“एप्रिलफूल”
गेल्याच आठवड्यात ’एप्रिलफूल डे’ होता. राजरोस मस्करी करण्याचा हा दिवस. अर्थात या मस्करीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, कोणाचे नुकसान होऊ नये याची काळजी घेतली जावी असा संकेत आहे. मस्करी बरोबरीच्या व्यक्तीची केली जावी असाही अलिखित नियम आहे.
एक एप्रिल हा दिवस एप्रिलफूल करण्यासाठी, त्याचे काटेकोर पालन करण्यासाठी असतोच असतो असे लहान असताना आम्ही मानत असू. “पाठीमागे बघ केव्हढा मोठा बैल आहे.” चुकून मागे बघितलं की “एप्रिलफू sss ल”अशा आरोळ्या.
एप्रिलफू sss ल, डब्बा गुल ! असे नंतर कोरसमध्ये !
‘एप्रिलफूल’ साठी असलेल्या पोस्टची फार मजा नाही, जेवढी लहानपणी प्रत्यक्ष साजरा करण्याची होती. मी उद्या फसणार नाही असे आदल्या रात्रीच मी मनाशी पक्के ठरवून ठेवलेले असायचे. पण ते कधीच निभावले जात नसे. आदल्या रात्री चक्क एप्रिल फूलच्या धाकात असायचे मी ! आजूबाजूचे सगळ्यांनी एकमेकांना एप्रिलफूल करून झाले की आम्ही सगळेच गाफील रहात असू. दिवस संपत आला की त्या दिवसाचे महत्व विसरून जायला होत असे. मग आमच्या घरात धाकटा काका काहीतरी गंमत करत असे. पातेल्याखाली वडी ठेवली आहे. किंवा खेळायला तुझी मैत्रीण आली आहे ….प्रत्यक्षात काही नसायचेच. त्यामुळे अर्थात मी ‘फूल’ बनत असे. धाकटा काका आम्हाला मित्रासारखा होता, त्यामुळे हे ‘अलाउड’ होते. पण तो काका, त्याचा मान राखायला हवा. म्हणजे मी कधीच त्याला ‘फूल’ बनवायचे नाही ! मान आणि अपमान ह्याचे कडक नियम पाळत होतो आम्ही सगळे.
असे गंमतशीर फसवण्यात एक निरागसता होती. बालिशपणा होता. गोडवा होता.कधी कधी वाटतं, नियती फसवणूक करत असतेच ना ? जणू त्याची तयारी करण्यासाठी असतं का हे एप्रिलफूल ? मग ते बालिश तरी कसे म्हणावे ?
एप्रिलफूल म्हटल्यावर हटकून एक प्रसंग मला दर वर्षी आठवतोच. आमच्या गावात बेबी नावाची एक मुलगी विक्षिप्त म्हणून प्रसिद्ध होती. ती विक्षिप्त होती म्हणून घरात दुर्लक्षित होती, की दुर्लक्षित होती त्यामुळे ती विक्षिप्त झाली होती ? हे मी सांगू शकत नाही. चिकित्सा करण्याचे माझे ते वयच नव्हते. ती कायमच ‘फूलजी‘ म्हणून ओळखली जात असे. तिच्यासाठी एक एप्रिलची गरजच नव्हती. लक्ष वेधून घेण्यासाठी ती क्लृप्त्या करत असे म्हणत असत. पण बिचारीचे हसे होत असे हे खरे. शिक्षक शिकवताना आधीच ती हात वर करून सांगायची, ”मला शंका विचारायची आहे !” “शिकवून झालं की विचार तू, बेबी.”
मग सगळी मुलं खी खी करून हसत. असे तिचे अनेक किस्से ऐकवले जात असत.
तिला खेळताना कोणी जमेस धरत नसे. सुट्टीत आम्ही पत्ते, कॅरम खेळायचो तेव्हा तिला पार्टनर म्हणून घ्यायला कोणी तयार नसे. बिच्चारी !
माझ्याच शाळेत ती होती. कारण आमच्या खेडेगावात मुळी एकच शाळा ! आम्ही एक यत्ता कोणी पुढे असेल तरी नावानंतर ताई , दादा असे जोडायचो. त्यामुळे मी तिची ताई होते !
कॉलेजमध्ये जायला लागल्यावर आगे मागे असलो क्लासमध्ये, तरी ट्रेनमध्ये खूपदा भेटत असूच. तिची इमेज आणि परिस्थिती तशीच ! मला ती आवडायची नाही. पण थोडी समज आल्यामुळे मला तिच्याबद्दल कणव वाटू लागली होती. मला सवय आहे, मी खूपदा स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवून पहाते. मग अशी सहवेदना जागते एकाएकी. दोष म्हणा, गुण म्हणा. तिला माझा सॉफ्ट कॉर्नर समजला होता. मलाच सगळे चिडवायचे तुला का तिचा एव्हढा पुळका.

तर अशी ही बेबी, मला एकदा पूजेचं आमंत्रण द्यायला आली. आठवडाभर आधीच. मला तिच्याशी दोस्ती करायला भीती वाटायची. ट्रेनमध्ये ती वाळीत टाकल्यासारखी असायची. मोठा ग्रुप होता आमचा. कोणताही ग्रुप म्हणजे टोळीच असते एक. म्होरके मंडळी असतात. त्यांची बंधने असतात. बेबीशी दोस्ती करून मी बाहेर फेकले गेले तर ? ही सुप्त भीती होती.
पूजा आहे म्हणून मी गेले. रविवार होता, सबब तरी काय सांगणार ? गेले तर बेबी घरी नव्हती. पूजा तर नव्हतीच नव्हती. तिचा धाकटा भाऊ तिला बोलावून घेऊन आला.
“पूजा आहे म्हणालीस म्हणून मी आले .”
“पूजा नाही. आज एक एप्रिल आहे. एप्रिल फूल केलं मी तुला..”
मी अवाक होतो !
आठ दिवसांपूर्वी एक एप्रिल ही तारीख होती ? वाळीत टाकतात हिला ते चूक नाही. मी हिला सांभाळून घ्यायचा प्रयत्न करते. त्यामुळे हे नाते बरोबरीचेही ठरत नाही. विचार करत होते, बोलले काहीच नाही.
“निघते मी.”
“ मी तुझी एक चप्पल लपवून ठेवली आहे. जाशील कशी ?” तितक्यात
तिचा भाऊ म्हणाला. त्याला फारशी समज नव्हती. तो लहानच होता. तिच्या पाठीवर दोन बहिणी. त्यानंतर हा भाऊ.
चप्पल दिसत तर नव्हतीच.
“ मी सांगणारच नाही कुठे ठेवली आहे ते..” बेबीने त्याला चक्क रट्टे द्यायला सुरुवात केली. मग तो ‘ देतो’ म्हणून कबूल झाला. शेजारी हिला बोलवायला गेला तेव्हा जाताना माझी एक चप्पल घेऊन गेला होता ! ती घेऊन आला !
आयत्या वेळी असं सुचणं म्हणजे त्याचं हे टॅलेंटच म्हणायला हवं, नाही का?
शाळा संपल्यावर तर एप्रिलफूल करतच नव्हतं कोणी.तरी हे प्लॅन्ड एप्रिल फूल ! तिचा मला राग आला होता खूप. अगदी अपमानच वाटला होता तेव्हा.
पुलाखालून केवढे पाणी वाहून गेले आहे. अलिप्तपणे त्याकडे बघता येते आहे. आता वाटते, कधीतरी आपण कुरघोडी करावी असे वाटत असेल तिला. सगळ्यांच्या टिंगलीचा विषय आपण असणे हे किती केविलवाणे आहे. मीच मऊ वागत होते, मग मलाच कोपरानं खणून पाहणार ती. नाही का? किती स्वाभाविक आहे हे.
मुलं नाही का, आईवर राग काढतात. आपण हेही बघतो की कित्येकदा विकलांग माणसे त्यांच्या जोडीदारावर किंवा केयरटेकरवर डाफरतात. आपण स्वावलंबी नाहीयोत ह्या अगतिकतेमुळे विफल भावना येते. ज्या माणसाची मदत घेतो त्याच्यावरच रागवायचे, किती गैर आहे हे. पण राग काढायला आपलंच माणूस परवडतं ना !
समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून सहवेदना जाणवते आणि अलिप्तपणे राहून मीमांसा करता येते!त्यामुळे आता तिची कीव येते मला. मुळीच राग येत नाही.
तिची आठवण मात्र दर वर्षी न चुकता येते. एक एप्रिल असा साजरा होतो !

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— गजसंपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800जे

अंतर्मुख करायला लावणारा लेख. मस्तच