“आशीर्वाद”
“मॅडम. नमस्कार करतो.”
असं म्हणून तो आत आला मॅडमला वाकून नमस्कार केला थरथरत्या हाताने त्यांनी आशीर्वाद दिला.
“ओळखलं ?” त्याने हसून विचारलं. चष्म्यातले डोळे नजर धुंडू लागले. कपाळावरच्या आठ्या अधिक गडद झाल्या. पण त्यात ओळख सापडेना. मग तोच हसून बोलला
“मॅडम मी दत्तात्रय वाघ. 1995 ची दहावी बॅच.”
ते ऐकल्यावर त्या एकदम आनंदून बोलल्या…
“अगबाई ! दत्ता काय तू ? अरे, केवढा मोठा झालास. उंच तरी केवढा ! ये, ये आत ये.”
असं म्हणत शीला मॅडमनी त्याला आत यायला वाट करून दिली. घर तेव्हासारखंच साधंसं. एक कोच, दोन खुर्च्या, छोटासा दिवाण. समोर टीव्ही. त्यावर शोकेसमध्ये मॅडमच्या मुलींनी, सुनेनी केलेली पेंटींग्ज. एक लाकडाचा हत्ती. टीव्ही च्या बाजूला एक फोन.
तो बसला. हे घर त्याला परिचित होतं. शीला मॅडमकडे तो तीन वर्षे, आठवी ते दहावी ट्युशनला येत होता. विषय संस्कृत. दत्ताला या विषयात अजिबात गती नव्हती. पण संस्कृतमध्ये गणितासारखे मार्कं मिळतात म्हणून बाबांनी जबरीने घ्यायला लावलं होतं.
आठवी ते दहावीचं संस्कृत शीला मॅडम घ्यायच्या. पहिल्या युनिट टेस्ट मध्ये संस्कृत मध्ये नापास झाल्यावर बाबांनी त्याला मॅडम कडे शिकायला पाठवलं होतं. बाबा स्वतः पाटबंधारे खात्यात इंजिनियर तर आई कॉलेजमध्ये प्राध्यापिका. पण दत्ताला संस्कृतची अजिबातच गोडी नव्हती. मॅडम कडे तो आला. दहा बाय दहाच्या खोलीत भिंतीला एक फळा लावलेला. खाली सतरंजीवर मुलं बसत. मध्येच कधी पाय थकले तर बसायला मॅडम साठी एक स्टूल. पण त्या फारच कमी बसत त्यावर.
“मॅडम कशा आहात ?
सर कसे आहेत ?”
त्या हसल्या. “मजेत आहे रे. सर पण ठीक आहेत. सध्या मागे बगिच्यात त्यांचं काम सुरू आहे. बोलावते त्यांना.”
“नको नको. मीच जाऊन भेटेल त्यांना. बोलवू नका.”
“तुझं सांग. काय करतो सध्या ?”
“मॅडम मी इंजिनीअरिंग करून पुढे शिकायला अमेरिकेत ला गेलो. तिथेच एम एस करून आता नोकरी करतो आहे. लग्न झालं. दोन मुलं आहेत, एक चौथी आणि दुसरा पहिलीत”
“अरे वा वा !!
छान छान ..अशीच प्रगती कर बाळा. माझे तुला नेहमीच आशीर्वाद आहेत.”
“मॅडम ती क्लासची खोली आहे का अजून ?”
“हो हो ..अरे हीच ना शेजारची”
लागूनच ती खोली होती.
तो आत गेला. तशीच रिकामी खोली. फळा. बाजूला एक स्टूल ठेवलेला. कोपऱ्यात छोटा टेबल. त्यावर दोन सतरंज्या घडी घालून ठेवलेल्या. त्याचे डोळे भरून आले. तिथेच बसून तो शिकला होता. संस्कृतची आवड लागली होती. तसं क्लासला आला नाही तरी चालेल असं मॅडमनी त्याच्या बाबांना सांगितलं होतं. कारण शाळेत आणि क्लासमध्ये त्यांचं शिकवणं काही वेगळं नव्हतच. जीव तोडून शिकवायच्या. मुलांना सगळं समजलं पाहिजे. पाठ झालं पाहिजे. संस्कृत म्हणजे पाठांतराचा विषय. पण समजून पाठ केलं तर अगदी नेहमीसाठी लक्षात राहतं. त्यासाठी मॅडम जीवापाड मेहनत करायच्या. शब्दांच्या विभक्ती प्रत्यय पाठ झाल्या म्हणजे झाल्याच पाहिजेत. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, एकवचन बहुवचन अशा विभिन्न शब्दांच्या विभक्ती कशा बदलतात हे नीट समजावून सांगायच्या. रोज क्लासमध्ये काल शिकवलेलं घोकून घ्यायच्या. दत्ताला संस्कृतची गोडी लागली. सगळे व्याकरण, सुभाषितं, लेखन सुधारले. दहावी मध्ये त्याने संस्कृत मध्ये पैकीच्यापैकी गुण घेतले. मग शाळेत फोटो, पेपर मध्ये फोटो, अभिनंदनाचा वर्षाव. आई बाबांचा आनंद हे सगळे तर झालेच.

पण तेवढ्यातच त्याच्या बाबांच्या बदलीची ऑर्डर आल्याने सर्वांना दुसऱ्या गावाला जावे लागले. या सगळ्या गडबडीत शीला मॅडमना भेटून हा आनंदाचा क्षण शेअर करायचा, नमस्कार करायचा राहून गेला. शिवाय परीक्षेच्या आधीच्या महिन्याची शेवटची फी देणेही राहून गेले. ती बोच होतीच. गाव सोडून गेल्यावर पुन्हा गावात यायला मिळाले नव्हते. हवे तर तो चेक किंवा मनीऑर्डरने पैसे पाठवू शकला असता. पण त्याला ते प्रशस्त वाटलं नाही. त्यापेक्षा त्यांना भेटणं जास्त आनंददायी होतं.
मॅडम खूपच निस्पृहपणाने आपलं काम करायच्या. कोणी अडचण सांगितली की त्याला त्या महिन्याची फी देऊ नकोस असं बोलायच्या. पैशासाठी क्लासेस घेत नव्हत्याच. विषयात कमी गती असलेल्या मुलांना चांगलं समजावं, त्यांनी चांगल्या तऱ्हेने पास व्हावं हाच आटापिटा असायचा. त्यांची स्वतःची मुले मुली सगळी परगावात. त्यामुळे त्या आणि सर हे दोघेच एकमेकांचे सोबती. झालंच तर घरी येणारी मोलकरीण. बाकी फारसं कोणाचं येणं जाणं नव्हतं. येणाऱ्या पेन्शनवर सगळं निभत होतं. राहणीमानही साधं असल्याने कधीच कुठे अडले नाही. दत्तात्रयने मॅडम ना विचारलं,
“मॅडम तुम्ही क्लासेस घेता का अजून ?”
“नाही रे ! 97 नोव्हेंबर मध्ये रिटायर झाले. नंतर दोन-तीन वर्ष खूप मुलं येत राहिली. शिकवणं आवडत होतंच. थोडीफार आर्थिक मदतही होत होती. पण क्लासेस असल्यामुळे आम्हाला आमच्या मुलांकडे जायला बंधनं येऊ लागली. या शाळेच्या मुलांचा सिल्याबस संपवल्याशिवाय मी कुठे जाऊ बघत नसे. मग मुलं आणि हे नाराज व्हायचे. 2000 सालानंतर क्लासेस बंद केले. नंतरही मुलं विचारायला यायची. पण नाहीच म्हटले” मॅडमच्या डोळ्यात अश्रू तरळले.
“बरं बरं.. काही हरकत नाही. आरामच करायचा ना तुम्ही. चांगलं केलंत नाही घेतले क्लासेस.”
“अरे ! मी तुझ्याशी बोलतच राहिले. बस तू. मी चहा करते तुझ्यासाठी.”
तो मागच्या बगिच्यात गेला. सर तिथेच होते. त्यांना ओळख देऊन नमस्कार करून त्यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात मॅडमनी दोघांना चहासाठी हाक मारली. किचनमध्ये चिवडा आणि चहा ट्रे मध्ये ठेवला होता. तेवढा ट्रे मॅडम ना उचलेना. दत्तात्रयनेच तो बाहेर आणला.
“छान झालं, तू आज आलास. काल चिवडा केला होता मी. आजकाल काही करणं होत नाही रे. पण असंच मनात आलं आणि केला.” त्याने मन लावून प्रेमाने चहा चिवडा घेतला.
“छान झालाय चिवडा” असंही म्हणाला.
थोडाफार बोलणं झाल्यावर तो निघाला.
“मॅडम येतो मी. मला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. कधी बोललो नाही पण तुम्ही माझ्या खूप लाडक्या मॅडम होत्या. तुमची कधी भीती वाटली नाही. कारण रागावणं किंवा मारणं तुमच्या शब्दकोषात नव्हतंच. तरीही तुमचा धाक होता. रोज तुमच्या विषयाचे पाठांतर करूनच येत होतो. त्याचा मला खूप म्हणजे खूपच फायदा झाला. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की मला तुम्ही गुरु माऊली म्हणुन भेटलात.”
असे म्हणून त्याने पुन्हा मॅडमला नमस्कार केला वाकून आणि खिशातून एक पाकीट काढून हातात ठेवले.
“हे काय ??”
मॅडम बाबांच्या बदलीमुळे आम्हाला तेव्हा तडकाफडकी जावे लागले. शेवटच्या महिन्याची फी देता आली नाही. ही माझी गुरु दक्षिणा समजा हवं तर.”
मॅडमनी पाकीट उघडून बघितलं.
“अरे !! या इतक्या नोटा ! माझी फी तर फक्त 50 रुपये होती.”
“हो मॅडम. पण तुमच्या बद्दलचा आदर, प्रेम व इतकी वर्ष काहीच करू शकलो नाही म्हणून एवढा माझ्या कमाईचा हिस्सा तुमच्यासाठी वेगळा ठेवला होता. ती प्लिज ठेवा.” मॅडमनी शांतपणे पाकीट बंद केलं.
“दत्ता मी पैशासाठी कधीच शिकवत नव्हते. मला फक्त वाटायचं की मुलांना हा विषय अवघड वाटायला नको. तो समजून घेतला पाहिजे. आणि तुलाही माहिती आहे मी कितीतरी मुलांकडून पैसे घेतले नाहीत कारण त्यांना ते शक्य नव्हतं. तू तर माझा लाडका विद्यार्थी. तुझ्याकडून कसे घेऊ ? आणि एवढे ?”
दत्तात्रय वरमला. म्हणाला…
“मॅडम मला माहिती आहे तुम्ही पैसे घेणार नाहीत. म्हणूनच म्हटलं की गुरु दक्षिणा समजा. फी नाही. तुमच्या बद्दलचा आदर व्यक्त करतोय असं समजा.”
मॅडम किंचित हसल्या.
“दत्ता तू एवढ्या प्रेमाने मला भेटायला आलास. गप्पा गोष्टी केल्या. मनातलं सगळं सांगितलं. बस, हीच माझी गुरुदक्षिणा !! यापुढेही जमेल तेव्हा येत राहा. पुढच्यावेळी आलास की बायको मुलांना घेऊन ये बरं.”
“हो हो… नक्कीच”
पुन्हा एकदा दत्तात्रयाने त्यांना वाकून नमस्कार केला.
“येतो मॅडम”
त्याच्या आणि मॅडम च्या डोळ्यात पाणी तरळलं होतं आणि ओठांवर स्मित . मॅडमनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला, “सुखी रहा”

— लेखन : प्रज्ञा आठल्ये. सानपाडा, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
