ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व भाषा, कला, लोकजीवन, लोकसंस्कृती यांचे अभ्यासक डॉ. सुधीर रा. देवरे यांच्या ‘आदिम तालनं संगीत’ या अहिराणी कवितासंग्रहाची (नवीन कविता समाविष्टतेसह) दुसरी आवृत्ती, या कवितांचा इंग्रजी व मराठी अनुवाद आणि ‘डंख व्यालेलं अवकाश’ या मराठी कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती अशा चार पुस्तकांचे ऑन लाईन प्रकाशन विख्यात भाषातज्ज्ञ व साहित्यिक डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते नुकतेच बँगलोरहून करण्यात आले. ही पुस्तके चेन्नई येथील ‘नोशन प्रेस प्रकाशना’तर्फे प्रसिध्द झाली आहेत. या कवितांचे इंग्रजी भाषांतर प्रा. राजीव कुलकर्णी यांनी केले आहे.
“Melodies with a Primitive Rhythm” या नावाने इंग्रजी तर ‘आदिम तालाचं संगीत’ या नावाने मराठी अशी ही पुस्तके प्रकाशित झाली असून मूळ ‘आदिम तालनं संगीत’ हा कवितासंग्रह डॉ. गणेश देवी यांनी स्वप्रस्तावनेसह बडोद्याच्या ‘भाषा केंद्रां’तून २००० साली प्रकाशित केला होता.
डॉ. गणेश देवी, पुस्तक प्रकाशन झाल्याचे ई मेलने कळवतात :-
‘‘सुहृद डॉ. सुधीर देवरे –
आपली चार पुस्तके आता तयार आहेत हे कळून मला मनापासून अतिशय संतोष वाटत आहे. या चार पुस्तकांची सॉफ्ट कॉपी मला मिळालेली असून, ही चारही पुस्तके आता अधिकृतपणे प्रकाशित झालेली आहेत असे जाहीर करताना साभिमान मला आनंद होत आहे.
‘आदिम तालनं संगीत’ या आपल्या अहिराणी काव्यसंग्रहाची दुसरी सुधारित आवृत्ती, तसेच याच संग्रहाची मराठी आणि इंग्रजी भाषांतरे, आणि ‘डंख व्यालेले अवकाश’, असे चार कवितासंग्रह, ही आपल्या साहित्यिक कारकिर्दीतील खचितच मोठी बहुमोल कामगिरी आहे. भारतीय काव्यवाड़मयामध्ये या कवितासंग्रहांना महत्त्वपूर्ण स्थान, आणि काव्यरसिकांकडून यथोचित दाद मिळेल याची मला मनोमन खात्री वाटत आहे.
मित्रवर्य, आपल्या दोघांच्या काही दशकांच्या स्नेह-कालावधीमध्ये आपण नेहमीच मला एक आपुलकीचे स्थान दिलेले आहे – कृतज्ञ! पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक अगणित शुभेच्छा !
सस्नेह,
गणेश देवी
अल्प परिचय
डॉ. सुधीर रा. देवरे, हे विद्यावाचस्पति – एम. ए. पीएच. डी. असून भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक, साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक, अहिराणी भाषा संशोधक आहेत. अहिराणी लोकसंचितावर त्यांनी विपुल लेखन केले आहे.

ते, ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक असून महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे सदस्य आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची १९ पुस्तके व ५ संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत. विविध ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत.
– देवेंद्र भुजबळ 9869584800.