निळा सावळा
‘कावळा म्हणे मी काळा,
पांढरा शुभ्र तो बगळा’
आजोबा आम्हाला शिकवत. परवचा झाल्यावर अशा गप्पा असायच्या. लहान भाऊ आजोबांच्या मांडीवर आणि मी आजोबांच्या शेजारी ! कावळा म्हणे मी काळा, असे सुरू केले की कावळ्यांची शाळा डोळ्यासमोर येत असे. आमच्या शहापूरच्या घराजवळ वडाचे झाड होते. संध्याकाळी कावळे खूप जमायचे. आजी सांगायची शाळा भरते त्यांची. हिरवं पान दिसत नसे झाडावर. इतके कावळे ! काळंभोर दिसायचं झाड.
अंगणात नाचत येणारा, नैवेद्य खायला येणारा कावळा एकेकटा दिसायचा. तो मात्र काळा वाटत नसे ! पेरूच्या झाडाशी नैवेद्याचे पान ठेवून ये, असे काम माझ्यासाठी असायचे लहानपणी. अंगणातले वाळवण राखायला माझीच नेमणूक असायची.
कावळा नदीवर आपले अंग साबणाने घासत बसला, तरीही काळा तो काळाच राहिला ! आजोबा ही गोष्ट नेहमी सांगत. आजोबांच्या सगळ्या गोष्टी मला आवडायच्या. कावळ्याचा काळा रंग तो घासत बसला हे मात्र मुळीच आवडत नसे. वाळवण राखताना मी कावळे निरखत असे. छान भरारी घेत एखादा कावळा आधी कौलावर, मग अंगणात यायचा. टूक टूक असं एक एक पाऊल टाकत वाळवणाच्या दिशेने आगेकूच व्हायची. ‘नीट लक्ष दे, हळूच झडप घालतो लबाड ! ‘आजी बजावत असे. वाळवणासाठी असलेली चिकवडी मी मटकावत असे, तशीच त्याला हवीशी वाटत असेल ना.
इतकी वर्षे लोटली. पण मला कुठेही कावळा दिसला,की तो शहापूरचाच आहे असं वाटतं. मला कावळे किती जगतात किंवा ते नव्वद किलोमीटर उडून कसे येतील हे प्रश्न बिनकामाचे वाटतात.
आत्ता रहाते, त्या माझ्या घराच्या खिडकीसमोर शेवग्याचे झाड आहे. उन्हात पहावा, शेवग्याच्या फांदीवर बसला की इतका सुंदर दिसतो. त्याच्या मानेचा सुंदर राखाडी रंग आणि पावडर ब्लॅक रंगाची कातळशिल्पा सारखी पिसं एकत्रितपणे मला हिरवट, निळसर जांभळी भासतात. मी त्याला निळा सावळा श्याम म्हणते. त्याचं सावध आणि तिरकं रोखून पाहणं, आपण नीट निरखलं ना, की कळतं त्याचे डोळे चमकदार काळेभोर आहेत. तसा काळा अजिबात त्याचा रंग नाही.
माझी मैत्री मात्र झाली, ह्या निळ्या सावळ्या श्यामशी अलीकडे तीन चार वर्षात. एकदा मी हॉलच्या खिडकीशी बसून काहीतरी खात होते. कबुतरांसाठी जाळी लावलेली आहे. चिमणी सहज येते. नाजुकसा लिचकूर पक्षी येतो. पण कबुतर किंवा कावळा येऊ शकत नाही.
त्या दिवशी खिडकीपाशी कावळ्याने ‘क्रे क्रे ‘केलं. “इथे जाळी आहे अरे, तिकडे ये.” मी त्याच्याशी चक्क बोलले ! मी ताटली दुसऱ्या खोलीत ठेवली, जिथे तो येऊ शकेल. त्याला मी ताटली नेताना दिसत नव्हते, पण तो बरोबर तिकडे आला. घास खाल्ला. और दोस्ती जम गयी ! एक क्या, पूरी गली बन गई दोस्त !
एकदा अशीच ताकातली पालकाची भाजी चक्क मागितली ! दहीभात तर आहेच फेवरेट. द्राक्षं,टरबुज,आंबा,पपई कावळ्यांना खूप आवडते. दोन तीन कावळे आहेत, जे रोज हक्काने सज्जामध्ये येतात. मला त्यांच्यातला फरक समजत नाही. मला नर- मादी हा फरकदेखील उमजत नाही. कॅटवॉक करत लचकत सज्जावर चालणारी कावळी असू शकेल ! अंगणात टूक टूक चालायची ती मादी असेल कदाचित.
लचकणे, मुरडणे हा स्वभाव काऊताईचाच असेल ना ? पण ते महत्वाचे नाहीच. त्यांची भाषा मात्र थोडीशी समजते. क्रे क्रे क्रे असा मोठ्याने हवेत आरडा ओरडा सुरू झाला की समजावे भूक लागली आहे. त्यांच्या पोटात कावळे ओरडू लागले आहेत.
त्यांचं ओरडणं वेगवेगळं असतं. गमतीशीर असतं. मी एकदा वड्या थाळीत थापत होते.
‘क्रीए, क्रीए‘ असा बोबडं बोलावं तसा लाडीगोडीचा आवाज आला खिडकीशी. पोळीचा घास ठेवताच, काव, काव,काव असं जोरात ओरडला. म्हणजे हे नको मला. वडीचा वास आलाय. “वडी गार व्हायला वेळ आहे रे.” असं म्हणत मी कडेची कोमटसर वडी काढून ठेवली. मग खुशीने ‘खरू, खरू‘ अशी पावती मिळाली. मऊसर असल्याने मुटूमुटू खाऊन झाली.
एका कावळ्याला आवडले की मित्र मंडळींसाठी गोड काव काव अशी मंद, मंजुळ हाकाटी असते. स्वर काव काव हाच, पण त्यात राग नसतो. खूप संख्येने येतात मग कावळे. त्यातले दोन तीन अगदी माझ्या हातून खातात. हातावर चोच न मारता, अलगद खातात. कावळ्याच्या चोचीजवळ नाजूक पिसे असतात, हे अलीकडेच त्यामुळे समजले मला.
नेमका कावळा ओळखू आला नाही तरी त्यांचा मूड असा समजतो. एक कावळा मात्र त्याच्या वेगळेपणामुळे ओळखू येतो. तो कावळ्याची टिपिकल ग्रेसफुल भरारी घेऊन येतो, खिडकीशी पंख पसरून बसतो. अजिबात आवाज करत नाही. मी काही दिले की खातो आणि उडून जातो. रोज येत नाही. त्याचं अबोल असणं आणि हक्काने थांबून रहाणं मला अचंबित करतं.
बाकी सगळे आवाज करतात. क्रॉ, क्रॉ तर कधी क्रू क्रू, कर्र कर्र असे आवाज मला इतके आवडतात. दुपारी दोन वाजता कर्र कर्र आवाज करत एखादा खिडकीशी येतो, तेव्हा काहीही चालेल पण दे, असं आर्जव असतं. चौफेर नजर ठेवत खाणं मी कौतुकाने न्याहाळते.
कावळा सावध असतो, नजर आणि कान,नाक तीक्ष्ण असतात. म्हणून त्याला लबाड म्हणत असावेत.
आता हेच बघा, चिमण्यांसाठी आणलेली बाजरी संपली की चिवचवाट करून मला वॉर्निंग देतात. खायला एका वेळी एखाद दुसरी येते. पण बाजरी संपली सांगायला घोळका येतो. ह्या लबाड चिमण्यांना फीडरमध्ये मी धान्य भरून ठेवते ते महित आहे. पण एक फुटावर मी असेन तर भुरकन उडून जातील. माझ्या हातचा घास खाणं तर दूरच !
मला संगतीला लाभलेले कावळे आणि मला दिसलेला त्यांचा जांभुळका रंग हयाबद्दल मला लिहिल्याशिवाय राहवेना. पण लिहायचा धीरही होत नव्हता. कावळा !… असे तुच्छतादर्शक आवाजात ऐकू येईल असे वाटले. पण आर. के.लक्ष्मण आठवले. आर. के.लक्ष्मण माहित नाही, असा साक्षर माणूस भारतात नसेलच. त्यांचा कावळा खूप आवडता. कावळे निरखणं आणि रेखाटणं त्यांना फार आवडायचं. हे मी वाचलेलं आठवलं आणि ह्या सावळ्यासाठी बिनधास्त लिहायचं ठरवून टाकलं.
राहते मी सिमेंटच्या जंगलातच. जी काही तुरळक झाडं उरली आहेत, त्यावर अनेक पक्षी नांदत आहेत. तग धरण्याची निसर्गाची ही चिकाटी पाहून चकित व्हायला होतं मला ! कावळा, कबुतर,चिमणी तर नेहमीचेच. पण लिचकूर, साळुंकी, बुलबुल, सनबर्ड आणि क्वचित पोपट देखील. त्यात मात्र हा निळा सावळा मला जवळचा वाटतो, तेव्हढं कोणी नाही !

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
