Homeलेखकुणीच खरे बोलत नाही !

कुणीच खरे बोलत नाही !

होय. ..
कुणीच खरे बोलत नाही हेच सत्य आहे. “सत्यमेव जयते” हे वचन न्यायालयात, सरकारी कार्यालयात भिंतीवर टांगण्यापुरते ठीक आहे. पण तिथेही सगळेच खरे बोलतात असे नाही. किंबहुना न्यायालयात शपथ घेऊन खोट्या साक्षी पुरावे दिल्या जातात. सरकारी कार्यालयात खोटी आश्वासने, खोटे अहवाल हेच ब्रीद असते, कामाचे स्वरूप असते. खरे बोलून कधीच योग्य कार्यभाग साधला जात नाही. उलट खोटे बोलून मात्र काहीही मिळवता येते. खोटी कागद पत्रे, प्रमाणपत्रे सादर करून चक्क आय ए एस अधिकारी होतात लोक. ते पूजा खेडकर प्रकरण ताजे आहे. पण त्याचे पुढे काय झाले कळत नाही.

मिडियाचे हे एक बरे आहे. तेव्हढ्या पुरतेच प्रकरण गाजवायचे. वाजवायचे. मग विसरून जायचे. तसेही कुणालाच कायद्याचा, पोलिसांचा धाक राहिलेला नाही. आपण खोटे बोलूनही सही सलामत सुटू शकतो याची खात्री वाटते सर्वांना.
आता जी मंडळी कायदे करणार, शासन चालवणार तेच विधान सभेत, लोकसभेत निवडून जाण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करतात. खोटे उत्पन्न दाखवतात. यापैकी अनेक जण अट्टल गुन्हेगार असतात. यांच्यावर केसेस चालू असतात. खटले दाखल असतात. पण आपले नियम, कायदे, व्यवस्था सर्वच असे की आहे की, तरीही ते निवडून येतात. लोकशाहीची धुरा राखणाऱ्या विधान सभेत, लोकसभेत जाऊन बसतात.vहा असा खोट्याचा बोलबाला आहे !

आपल्या दैनंदिन जीवनात देखील कोण किती खरे बोलतो ? लहान मुले बालपणीच खोटे बोलायला शिकतात. तेही आपल्या आई वडिलांकडून ! पालक घरीदारी कसे वागतात हे मुले उघड्या डोळ्यांनी बघत असतात. घरचेच सरकार खोट्या पायावर उभे असतील तर मग बाहेर बघायची गरजच काय ?

अगदी लग्न ठरवताना देखील खोटी माहिती दिली जाते एकमेकांना. आपण जे नाही मुळात, ते आहोत असे खोटे भासवले जाते. मग पुढे असली रूप समोर आले, असली चेहरे दिसायला लागले की खटके सुरू होतात संसारात. आजकाल बहुतेक संसार हे बेगडी नात्याच्या, खोट्या माहितीच्या, पोकळ आश्वासनाच्या अस्थिर पायावर उभे असतात. त्यामुळे थोडेही वादळ वारे आले की ही मुळे हादरलायला लागतात. दऱ्या निर्माण होतात.नवरा बायको, बाप लेक, बहीण भाऊ, सासू सून… कुटुंबात कुणीच कुणाशी कधीच खरे बोलत नाही. फक्त मुखवटे घालून लपंडाव सुरू असतो. ज्याला संसार निभावणे असे गोंडस नाव आपण देतो.

समाजात सारे काही सुरळीत चालू आहे असे भासविण्यासाठी हे नाटक सुरू असते प्रत्येक घरात. आमच्याकडे सगळे कसे आलवेल आहे असे बाहेर सांगणारे आपल्याशीच खोटे बोलत असतात.स्वतःलाच फसवत असतात.

शाळा कॉलेजात देखील हेच धडे गिरवले जातात. मूळ शिक्षण, अभ्यास, परिश्रम, चिंतन, मनन राहिले बाजूला. शिक्षक मुलांना शॉर्ट कट शिकवतात. उत्तराना प्रश्न विचारायचे नाहीत ही तर प्रत्येक धर्माची मूलभूत शिकवण असते. आहे ते मान्य करायचे चुपचाप. शंका घ्यायच्या नाहीत जे आधी कुणी विद्वानांनी लिहून ठेवले त्यावर. का, कशासाठी असे प्रश्न विचारायला मज्जाव. खोटा इतिहास, खोटे दाखले, खोटे नेरेटीव यातून आपला इतिहास, भूगोल निर्माण होत जातो. प्रत्येक शासक आपल्या सोयीप्रमाणे, आपल्याला हवे तोच अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करतो. कुठेही कसलीही चिकित्सा नाही. चर्चा नाही. चिरफाड नाही. विश्लेषण नाही. आम्ही सांगतो तेच सर्वांनी खरे मानायचे हा प्रत्येक शासनाचा, सत्ताधाऱ्यांचा अट्टाहास असतो.

सध्या सगळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या विनाशकारी उंबरठ्यावर उभे आहे. रशिया युक्रेन युद्धाला सुरू होऊन वर्ष उलटले आहे. त्याही बाबतीत प्रत्येक जण एक दुसऱ्यावर खोटेपणाचा आरोप करतो आहे. प्रत्येक देशाला, तेथील नागरिकांना त्यांचीच भूमिका खरी वाटते. अशा खरेखोटेपणाचा न्याय निवाडा करायचा कुणी ? प्रत्येक देशाचे हे कोर्ट, सुप्रीम कोर्ट असते न्याय द्यायला. (तिथेही किती खरे किती खोटे चालते, जे मिळते त्याला न्याय म्हणायचे का, हा प्रश्न वेगळा !). पण देशादेशातले हे वाद तंटे कुणी सोडवायचे ? त्या युनो सारख्या संस्था मूग गिळून स्वस्थ का बसल्या आहेत ? हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय काय करते आहे ? जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी, खरे खोटे, न्याय काय ते ठरविण्यासाठी काही व्यवस्था आहे का नाही ? की कुणालाही काहीही करायचे, कुणाचाही सत्यानाश करायचे बेछूट स्वातंत्र्य आहे ?

आज अवतीभवतीचे कौटुंबिक, सामाजिक वातावरण पार गढूळले आहे. राजकारण तर चिखलाने बरबटले आहे वरून खालपर्यंत. प्रामाणिकपणाला किंमत नाही. खोटे बोलून, हेराफेरी करून काहीही साध्य होते हेच आदर्श तरुण पिढीला शिकवले जाताहेत. नैतिकता फक्त पोथ्यापुराणात धूळ खात पडून आहे. आता कोणतेही सरकारी क्षेत्र, सामाजिक क्षेत्र उरले नाही जे स्वच्छ आहे. भ्रष्टाचारमुक्त आहे!गुणवत्ता दुय्यम स्थानावर. दाम करी काम हा मंत्र. घरी दारी त्यामुळे याच गोष्टी होतात. अशाच खालच्या पातळीवर चर्चा होतात. मुलेही याच खोट्या शिकवणीचा क्लास लावून तयार होतात. कामकाजाच्या ठिकाणी अशा खोटेपणाला म्यानिपयुलेशंन असे गोंडस नाव देण्यात येते. तूही खा, मी ही खातो अशी मिलीभगत सर्रास चालते. भाषणात मात्र सुरुवातीचे वंदन करताना मोठमोठी आदर्श नावे घ्याची. त्यांचे आचार विचार, आदर्श यांना कचऱ्याची टोपली दाखवून चक्क प्रेतावरचे लोणी चाटायचे ! इतकी खालची पातळी गाठली आहे लोकशाहीचे पोवाडे गाणाऱ्या राजकारणी पुढाऱ्यांनी !

आता तर आपणच वाचलेली, अभ्यासलेली पुस्तके पुन्हा तपासायची वेळ आली आहे. त्यातले खरे खोटेपण पारखायची वेळ आली आहे. लाखो रुपये खर्च करून दिमाखदार सोहळ्यात केलेल्या विवाहावेळी अग्नीला साक्षी ठेऊन आणाशपथा घेतलेली जोडपी काही वर्षातच भांडायला लागतात. हौसेने घातलेले पवित्र मंगळसूत्र गळ्यातून गायब होते फॅशनच्या नावाखाली. सात जन्म सोडा सात वर्षही एकत्र राहताना यांची दमछाक होते. आपल्याच पोटच्या पोरांची पर्वा न करता, एकमेकांना पाण्यात पाहिले जाते. एकमेकांवर खोटे, घाणेरडे आरोप करून जखमी केले जाते. जे नाते केवळ विश्वासावर, श्रद्धेवर उभे रहायचे त्यालाच सुरुंग लागतो द्वेष मत्सराचा. आई वडिलांचे हे वागणे बघून मुलांनाही प्रश्न पडतो की, खरे काय खोटे काय ? कुणावर विश्वास ठेवायचा ? कुणाकडे श्रद्धेने, आशेने बघायचे ?

आपले पूर्वज संस्काराच्या गोष्टी करायचे. त्यावरच आम्ही आयुष्य काढले, निभावले म्हणायचे. पण तेही खरे बोलत होते का ? सच्चे वागत होते का ? की तेही असाच लपंडाव खेळत होते खोट्यानाट्याचा आपल्याशी ? वर गेल्यावर आपल्या पूर्वजांना विचारले पाहिजे. पण काय खात्री आहे ते खरे बोलतील याची ? कुणाला माहीत स्वर्गात (किंवा नरकात) आजकाल सगळे खरे बोलतात की खोटे ?

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments