भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३५ वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम !
— संपादक
उध्दरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे….
एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती
तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती
अंधार दूर तो पळे,
भीमा तुझ्या जन्मामुळे…
जखडबंद पायातील साखळदंड,
तडातड तुटले तू ठोकताच दंड,
झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे…
कुजे वृक्ष तैसाच होता समाज,
हिरवी हिरवी पाने अन् तयालाच आज,
अमृताची आली फळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…
प्रसिद्ध कवी, गायक वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेबांबद्दलचे गुणगान गाताना लिहिलेल्या या ओळी किती समर्पक आहेत, याची आज प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म माता भीमाई आणि सुभेदार रामजी सकपाळ यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. शतकानुशतकापासून गावकुसाबाहेर असलेल्या तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला जागृत करून सामाजिक प्रवाहात आणून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क बाबासाहेबांनी प्राप्त करून दिला.
गळ्यात मडके आणि कंबरेला झाडू असायचा. थुंकायचे झाल्यास जमिनीवर नव्हे; तर मडक्यात थुंकायचे, चालताना रस्त्यावर पावले उमटू नयेत म्हणून अस्पृश्य समाजातील लोकांच्या कंबरेला झाडू बांधलेला असायचा. सार्वजनिक ठिकाणी, पानवठ्यावर पाणी पिण्याची तर मुभाच नव्हती. शाळेत जाऊन शिक्षण घेणे दुरापास्तच होते. इतका अनन्वित छळ स्वतःला उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या तत्कालीन वर्गाने केला होता.
जातीभेदाची उतरंड निर्माण करुन तो खालच्या जातीचा, तो वरच्या जातीचा अशी जातीभेदाची उतरंड निर्माण करुन ठेवली होती. माणूस असूनही माणसासारखे जीवन जगता येत नव्हते, त्यांचे माणूसपणच जणू नाकारले होते. मंदिरात जाण्यास मनाई होती, अशी विदारक परिस्थिती होती.
याचे चटके खुद्द बाबासाहेबांनाही बसले होते. वर्गाबाहेर बसून त्यांना शिक्षण घ्यावे लागले. पाण्याला हात लावू देत नव्हते. शिवाशीव होत होती. इतकेच काय परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतरही बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड संस्थानात त्यांना त्रास दिला गेला. त्यांचे सामान रस्त्यावर फेकून देण्यात आले. पण या सर्वावर मात करण्यासाठी कुणाला तरी जन्म घ्यावा लागतो, तो बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपाने एक महापुरुष जन्माला आला आणि त्याने हे सर्व चित्रच बदलून टाकले.
म्हणून १४ एप्रिल हा दिवस का महत्वाचा आहे, हे जाणून घेतले पाहिजे आणि लक्षातही ठेवले पाहिजे. बाबासाहेबांची जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अंधाराचे साम्राज्य जाऊन प्रकाशात आणण्याचा हा दिवस आहे. ताठ मानेने जीवन जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला तो हा दिवस. शतकानुशतकापासून गावकुसाबाहेर असलेल्या तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला सामाजिक प्रवाहात आणले बाबासाहेबांनी.
भिंतीवर त्यांचे छायाचित्र ठेवण्यासाठी ? मोबाईलमध्ये त्यांची पोस्ट ठेवण्यासाठी ? डी.जे. वाजवून वेडेवाकडे नाचण्यासाठी नाही तर १४ एप्रिल म्हणजे ताठ मानेने जीवन जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला तो दिवस, १४ एप्रिल म्हणजे केवळ तारीख नाही, तर ती आहे इतिहासाला प्रश्न विचारण्याची सुरुवात. हा दिवस म्हणजे गुलामी स्वीकारायची नाही, असा घेतलेला निर्णय. १४ एप्रिल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी डोके वर करुन चालायला शिकवलं तो हा दिवस. चौदा एप्रिल म्हणजे तो जन्म, तुम्ही माणूस म्हणून जगणं हा तुमचा अधिकार आहे, उपकार नाही.
बाबासाहेबांच्या जयंतीचा दिवस म्हणजे ज्यांचा भारतीय संविधानावर विश्वास आहे, स्वाभिमानाने जगण्याचा दिवस, गुलामी झुगारण्याचा, समाजातील लोकांचे शिक्षण, त्यांचा आवाज बुलंद करण्याचा, मतदानाचा अधिकार मिळवून दिला तो दिवस, १४ एप्रिल म्हणजे एका जातीचा दिवस नाही, संविधानावर ज्यांचा विश्वास आहे, कर्मकांड, रुढी-परंपरा नाकारून विज्ञानाची कास धरायला लावणारा हा दिवस आणि भगवान गौतम बुद्धांनी ज्या प्रतिज्ञा दिल्या त्या प्रतिज्ञांचे पालन करण्याचा दिवस. म्हणून १४ एप्रिल हा प्रत्येकाच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारा दिवस आहे. बाबासाहेब नसते तर आपण कुठे असतो, यांचे चिंतन करणारा हा दिवस आहे.
आजच्या दिवशी महाराष्ट्रातच नव्हे; तर जग भरात बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. या दिवशी शाळा, महाविद्यालयात व्याख्यान, प्रभातफेरी, गीत गायन, निबंध तसेच वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाते. शासकीय कार्यालयात अभिवादन केले जाते. अनेक मंडळाच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित करुन विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जन केले जाते. विविध उपक्रम राबवून मिरवणुका काढल्या जातात. एकूणच बाबासाहेबांचे कार्य किती महान होते. १४ एप्रिल या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे, हीच खरी त्यांना जयंती दिनी आदरांजली ठरेल.

— लेखन : शेषराव वानखेडे. गांधीनगर, गुजरात.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
