“लंचग्रुप”
नेहा सोलापूरहून मुंबईला बदली घेऊन आली ती केवळ तिच्या नवऱ्याला इथल्या कंपनीत चांगली पोस्ट मिळाली म्हणून. चौसोपी घराची सवय मोडून तिला अपुऱ्या जागेत ऍडजेस्ट करायचं होतं. पाच वर्षाची लहान मुलगी- तिची पाळणाघराची, शाळेची व्यवस्था करणं तिला अवघड जात होतं. इतके दिवस सासू सासऱ्यांची सोबत होती. ते इथे नसणार. त्यांची उणीव सतत भासत होती. नवीन ब्रँच, नवीन सहकारी दडपून गेली होती ती. तिची लांबसडक वेणी, साधी सलवार आणि अंगभर कुडता. तिच्या सासू सासऱ्यानी ह्या सर्व गोष्टी सोज्वळ म्हणून वाखाणल्या होत्या त्या मुंबईत गावंढळ ठरू शकतात की काय अशी शंका तिला उगीचच सतावत होती.
पहिल्याच दिवशी रागिणी तिला भेटायला आली. तिने कॅन्टीन मधली जागा आणि वेळेसंबंधी सांगितले. अर्थातच ते लंचटाइमबद्दल होते.
मग तिने आडनाव विचारले. आडनाव विचारल ते जात काढण्यासाठी की काय ? हा विचार नेहानं झटकून टाकला.
लंचअवरमध्ये टिफिन बॉक्स उघडल्यावर बऱ्याच जणांनी नॉनव्हेज आणलेले दिसत होते. नेहानं आपल्या भाजीचा मोठ्ठा वाटा काढला.
“भरली वांगी आहेत. सर्वांनी घ्या. मी नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे मी तुमची भाजी नाही टेस्ट करत. …सॉरी हं.”
स्पष्ट, सरळ आणि साधे शब्द. भरली वांगी करायची म्हणून काल रात्रीच तिने वाटण बनवून ठेवले होते. मसालेदार वांगी. शिवाय दाण्याची खास सोलापुरी चटणी. सर्वांनी तिच्या चवदार पदार्थांचे कौतुक केले.
दुसऱ्याच दिवशी रागिणीने तिला आपल्या टेबलवर जेवायला बोलावले. एकीकडे पुटपुटत होती, “ह्या लोकांना वार नाही नि तिथी नाही ! रोज ते नॉनव्हेज. मी ओळख करून द्यायला नेलं तुला. म्हटलं तूच बघ एकदा त्यांचे डबे.”
नेहा म्हणाली, “त्यांचे अन्न आहे, त्यांची आवड आहे. असायचंच असं ग्रुपमध्ये.”
छे ! रागिणीने ऐकलं नाही. तिनं तिच्या डेस्कपाशी ओढून नेलं. आठवडाभर हे वेगळे बसून टिफिन खाणे चालले. मग दोन दिवस नेहा नव्हती. तिच्या मुलीची शाळेची ऍडमिशन ही अतिमहत्वाची बाब होती.
“गावाकडच्या मुली कशा बेरक्या बघा. लगेच रजा मिळाली.”
रागिणी हा ‘भोंगा‘ खूप ठिकाणी वाजवून आली. रागिणी आगी लावत असते, हे सर्वाना ठाऊक होते. पण कोणीतरी वरिष्ठ तिचा नातलग होता. चावले तरी, श्वान श्रीमंताघरचे असेल तर त्याला कुत्तरडं कोणी म्हणत नाही ना ! त्यामुळे रागिणीला सगळे वचकून असायचे. नेहाला सावध करायची सुद्धा कोणाची हिम्मत होत नव्हती. पण गाव सोडून इथे आलेल्या प्रशांतने ते अगदी नकळत केले.
नेहा सुट्टी संपवून आल्यावर प्रशांत आला, “नेहामॅडम तुम्ही वांगी खिलवली नि गायबच झालात ग्रुपमधून. वेगळ्या बसलात जेवायला. तुम्ही आला नाहीत तर, गेले दोन दिवस बघा रागिणीमॅडम आमच्या सोबत होत्या. त्यानी पण आणली वांगी,पण तुमची सर नाही…. तुम्ही जो मसाला टाकला होता ना, सेम माझी आई ! एक दिवस त्यांनी फिश आणलं होतं तळून ! ती मात्र रागिणी मॅडमची खास डिश.”
“रागिणीमॅडम फिश चांगलं बनवतात तर !“
“त्यांचं फिश काय, चिकन पण भारी असतय.”
“आज मी भजी घालून कढी आणली आहे. आवडेल तुम्हाला…”
“आमच्या ग्रुपमध्ये याल जेवायला तुम्ही ? भारी.” त्याच्या तोंडाला पाणी सुटलं.
“बरं होईल, उगीच बदनामी होते हो, ग्रुप तोडला अशी. रागिणी मॅडम आणि तुम्ही दोघीच बसता, हे बरं नाही..”
नेहाची ट्यूब लख्ख पेटली होती, करून घालण्याएवढी नॉनव्हेजमध्ये सराईत ही.
मला वेगळी चूल का मांडायला लावायची ? अशी चालती बोलती स्फोटके नवीन नव्हती तिला. ब्रँच नविन होती. अशी राजकारणी माणसे होती ठाऊक तिला.
स्थळ, वेळ, काळ कसलेही बंधन नसते अशा प्रवृत्तीला. पाताळयंत्रीपणा आणि निंदा नालस्ती खुबीने करण्याची हातोटी यांचा संयोग झाला की स्फोटक तयार होते !
तिनं प्युन भोईरला हाक मारली, पेढे घेऊन या म्हणाली. दोन बॉक्स पाव किलोचे. एक भोईरच्या घरी आणि एक लंचग्रुपला. एक कनवाळूपणा आणि एक व्यवहार !
दुपारी रागिणीला म्हणाली, ”चल गं, कॅन्टीनमध्ये.“ तिची वाट न बघता नेहा गेलीच. कढीचं वाटप करताना म्हणाली, “मी असलेली ऑड नाही ना वाटत तुम्हाला… ह्या विचाराने अस्वस्थ होते जराशी . पण सांभाळून घ्या हं मला. आणि हो, ऍडमिशनचं काम इतकं सहज झालं…पेढे आणलेत मी ग्रुपसाठी.”
रागिणीनं राजकारणी डाव खेळला ह्याचा उल्लेख नाही ! आजोबांची कीर्तनकारांची परंपरा होती. रागिणीबद्दल मनात कडू भावना झाली होती. पण प्रत्युत्तर देऊन द्वेष वाढला असता. क्षमा करणं अवघड होतं. क्षमेची सुरवात संयम असते. तीच तिनं केली होती. स्थिर मनाने घेतलेला तिचा हा पवित्रा म्हणूया.
“नेहा, चवदार पदार्थ मिळणार आम्हाला, आम्ही काय घेणार सांभाळून..” कदम मॅडम आपुलकीनं म्हणाल्या.
“नक्कीच. भजी घालून कढी भारी दिसतेय. माहीत नव्हती मला. माझी आई अशी नाही करत कधी.“
प्रशांतने पसंती व्यक्त केली. रागिणीच्या डोळ्यातला अंगार झेलायची नेहाची तयारी होतीच.
पेढे खाऊन लंचअवरची सांगता झाली आणि लंचग्रुप मधली नेहाची जागादेखील कायम झाली.

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
