वर्षाचे हे प्रोजेक्ट होते. सिव्हील कोर्टात आलेले जे खटले थोडे सुधारून, सांमजस्यानी विवाह बंधन वाचू शकतील असे होते ते खटले बागेश्रीताईंकडे यायचे. बागेश्रीताई आपल्या एका सहकारी स्त्री बरोबर, सर्व बाजूने विचार करून, सर्वांशी बोलून तो विवाह वाचवण्याचे प्रयत्न करत असत आणि अनेक वेळा त्यात त्यांना यश मिळत असे.
काही वर्षानंतर पुणे, औरंगाबाद, मुंबई इथे फॅमिली कोर्ट सुरू झाले. बागेश्रीताईंचे समुपदेशाचे काम चालूच होते. त्यांचा अनुभव पहाता “तुम्ही जज म्हणून याल कां ?” विचारणा होत होती. पण त्यांच्याकडे लॅा कॅालेजची डिग्री नव्हती. त्यांची जिद्द होती, कष्ट करण्याची तयारी होती. आपल्यामुळे समाजाला फायदा होत आहे, अनेक विवाह सुरळीत चालू आहेत हे समाधान त्यांना होते. त्यांनी शासकीय विधिमहाविद्यालयात प्रवेश घेऊन, ३ वर्षे अभ्यास करून कायद्याची पदवी प्राप्त केली. सकाळी कॅालेज, मग नोकरी, मग घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी हे यश मिळवलं. त्यांची मुलगी तेव्हा मेडिकलला अभ्यास करत होती. दोन वर्षानंतर त्यांची मुंबई उच्च न्यायालयाकडून रितसर मुलाखत घेऊन बांद्र्याच्या नव्याने सुरू झालेल्या कुटुंब न्यायालयात, न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक केली गेली. त्या तिथे १२ वर्ष कार्यरत होत्या.
बागेश्रीताईंना समाजसेवेचा वारसा त्यांचे वडिल सदाशिव धुरंधर यांच्याकडून मिळाला आहे. सामाजिक जाणिव, केसेस सोडवण्याचा अनुभव ह्याचा त्यांना अनेक कठिण न्याय देतांना उपयोग झाला. निवृत्तीनंतरही त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवायचे ठरवून त्या पार्ल्याच्या टिळक मंदीर ह्या प्रसिध्द संस्थेत जायला लागल्या. समुपदेशक म्हणून त्यांनी तिथे काम सुरू केले. दिलासा ह्या ग्रूप तर्फे १८ स्वयंसेवक तयार करून त्यांनी हेल्प लाईन सुरू केली.
फोनवरून संवाद साधून, जेष्ठांच्या, पिडीत महिलांच्या समस्या त्या सोडवितात. जेष्ठ लोकांसाठी त्यांनी कार्यरत रहावे म्हणून अनेक कार्यक्रम राबविले. अनेक वृध्दाश्रमाची माहिती संकलित करून, तिथे गरज असणाऱ्यांना मदत करत, त्यांच्याशी संपर्कात राहून , त्यांचे प्रश्न, कष्ट कमी करायचा प्रयत्न, त्या करतात. ज्येष्ठांसाठी डे केअर सुरू करावे अशी त्यांची फार इच्छा आहे. त्यासाठी त्या प्रयत्नशीलही आहेत.

वयाची ८० उलटली तरी बागेश्रीताई तितक्याच उत्साहात, तितक्याच तन्मयतेने, शांततेने, प्रेमभावनेने सर्व काही करत असतात. त्यांच्या अनेक गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत. त्या कलाकार आहेत. निवृत्तीनंतर त्या समाजसेवे खालोखाल आपल्या छंदांना वेळ देतात. त्या दरवर्षी शाडूचा गणपती करतात. त्यांच्या हॅालमध्ये एक मोठी शोकेस आहे. त्यांत त्यांनी केलेले गणपती जपून ठेवले आहेत. त्या मुलांनाही गणपती करायला शिकवतात. त्यांनी भरपूर ॲाईल पेंटनी चित्रे काढली आहेत. अतिशय अभिमानानानी ती हॅालमध्ये फ्रेम करून लावली आहेत. वारली चित्रकला त्यांना शिकायची होती. म्हणुन त्या, वारली चित्रकला शिकल्या.

त्यांच्या घरातील एका मोठ्या दरवाजावर त्यांनी त्यांची वारली चित्रकला सादर केली आहे. एक आणखी अनोखी गोष्ट म्हणजे त्यांना रांगोळी काढायला खूप आवडते. आधी खाली बसून त्या गालिच्या इतक्या मोठ्या रांगोळ्या काढत होत्या. पोर्ट्रेट हा त्यांचा आवडता विषय ! अनेक नामवंत, प्रसिध्द व्यक्तिमत्व त्यांनी रांगोळीत काढली आहेत. स्वतःच्या आनंदासाठी आताही त्या खुर्चीवर बसून, टेबलावर रांगोळी काढतात. त्या सर्व रांगोळ्याचे छायाचित्रण करून, छान फ्रेम हॅालमध्ये ठेवल्या आहेत. २०२५ च्या “आम्ही पार्लेकर” मासिकाच्या मुखपृष्ठावर बागेश्रीताईंच्या रांगोळीला मान मिळाला आहे.

बागेश्रीताईंची तंजावर चित्रकला शिकण्याची फार इच्छा होती. ती कला शिकून घेऊन अतिशय सुंदर चित्रे त्यांनी काढली आहेत. त्यांची हॅालमधली ही सर्व चित्रे पहातांना आपण एखाद्या आर्ट गॅलरीत आलो आहोत असेच वाटते.

बागेश्रीताई एव्हढ्यावर थांबल्या नाहीत. त्या शास्त्रीय संगीत शिकल्या आहेत आणि त्या उत्तम गातात. त्या उत्तम वक्त्या आहेत. आपल्या कुटुंब न्यायालयातील गंमती जंमती सांगून त्या समाजात जागृती निर्माण करण्यासाठी, अनेक ठिकाणी भाषणासाठी जातात. त्यांच्याकडे लिखाणाचीही हातोटी आहे. आपल्या अनुभवांवरचे “अनुभूती” हे पुस्तक त्यांनी लिहीले आहे. त्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे.

अशा हरहुन्नरी बागेश्रीताईंच्या घरी जाण्याचा एकदा योग आला. त्यांना स्वयंपाकाची, नवीन पदार्थ बनवून इतरांना खाऊ घालण्याची अतिशय आवड आहे. आमच्या साठीही मेजवानी तयार होती. बेसन हा महिलांचा स्वयंपाकघरातला आवडता पदार्थ ! बागेश्रीताई त्यापासून टिकावू, फळं, सिंह ह्या सारख्यात् कलाकृती करतात. त्यांच्या घरातली आणखी एक गोष्ट, त्यांच्या परवानगीने मला इथे सांगायला आवडेल, ती म्हणजे त्यांच्याकडे जवळ जवळ १०० वर्षांपूर्वीची पितळेची भातुकलीची खेळणी, भांडी आहेत आणि त्यांनी ती जपून, हॅालमध्ये ठेवली आहेत. त्याचाही फोटो काढलाय मी कारण ही सर्व भांडी खूप छान आहेत.
इच्छा असेल तर एक व्यक्ती काय काय करू शकते ह्याचा समाजापुढे आदर्श म्हणजे बागेश्रीताई आहेत. त्यांनी त्यांचे आकाश ओळखले, निवडले आणि त्यात निवृत्तीनंतरही त्या आनंदानी विहार त्या करत आहेत आणि इतरांनाही आनंद देत आहेत. त्या सतत असाच आनंद वाटत रहाव्यात, यासाठी त्यांना खूप शुभेच्छा !

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
