Monday, February 16, 2026
Homeपर्यटन"बदामी" भारतीय वारसा : 1

“बदामी” भारतीय वारसा : 1

गेले काही महीने ऋतुराज; माझा मुलगा मागे लागला होता, आपण डिसेंबर मध्ये सुट्ट्या आहेत, कारने फिरायला जाऊ या ? खरे तर आजकाल वयोमानामुळे कारने एवढा लांबचा पल्ला गाठायचा, झेपतील ना असले पराक्रम.? असे क्षुद्र विचार आधी येतात. हाहा !
पण त्याने ज्या जागेचे नाव घेतले ती वास्तु, ते प्राचीन वैभव, तो भारतीय वारसा बघण्याची इच्छा तर खूपच होती. ठरविले ..ऋतू आहे ना ..घेईल तो काळजी ..चला, कार्यक्रम तर ठरवू या.
चर्चा, सुट्ट्यांचे गणित, डॉ च्या तारखा, करता करता एवढे निश्चित झाले की १३ डिसेंबर ते २३ डिसेंबर तो आमच्या बरोबर हिंडू शकेल पुढे त्याचे आणखी इतर कार्यक्रम होते. आणखी नातेवाईकांना विचारण्यात आले .. कोणाच्या तब्येती, कोणाच्या सुट्ट्या, यामुळे बरेच गळत गेले शेवटी २ किंवा ३ कार मधून १०, १२ लोकांसह जाण्याचे त्याचे स्वप्न तर लयास गेले. ठरले ते पाच.. पैकी तो एकटाच तरुण, वाहन सारथ्य करणारा आणि आम्ही चौघेही सत्तरी पार केलेले. त्यात एकाच्या तर चार,पाच वेळा अनेक शस्त्रक्रिया झालेल्या. नातेवाईक आ वासून ऋतूचे धाडस बघत होती.. तू यांना नेतोय ? आणि ते देखील “बदामी” ला ? डोंगरावर गुंफा बघायला ? पण मनात असेल तर माणूस काय करू शकतो, याचे सकारात्मक, प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे आमची ती ट्रिप ठरली आणि म्हणूनच तिचे वर्णन लिहावयाचा माझा उत्साह दुणावला .

हा मोठा पल्ल्याचा कार्यक्रम अगदी लहान पाचच दिवसांचा होता नंतर पुण्याजवळचे कार्यक्रम ठरले होते.

१३ तारखेला मुंबई पुणे करून आम्ही १४ ला पहाटे पुण्याहून सुसाट निघालो . ठरले होते संध्याकाळ पर्यंत कर्नाटकातील सुप्रसिद्ध धबधबा ..” गोकाक” ..बघण्याचे . मध्ये न्याहारी, जेवण करीत टप्प्याटप्प्याने आम्ही जात होतो . प्रत्येक वेळेस ऋतुराज ज्येष्ठांना धरून नेत असे. आम्हाला हसूच येत असे.

काळोख व्हायच्या आत आम्ही आमच्या गंतव्य स्थानावर पोचलो. “गोकाक ” !
तो धबधबा कसा असेल, पाणी भरपूर असेल का नाही ? तेथील दृश्य किती मनोहारी, असेल ना ? वगैरे प्रश्न मनास विचारीत, स्वप्न रंगवत आम्ही रस्ते विचारीत पुढे जात होतो. स्थानिकांना विचारण्याची वेळ आली कारण गूगल मावशी रुसून बसली होती. पुढे काहीच बोलत नव्हती. सारखे एवढेच की तुम्ही आपल्या जागेवर पोचलाय. हं हं ! बरे स्थानिकांना विचारून त्यांचे उत्तर समजून घेणे म्हणजे एक दिव्य च की ! आपल्याला कानडी भाषेचा ओ का ठो कळत नाही.आणि स्थानिकांचे बोलणे म्हणजे अगदी” बुलेट ट्रेन”. हो, हो, !! करीत आम्ही पुढे सरकायचो. पुढे एक स्त्री दिसली बोरे, चिंचा असले काही बाही विकत होती. तिला विचारले आणि अहो आश्चर्यम् ! ती चक्क मराठीत बोलत होती. वाह वाह! आभार आजीबाई म्हणत…झूमsss करीत ऋतुने गाडी प्रपातासमोर आणून उभी केली. तेथील खडकाळ रस्ता , धूळ व मातीने आसमंत भरलेला, अशा परिस्थितीत मेव्हण्यांचा हात धरून ऋतू पुढे चालत गेला. बऱ्याच वरून आम्ही धबधब्याचे दर्शन घेतले. फारच आक्रसला होता तो. पावसाळ्यात दिसणारे त्याचे रौद्ररूप आता अगदीच केविलवाणे दिसत होते.

दोन जागी चिंचोळी धार खाली पडत होती. पावसाळ्यात त्याचे बघितलेले अल्लड रूप, उंचावरून खाली उडी मारत कोसळणारे ते जलमय झालेले, खळाळते स्वरूप, त्याचा ठाव ठिकाणा नव्हता. खरे तर यावर्षी भरपूर पाऊस झाला होता आणि इतके काही महीने लोटले नव्हते पाऊस जाऊन तरी एवढे कोरडे का पडले ? थोडा तरी विरस झालाच . ऋतू आम्हाला वरच्या बाजूला सोडून स्वतः खालपर्यंत जाऊन आला .एका आणखी गोष्टीची खंत वाटली..मध्य प्रदेश चा मांडू महाल, भेडाघाट प्रपात वगैरे जागांवर मी बऱ्यापैकी स्वच्छता बघितली तेथे आर्कियालॉजी डिपार्टमेंट चांगले काम करीत आहेत पण महाराष्ट्र आणि कर्नाटकात अजून त्या बाबतीत औदासिन्य दिसते. धबधब्याच्या खाली चक्क प्लॅस्टिक च्या बाटल्या, कागदाचे कपटे मस्त वाहत होते. भारताचे हे दुर्दैवच नाही का ? कधी सुधारणार आपण ? मागील बाजूस गेलो तेथून खाली उतरणे जरा सोपे आहे असे कळले. पण तिकडून जाणे बंद केले होते . खरे तर या गोष्टीचा मला आनंदच झाला कारण किमान त्या बाजूने तरी स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला जातोय असे वाटले

तेथून परत फिरलो. नाही म्हटले तरी भारताची ” एक धरोहर ” बघितल्याचे समाधान खूप होते…” . गोकाक..”
गोकाक हे भारताच्या कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील गाव .. गोकाक तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे. घटप्रभा व मार्कंडेय या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गोकाक बेळगावापासून ७० कि.मी. अंतरावर आहे. गोकाक जवळच घटप्रभेवर गोकाक धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी खूप पर्यटक येतात. त्यातलेच आम्ही पाच ..!

अगदी जवळच खूप जुनी टेक्सटाईल मिल आहे . ती बघितली. माझे दीर टेक्सटाईल इंजिनियर, त्यांच्यासाठी त्या लांबच लांब मिलचे चित्रीकरण करण्यात मी इतकी गुंतले की विसरलेच कार जवळ सारे माझी वाट बघत आहेत .

इंग्रजांच्या काळात १८८७ मध्ये बांधलेली..दगडी काम प्रेक्षणीय आहे..आतून बघता आली नाही पण कळले की तेथे अजूनही बांबू वापरून टॉवेल्स तयार करतात..तेथेच दाराशी त्यांचे आऊट लेट ही आहे. काही विकत घ्यायचे असेल तर दुकान जवळच आहे ते. पूर्वी त्यांचा धागा ३०, ४० देशांना निर्यात होत असे. अजूनही होतो का मला अधिक माहिती घेता आली नाही. पोलो टी शर्टस साठी पण ती प्रसिद्ध होती. असे कळले तेथील स्थानिकांशी बोलताना..पण पुनः भाषेची अडचण व जेथे उतरलो होतो ते हॉटेल शोधायची घाई त्यामुळे आवरते घेतले.

एक दोन गल्ल्या फिरत पोचलो आमच्या हॉटेल वर … रस्ते फारसे प्रशस्त नव्हते. हॉटेल ही ठीकच ! आधी तर मुख्य द्वार कोणते हेच उमजत नव्हते. खाली उतरून ऋतुने विचारपूस केली . आजकाल काय.. सर्व बुकिंग ऑन लाईन करीत असतात मुलं.. त्यात भव्यदिव्य वर्णन, फोटो बघून भुरळ ही पडते. कधी अपेक्षेप्रमाणे मिळते ही, तर कधी निराशा पदरी पडते . असो ..आम्हाला काही त्यात खूप दिवस वास्तव्य करायचे नव्हते . एका रात्रीचाच प्रश्न होता . त्यामुळे फारसा फरक पडत नव्हता. सकाळची न्याहारी करून बदामी कडे कूच करायचे ठरलेच होते.
नाश्त्यात ही गंमतच आली. मी ऋतूला म्हटले ..कर्नाटकात वेगवेगळे डोसे मिळतच असणार, विचार तर किती प्रकारचे आहेत ?. उत्तर मिळाले… आम्ही एकही साऊथ इंडियन डिश तयार करीत नाही. हाच आमचा वेगळेपणा..! माझी फटफजिती बघून सारेच हास्य कल्लोळात बुडाले.

बदामीकडे जाणारा रस्ता ही यथा तथाच. वाटले स्टेट हायवे आल्यावर बरा असेल ..तो ही काही अंतरापर्यंत ..आपण समुद्राच्या उसळत्या लाटांवर बोटीने चाललोय असा अविस्मरणीय आनंद देणारा..!

नंतर मात्र उत्तम..बदामी हॉटेल च्या जवळ जवळ जाईस्तोवर आपल्या लक्षात येते की आपण एका भव्य डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावात शिरलोय … दृष्टी जाईल तेथे मोठमोठे, भव्य डोंगर कडे..उंच उभे, प्रशस्त पसरलेले आडवे खडक, डोंगर दऱ्यांवर प्रेम करणारा स्तब्ध च होईल. त्या मौनातही ते खडक त्याच्याशी बोलू लागतात..” गीत गाया पत्थरोंने” ची आठवण येते. निर्जीव कातळ तुमच्या सोबत गुणगुणतोय असे वाटू लागते. लाल रंगाचा हा खडक वाळूचा आहे. म्हणूनच त्या पर्वत रांगांना बहुधा सिस्ट असे म्हणतात.

येथे चालुक्य राजा जयसिंग याने राज्य केले त्यानंतर रणराग राजा आला चालुक्य राजांच्या बद्दल मला जास्त माहिती नाही. पुलकेशी प्रथम आणि द्वितीय यांच्या बद्दल सांगतात . 543 मध्ये बदामी तयार करण्यात आले.. उत्तरेकडील टेकडीवर बदामी किल्ला आहे पुलकेशी द्वितीय हा पराक्रमी राजा होता. नर्मदेपासून कावेरी पर्यंत त्याने आपला राज्य विस्तार केला 756 मध्ये राष्ट्रकूट राजा दंतिदुर्गा (उच्चार कळला नाही) यांच्यामुळे बदामी येथील चालुक्य राज्य अस्ताला गेले असे सांगतात..
चालुक्य कलाकारांनी उभारलेले येथील शिल्प देखणे तर आहेच पण ते निर्जीव कातळाला कोरून द्रविड मंदिराच्या शैलीत आहे. चालुक्य राजांनी सतत आपली राजधानी बदलली. आधी आयहोले, नंतर बदामी मग पट्टदकल …त्यामुळे झाले काय…की बदामी चा हा संपूर्ण परिसर नुसता मंदिरांनी भरलाय. किमान १५० मंदिरं तरी बघायला मिळतात.

आम्ही सकाळी दहा च्या सुमारास हॉटेल मध्ये पोचलो. छान होता परिसर. भरपूर फुलांनी नटलेला ..अनेक वृक्षांच्या छायेत शीतल झालेला, ऊन कडक असूनही जाणवत नव्हते ..रिसेप्शन वर छान स्वागत झाले .आनंद झाला की एक गृहस्थ भाळी भस्माचे शैव पट्टे फासलेला शुद्ध हिंदीत बोलत होता.. आमचे सर्वांचे वय बघून , मोठ्या बहिणीच्या हातात काठी बघून आधी धास्तावलाच..म्हणे तुम्ही सारेच वयस्कर दिसता, त्रास होऊ शकतो .. गुंफा चढायला २०० पायऱ्या आहेत पण नंतर सांगू लागला… काळजी करू नका .. एक एक गुंफा बघा , तेथे थांबून मग वर चढा. अश्या चार गुंफा .एक एक बघायची विश्रांती घ्यायची काही हरकत नाही .. तरुणांना तासभर लागतो ..तुम्हाला दोन तास लागतील त्यात काय ! त्याचे असे विवरण ऐकून हायसे वाटले. वर हे ही सांगितले.. आता जेवून घ्या, थोडी विश्रांती घ्या मग उन्हं कलताना निघा. काळोख व्हायच्या आत पूर्ण करा पण .. मुद्दाम विचारले , आपण काय करता ? उत्तर मिळाले मी इथला गाईड आहे. तरीच ! आमची सर्वांची नेत्र पल्लवी !

अर्थात आम्ही मार्गदर्शक ठरवणार नव्हतो.. आमची चालण्याची गती त्याला परवडणारी नव्हती.

जेवण ही उत्तम होते. केळीच्या पानावर कर्नाटकी पद्धतीने साड्या नेसलेल्या सेविका प्रेमाने असंख्य पदार्थ वाढत होत्या. मी अर्थात खाण्यात कच्चे लिंबू..गम्मत म्हणजे तो कॅशियर पण म्हणाला ..
“अहो, त्या मॅडम चे काय घेऊ पैसे ? त्यांनी तर काहीच खाल्ले नाही” हाहा !

जरी गुंफा, हॉटेल च्या जवळ होत्या तरी तेथवर कारने जाणेच भाग होते ..बराच मोठा वळसा घालून चिंचोळ्या गल्ल्यांमधून त्या पायथ्याशी जावे लागते. तेथे जरा मोकळी जागा आहे .कार पार्किंग साठी. पण, अबब ! प्रचंड गर्दी ..बहुधा सुट्टी असल्याने शाळा आल्या होत्या . मुला मुलींना आवरत त्यांचे शिक्षक रस्ताभर विखुरलेले दिसत होते. आम्हाला बऱ्याच आधी कार ठेवून चालत जावे लागले. त्या एवढ्याश्या अरुंद बोळीतून उंच सखल दगडांवर चालणे मेव्हण्यांसाठी जरा अवघड च ! हळूहळू सावरत , समोरून येणाऱ्या गाड्या चुकवत कसे बसे पायथ्याशी पोचलो. तेथे एका दुकानात किंचित विसावा घ्यावा म्हणून थांबलो तर …आभाळापर्यंत जणू उंचच उंच , डोंगरात कोरुन काढलेल्या अजस्त्र पायऱ्यांचे दर्शन घडले आणि धाबेच दणाणले बहिणीचे ..ते दोघे म्हणे ..तुम्ही जा असे वाटते आम्ही येथेच थांबतो. ती दुकानातील विक्रेती पण म्हणे ..भाग्याने ती मराठीत बोलत होती..”.नका नका जाऊ ..आजोबांना खूप त्रास होईल “. पण ऋतुराज ..आमच्या घरचे श्रावण बाळ.. ” चला, चला, मी आहे न ! बघा पहिली गुफा तर बघू ..तेथपर्यंत जायला खूपच कमी पायऱ्या आहेत..चला चला…”
आम्ही निघालो … वळसा घालून थोडे चालल्यावर पोचलो पायथ्याशी. तिकिटं वगैरे विचारपूस सोहळा पार पडला आणि समोर दिसली. किमान 30, 35 पायऱ्या चढून जायलाच पाहिजे ..त्या पायऱ्या म्हणजे काय ? खडक कापून जिना तयार केलेला. त्या एकेक पायरीची उंची किमान १५, २० इंच असावी.. ज्यांच्या गुढग्यात “दम” असेल तोच इतके उंच पाऊल टाकू शकेल.. आता होती ऋतूची परीक्षा ..होहोहो ! माझी मोठी बहीण काठी टेकवत चढत होती..तरुण मुली तिला बघून थबकल्या..” वाह..आजी ..कमाल…तुम्ही आमची प्रेरणा आहात …” ती बहीण आहेच तशी..खोल डोहामध्ये उंचीवरून सूर मारणारी, मासोळीसारखं सुळकन पाण्यात पोहणारी, नदीच्या पात्रावर असलेल्या रोप वरून एकटीच बिनधास्त ऐल तीरावरून पैल तीर जाणारी…!…” वाह, आजी,” असे म्हणत आजकालचा प्रिय इमोजी ‘अंगठा ‘ दाखवीत त्या मुली पुढे जात होत्या .ऋतू मेव्हण्यांचा हात धरून चढवत होता ..त्यांचे झाल्यावर पुनः बाबांसाठी खाली जात होता. शेवटी साऱ्यांनी ..प्रथम गुंफा ..सर केली . शाळेच्या मुलांचा त्यांच्या भाषेत आम्हाला अगम्य असा चिवचिवाट चालू होता.

मी शांतपणे गुंफेतील मूर्त्या निरखीत होते. कसे कोरले असेल ? पूर्णपणे शंकराला समर्पित अशीही गुफा. ही सर्वात जुनी. जेआणखी वर तीन गुफा नंतर तयार झालेल्या. पहिल्याच दालनात शिरण्याआधी चढताक्षणी उजवीकडे नटराजाची मूर्ती दिसते. १८ हातांची ८१ नृत्य मुद्रा बघूनच आपण अवाक होतो.शिवाय साप, डमरू आणि त्रिशूळ आहेच.
नटराज बघताना मला आठवतात माझे शिल्पकार गुरू. त्यांनी तयार केलेली नटराजाची मूर्ती . त्यांनी दाखविलेली कुमार स्वामींची पुस्तकं.. रामचंद्र शुक्ल यांचे निबंध..
सृष्टी, स्थिती, प्रलय, तिरोभाव आणि अनुग्रह या पाच क्रियांवर आधारित हे त्रैलोक्यमंगल नृत्य. ते सांगत.. अनंत ब्रह्मांडाचे केंद्र चिदंबरम् आपल्यात ही असते कारण आपण पिंड ना ? तेथे नटराज सदैव नाचतच असतो. हे नृत्य जीवात्माला दिसत नाही खरे आहे… कैलास लेणे बघताना ही मला असेच झाले होते… आपल्या अंतरी, आपल्या मनाच्या आतील गाभाऱ्यात जोवर हे झळाळून उठत नाही तोवर त्याची अनुभूती कशी होणार ? आपण सारी सामान्य माणसं . !
या नृत्याच्या मागे ही तीन मुद्दे आहेत .
१…संपूर्ण विश्वाच्या गतिमानतेचे प्रतीक
२ ..संपूर्ण जीवांना अज्ञानातून मुक्त करणे
आणि
३ म्हणजे फक्त चिदंबरम् मध्ये होत नसून साऱ्या मानवमात्रांच्या हृदयात होत असणारे हे नृत्य.

त्या मूर्तीला नीट बघ ऋतू..डमरू म्हणजे निर्मिती चे चिह्ण, शंकराचा अभयहस्त हे संरक्षण, उचललेला पाय म्हणजे मुक्ती आणि चिरडलेला राक्षस हा अज्ञानाचे, अंधाराचे प्रतीक आहे.

शाळेतील मुलांच्या गोंगाटाने, रखरखीत उन्हामुळे घशाला पडलेली कोरड, इतरांना किंचित जाणवत असलेला थकवा आणि ऋतूच्या हाकेमुळे मी त्या समाधिस्त अवस्थेतून बाहेर आले.

दालनात उजवीकडे महाकाय अर्ध नारीश्वर ची मूर्ती दिसते. उजवा अर्धा चेहरा शिवाच्या जटा, तिसरा डोळा यांनी सुशोभित तर डावी बाजू देखण्या स्त्री म्हणजेच पार्वती ची भावभंगिमा दाखविणारी. त्याच्याच समोरच्या भिंतीवर हरीहर चे शिल्प मोहून घेते. उजवीकडील अर्धे शिव आणि डाव्या बाजूस अर्धे विष्णू ..

आता थोडी विश्रांती इतरांना आवश्यक च होती.. पाणी वगैरे पिऊन थोडे ताजेतवाने झालो आणि वर बघितले… अबब! किमान ६०, ६५ पायऱ्या चढल्यावरच गुंफा २ चे दर्शन होणार होते. वर्तकजी तर तेथून परत फिरले. ऋतू त्यांना खालपर्यंत पोचवून विशिष्ट जागेवरच थांबायला सांगून पुनः वर आला. श्री वैद्य हळूहळू ऋतूचा हात धरत वर चढू लागले सौ वैद्य आपल्या काठीचा आधार घेत बिनधास्तपणे, आनंदाने पण हाश हुश्श करीत चढल्याच. शेवटी तो कातळ.!.मधेच वाकडी पायरी, कुठे झाडांची पुढे आलेली फांदी किंवा काटेरी झुडूप ..या सर्व दिव्यातून जावे म्हणजेच विष्णू चे दर्शन होते. कारण पहिली गुंफा जशी शंकराची तशीच दुसरी विष्णूला समर्पित आहे .

याच्या समोरच्याच भागात तंदुल तनु बुटक्यांच्या ओळी कोरलेल्या आहेत. तो व्हरांडा चार स्थम्बांनी पेललेला आहे.त्या प्रत्येक खांबाच्या उर्ध्वभागी सिंहाचे तोंड कोरलेले दिसते. दालनात डाव्या बाजूला विष्णूचा अवतार “वराह” चे मोठे शिल्प आहे. चालुक्य राज्याची मुद्रा देखील हीच होती असे कळले. त्याच्या डावीकडे सर्पांची जोडी आहे. आणि समोरच्या भिंतीवर विष्णू चावाफच अवतार “त्रिविक्रम” कोरून काढला आहे. विष्णूच्या आठ हातात विभिन्न शस्त्रे दाखविली आहेत, आणि ते राक्षसाचा वध करीत आहेत. असे दृश्य बघत राहावेसे . . छता वर गरुडावर बसलेले विष्णू, गंधर्व युग्म, स्वस्तिक आणि एका चक्रात १६ मासे दिसतात. त्यांचे म्हणणे सारे विष्णूचे अवतार या गुंफेत दिसतात. त्रिविक्रम च्या शिल्पाखाली पॅनल वर लहान लहान मूर्त्या बहुधा यश गान करीत आहेत असे वाटते. पाच ही आकृत्यांच्या हातात वेगवेगळी वाद्ये टाळ, मृदंग, बासरी दिसत आहेत. त्यांची केश रचना आकर्षक आहे. पोटावर उदरबंध, गळ्यात व कानात आभूषणे आहेत .उत्तरीय खांद्यावरून मागे पायापर्यंत रुळत आहेत.

त्या काळच्या शिल्पकारांनी घेतलेले हे अपार कष्ट बघून आपण संमोहित तर होतोच पण मनात विचार येत राहतात. त्यांना यातून काय सांगायचे असेल आणखी ? आपण त्यांचा हा विशिष्ट संवाद साधण्यास अपुरे आहोत का ? ही शिल्पं आपल्याला आपल्याच धर्माचा, आत्म्याचा, अध्यात्माचा इतिहास सांगत आहेत ना? त्या शिल्पकारांची कल्पना, जीव ओतून उभी केलेली ही रचना, निर्जीव कातळांना सजीव करून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्याची ती पराकाष्ठा. सारेच थक्क करणारे असते.

येथे श्री व सौ वैद्य यांनी परत या सर्व पायऱ्या उतरून जायचे आहे असा पुढचा विचार करून विसावा घ्यायचे ठरविले. मी आणि ऋतू दोघेच पुढे निघालो.

दुसऱ्या व तिसऱ्या गुंफेच्या मध्येही एक वाट उजवीकडे जाते. त्या बाजूला ही काही पायऱ्या चढणे भाग ..पण तिकडे मुख्य गुंफा नसल्याने आम्ही लांबूनच दर्शन घेतले कारण तिकडूनच बहुधा बदामी किल्ल्याकडे जातात जेथे ऋतु सकाळी एकटाच जाणार होता. पण त्या बाजूला बुद्ध अवतार मधील पद्मपाणी चे शिल्प दिसते. मोठं मोठ्या पायऱ्या चढत आम्ही तिसऱ्या गुंफेपाशी पोचलो. ५७८ मध्ये राजा कीर्तिवर्मा चा भाऊ मंगलेश च्या आज्ञेनुसार ही कोरण्यात आली असे तेथे लिहिलेले दिसते.

डाव्याबाजूस भव्यदिव्य विष्णू चे शिल्प आहे. अजस्त्र सर्पाच्या वेटोळ्यांवर विष्णू विराजमान आहेत. जवळच वराह ची चार हातांची मूर्ती आहे. त्या गृहात जाताना दोन्ही बाजूस असलेले खांब पण सुंदर कोरलेले आहेत. छतावर ऐरावतावर बसलेले इंद्र, नंदीवर बसलेले शंकर आणि हंसावर आरूढ ब्रह्म यांची ही चित्ताकर्षक शिल्पे दिसतात.

आणखी पायऱ्या चढत आम्ही चौथ्या गुंफेत शिरलो.. ही सर्वात लहान गुंफा. सातव्या ते आठव्या शतकातील बांधकाम . शिव, विष्णू, बुद्ध आणि आता ही जैन.
खांबांवर डरकाळी फोडणाऱ्या “याली” च्या प्रतिमा दिसतात. काही जण याला “यली” असे ही संबोधित होते. याली हा एक हिंदू पौराणिक प्राणी, याचे डोके व शरीर सिंहाचे, हत्तीचे सोंड व दात असतात. दक्षिण भारतात या प्रतिमा अधिक कोरलेल्या दिसतात. हा प्राणी सर्वाधिक शक्तिशाली आहे असे मानतात. तसेच हा मानवाचे शारीरिक वा आध्यात्मिक असे दोन्हीचे संरक्षण करतो ही मान्यता आहे.
उजव्या भिंतीवर सुपार्श्वनाथ (सातवे जैन तीर्थंकर) यांची प्रतिमा कोरलेली आहे. आजूबाजूला २४ तीर्थंकर आहेत . गर्भागृहात जैनांचे प्रथम तीर्थंकर आदिनाथ यांची मूर्ती आहे.

चौथी गुंफा बघितल्यावर आम्ही तेथूनच खाली बघितले. अपूर्व दृश्य दिसत होते .. शांत परिसर, निळेशार पाण्याचं मोठं जलाशय. नाव अगस्त्य तीर्थ तळे. त्याच्या पार्श्वभूमीवर आकर्षित करणारे, मोहवून तुम्हाला तेथे यायला बाध्य करणारे भूतनाथ मंदिर, वरूनच काही फोटो घेतले आणि खाली वाट बघत बसलेले आमचे आप्त जन यांना घ्यायला भरभर उतरू लागलो. दुसऱ्या गुंफेशी येताच ऋतुने मेव्हण्यांचा हात धरला ते प्रतिक्षाच करीत होते. मी मात्र पुढे पुढे जात होते.

खाली पोचल्यावर श्री वर्तक यांना भेटून विचार विमर्श सुरू .. अगस्त्य तळे बघायला कोण येतंय ? की हॉटेलात जाऊन चहा पाणी करायचे ? ठरले ते तिघे स्वगृही म्हणजेच उतरलो होतो तेथे जातील. मी आणि ऋतू अगस्त्य तलाव, भूतनाथ टेम्पल बघून येऊ.! कार खूपच लांब पार्क केली असल्याने जवळच्याच स्टँड वरून रिक्षा घेतली आणि त्या तिघांना रवाना केले. तेथे रिक्षावाल्यांची गम्मत च असते.खूप मागे लागतात. कार आहे सांगितल्यावर ही ” तुम्हाला कार पर्यंत सोडू का ? तुम्हाला इकडे सोडू ? तिकडे सोडू का ?” ..त्यामुळे आपल्यालाच सोडवत नाही.

आम्ही रमत गमत निघालो. ऋतूचे म्हणणे तळ्याच्या काठाकाठाने वर भिंतीवरून जाऊ या .. पण मी सरळ जाऊ या म्हणे.. कारण ती डोंगराळ भिंत पुढे भूतनाथ मंदिरापर्यंत जातेय का कळतच नव्हते. शेवटी सरळच गेलो. बरेच वर खाली तरीही करावेच लागते. .मधेच येलम्मा चे देऊळ दिसले.पुनः थोडेसे वर चढलो ..तेथील सुबक कर्नाटकी नक्षी बघत खाली उतरलो .. खेड्यातील मुले एकमेकांची पाठ धरून डोंगरावर घसरगुंडी खेळत होती. मोठ्या खडकावरून गाडी गाडी करत खाली घसरत येणे ..अतिशय लोभस चित्र होते ते. ऋतू ने लगेच क्षणचित्र टिपले. त्या मुलांना कळताच सारे धावत ऋतू जवळ आले..” मेरा फोटो, मेरा फोटो ..निकालो ना .. आणि वेगवेगळे पोजेस देऊ लागले. ” हसूच आले मला. एक मुलगा तर इतका भरधाव पळत आला की आजूबाजूस न बघता फक्त ऋतू कडेच लक्ष्य…छपाक ! धाडदिशी चिखलात बुडाला ! इतर मुले फसफसू लागली मी मात्र उगाच हळहळले ..! ” अरे, तुम्हारा भी फोटो निकालेगा भैय्या ..भागते क्यों हो ? “
बरेच चालून ही काही भूतनाथ ला जाता येणार नाही हे लक्षात आल्यावर परत जायचे ठरविले. हॉटेल मध्ये मस्त गरमागरम नाश्ता चहा चालूच होता इतरांचा. त्याचा आस्वाद घेऊन, जरा विश्रांती होताच ऋतू म्हणाला अजून काही काळोख झाला नाहीये आपण भूतनाथ मंदिर बघायला जायचे का ? फार चढ उतार नाही .कार शेवटपर्यंत जाते कळल्यावर सारेच तयार झाले.
वातावरण आल्हाददायक होते. फार जरी चढायचे नव्हते तरी ज्या काही ७, ८ पायऱ्या होत्या त्यांची उंची भरपूर असल्याने एकमेकांची मदत करावीच लागली. छान च होते कोरीव काम. सगळीकडेच इतकी मंदिरं आणि आतील शिल्पं बघून अवाक होतो आपण.

अगस्त्य तीर्थ च्या पूर्वेकडे असलेली ही ७, ८ मंदिरं आहेत.सर्वात मोठ्या मंदिराच्या गूढ मंडपात एक शिव लिंग आहे. हा मंडप चार अष्टकोनी खांबांवर तोलून आहे. गर्भगृहाच्या वर ही बांधकाम दिसते. ते द्रविड शैलीत. बाहेरच्या भिंतीवर किन्नर आणि गंधर्व कोरले आहेत. काही मंदिरातील कोरीव काम भग्नावस्थेत आहे.पण पौराणिक पशु मखर ची रूपं दिसतात.बाहेरच्या दालनात काही केलेले मला दिसले नाही.

काही मंदिरं उघडलेली नव्हती. एका मंदिरात गंगा आणि यमुना आपापल्या वाहनांवर म्हणजे मकर आणि कासवाच्या पाठीवर आहेत. जवळच्या भागात गणेश आणि महिषासुरमर्दिनी च्या प्रतिमा ही आहेत.
बराच वेळ रेंगाळत राहिलो. मोठ्या जलाशयाच्या काठाशी हे अपूर्व बांधकाम कसे केले असेल हा प्रश्न पदोपदी मनात डोकावत होता त्या अनाम वीरांना , कलाकारांना, शिल्पकारांना नमन करावे असे भरून येत होते.
तेवढ्यात ऋतुने म्हटले ..”ही बघा, नुकतीच सिमेंट ने बांधलेली भिंत ढासळली आहे पण त्याच्या शेजारी आठव्या शतकातील भिंत अजून ही दिमाखात ताठ उभी आहे..” खरे होते..असे का ? हा विचार मला छळत राहिला. जरी काही मंदिरं भग्नावस्थेत होती तरी ही त्यांचे काम निःसंशय आजच्या काळापेक्षा सरस होते.

आता अंधारून यायला सुरुवात झाली होती. उद्या महाकूट, पट्टदकल, ऐहोले बघायला जायचे होते म्हणून काढता पाय घेतला. त्या अरुंद जागेत पाण्याच्या इतक्या जवळ कार पार्क करणे आणि मग तेथून काढणे एक दिव्यच होते ते आमच्या सारथ्याने व्यवस्थित केले.
हॉटेलमध्ये छान ताजेतवाने होऊन जेवणघरात शिरलो..गरमागरम डोसे, पोळ्या भाजी, सांबार मसाले भात पाहिजे ते घेत क्षुधा शांतवली.

आणि उद्याची योजना करीत सर्वांनीच ताणून दिली.
क्रमशः

स्वाती वर्तक

— लेखन : सौ. स्वाती वर्तक. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

मृदुला राजे on उज्ज्वल जीवन
Kavitha Tenny Nadar on झेप : 11