परिस्थितीला शरण जाऊ नका. कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका तुमच्यापेक्षा अनेकांची परिस्थिती वाईट आहे, तरीही ते जर प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतात, तर मी का नाही मात करु शकणार ? असा विश्वास युवक- युवतींमध्ये निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करीत असतो आणि म्हणुनच परिस्थितीपेक्षा मनस्थिती महत्त्वाची असते, हे त्यांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत असतो, असे प्रतिपादन ‘न्यूज स्टोरी टुडे’ चे संपादक तथा निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी येथे केले.
अहिल्यानगर येथील स्नेहालयाचे लोकमाध्यम या कार्यक्रमाच्या रेडिओ नगरच्या ‘नगर डायरी’ या कार्यक्रमांतर्गत आर.जे यांनी त्यांची नुकतीच मुलाखत घेतली, त्यावेळी पालक व युवकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
श्री भुजबळ पुढे म्हणाले, मुंबईत एक मुलगा दिवस भरात भीक मागायचा आणि रात्रीच्या शाळेत जाऊन शिकायचा. पुढे तो मुंबई महानगरपालिकेत अधिकारी झाला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील दारू विकणाऱ्या महिलेचा मुलगा जिल्हाधिकारी झाला. आदिवासी कुटुंबातील दोन भाऊ ज्यांच्या घरी सातवीपर्यंत लाईट नव्हती, साधा टी.व्ही.देखील नव्हता, तरीही ते आयएएस अधिकारी झाले. नगर जिल्ह्यातील ग्राम कन्या तेजस्वी सातपुते आयपीएस अधिकारी झाली.
शिक्षणाचा काहीही वारसा नसताना कुणी डॉक्टर, इंजिनीयर, उद्योजक, प्राध्यापक, कलाकार, पत्रकार झाले. परिस्थिती नसताना त्यांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःची वाट निर्माण केली. अशा या सर्व यशकथा “गगन भरारी”, “प्रेरणेचे प्रवासी”, “आम्ही अधिकारी झालो”, “समाजभूषण”, “माध्यमभूषण”, “कला साहित्य भूषण”, “संवादभूषण” या माझ्या पुस्तकांमध्ये आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून तुम्ही विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडले, जवळपास चाळीस वर्षाहून अधिक वर्ष तुम्ही माध्यम क्षेत्रात सक्रिय आहात ? त्याबद्दल काय सांगाल ? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्यामुळे मला नवव्या वर्गापासून नोकऱ्या करीत शिकावं लागलं. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी मी विक्रेता म्हणुन काम केले. त्या कामामुळे सर्व महाराष्ट्र भर फिरता आले. कसे वागायचे, बोलायचे हे शिकायला मिळाले. पण देशातील पैसा आपण परदेशात पाठवित आहोत, ही भावना अस्वस्थ करीत असे. त्यामुळे जन जागृती करता येईल, असे काम करावेसे वाटू लागले आणि म्हणुन मग मी पत्रकारितेकडे वळलो. नगर कॉलेज मध्ये शिकत असताना, नगरमधील दैनिक ‘समाचार’ मध्ये उपसंपादक कम वार्ताहर म्हणुन काम केले. पुढे पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुण्यातील दैनिक ‘केसरी’ मध्ये मी उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर साप्ताहिक ‘सह्याद्री’ मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. पुढे १ मार्च १९८६ पासून मुंबई दूरदर्शनमध्ये आधी सहाय्यक निर्माता व त्यानंतर निर्माताही झालो.
माझी १९९१ साली यूपीएससी मार्फत भारत सरकारच्या दूरदर्शन, आकाशवाणी मधील निर्मात्याच्या तीन पदांसाठी,भारतीय माहिती सेवेतील वरीष्ठ श्रेणी पदासाठी, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेचा अधिव्याख्याता आणि सहावी ऑर्डर आली ती महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्यात जिल्हा माहिती अधिकारी, वर्ग 1 म्हणुन. शेवटी साधकबाधक विचार करून अलिबाग येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदाची सूत्रे स्वीकारली. पुढे उपसंचालक आणि संचालक अशी माझी वाटचाल झाली.
प्रत्येक ठिकाणी नियमित कर्तव्ये आणि जबाबदार्या पार पाडत असतानांच शासनासाठी, समाजासाठी जे काही वेगळे, उपयुक्त करता येईल, ते ते करण्याचा प्रयत्न करीत राहिलो.
पुढे निवृत्ती नंतर, स्वतः इंग्रजी पत्रकारिता करणार्या मुलीच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या काळात ‘न्यूज स्टोरी टुडे’ हे वेब पोर्टल सुरू केले. त्यात कला, साहित्य, संस्कृती, सामाजिक, आर्थिक विकास, यश कथा, विश्व बंधुत्व आदी विषयांवर लेखन असते.
आकाशवाणीमध्ये शासनाच्या ‘दिलखुलास’ कार्यक्रमाचा अनुभव कसा आहे, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आकाशवाणीवर १६ नोव्हेंबर २००६ पासून सुरू झालेल्या दिलखुलास कार्यक्रमाच्या पहिल्या ५०० भागाचा मी टीम लीडर होतो. या कार्यक्रमात केवळ मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मुलाखती न घेता शासकीय पुरस्कार प्राप्त लेखक, कवी, खेळाडू अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या मुलाखती घेतल्याने कार्यक्रम मनोरंजक आणि विविधांगी होत असे.
माझं उपसंचालक, वृत्तविभाग हे मूळ पद सांभाळुन मी हे कामही मनापासून केले. अर्थात कार्यक्रमाच्या सुरुवातीला आकाशवाणी ऐकतेच कोण, अशी टीका होत होती. पण प्रत्येक माध्यमाची मर्यादा असते, एक शक्ती असते. मात्र रेडिओ त्याच्या वैशिष्ट्यांमुळे टिकून आहे. आणखी त्यात वैविध्य येत आहे. ज्याला ऐकायचे तो बरोबर आकाशवाणी ऐकतो, अशी त्यांनी आकाशवाणीची महती विशद केली.
आज अनेक ठिकाणी रेडिओ केंद्र सुरू झाले आहेत. पूर्वी रेडिओला भौगोलिक मर्यादा होती. आता मात्र फ्रिक्वेन्सीमुळे सीमा राहिली नाही. भारत सरकारच्या धोरणामुळे खासगी रेडिओ केंद्रे सुरू झाली. त्यातीलच आपलेही हे रेडिओ केंद्र आहे. म्हणजे रेडिओची व्याप्ती वाढली असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.
दूरदर्शनमध्ये तुम्ही काम केले, तेथे वेगवेगळे कार्यक्रम झाले, संहिता लेखन केले, त्यात तुमची सरकारी नोकरी या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा जुळवून आणल्या असा प्रश्न मुलाखतकाराने केला असता, त्यावर भुजबळ म्हणाले, मुळात गरज असते ती इच्छाशक्तीची. ‘इच्छा तेथे मार्ग’ अशी आपल्याकडे म्हण आहे. तुमच्यात इच्छा असेल तर शक्ती निर्माण होते. त्या दृष्टीने काही कल्पना सूचायला हव्यात. हे सर्व कार्यक्रम असताना शासकीय नोकरीत दैनंदिन कर्तव्य, जबाबदाऱ्या असतातच. काम चांगलं झालं, म्हणुन कुणी कौतूक करेल, याची काही हमी नसते. पण चूक झाली तर तुमची नोकरी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारी नोकरीत सांगितलं तेवढं काम करायचे, पगार मिळतो ना, मग कशाला जास्तीच्या गोष्टी करायच्या ? अशी अनेकांची मनोवृत्ती असते. खरं म्हणजे, सरकारी नोकरीत अधिकार्यांना खूप स्वातंत्र्य मिळालेलं असते. क्लार्क क्लार्कचेच काम करेल, कॅशिअर कॅशिअरचेच काम करेल, ड्रायव्हर ड्रायव्हिंगचेच काम करेल पण अधिकाऱ्यांच्या बाबतीत तसे नसते. समजा एखादा जिल्हाधिकारी येतो, त्याची नवे काही करण्याची इच्छा असते, त्याच्याकडे कल्पकता असते, म्हणून तो चांगले काम करु शकतो. अन्यथा तो आला म्हणुन सरकार आहे ती यंत्रणा बदलून देत नाही, की वर्षाचे आर्थिक बजेट वाढवून देत नाही. तरीही तो अधिकारी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी, नागरिक अशा सर्वांच्या सहकार्याने काम करीत असतो. एक व्यक्ती बदलली की सर्व चित्र बदलून जाते. हे जास्तीचे काम आहे म्हणून मी रोजचं काम कशाला करू, असे मी तर कधी म्हटलेच नाही. उलट रोजच्या जबाबदारी, कर्तव्य पार पाडावेच लागतात.
माध्यम क्षेत्रातील अनुभवांविषयी बोलताना ते म्हणाले, सरकारी माध्यमे असोत की खाजगी माध्यमे असोत, या माध्यमांतील लोकांना दिवाळी, दसरा असला की, जास्तीचे काम करावे लागते. त्यांना सुट्टीच्या दिवशी सुट्टी मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे व्यक्तिगत आवडीनिवडी, कौटुंबिक जबाबदार्या याकडे दुर्लक्ष करावे लागते. तसेच प्रसंगी पंचतारांकित हॉटेलमध्ये खायला प्यायला मिळेल, तर कठीण परिस्थितीत पाणी पिण्याची, नैसर्गिक विधी करण्याची देखील संधी मिळत नाही. माध्यम क्षेत्र ग्लॅमरस जरी असले, तरी त्यातील कष्ट, आव्हाने लक्षात घेऊनच युवकांनी या क्षेत्राकडे यावे, असे मी सांगत असतो. अन्यथा ग्लॅमरस आहे म्हणून अनेक मुलं-मुली या क्षेत्रात येतात. त्यांनी मास्टर्स कोर्स केलेले असतात. त्यांच्या पैकी कुणी वृत्तपत्रात, कुणी रेडिओ, कुणी टीव्हीमध्ये जातो. माध्यमात इतकं काम असते, हे पाहून मात्र अनेकांचा भ्रमनिरास होतो.
पुस्तकांचा विषय निघाला म्हणून विचारते, तुम्ही अकरा पुस्तके लिहिली आहेत, त्याबद्दल काय सांगाल ? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, मी ज्या परिस्थितीतून गेलो आहे, माझं एक तत्व आहे की, परिस्थितीचा बाऊ करू नका. माणसाच्या परिस्थिती पेक्षा मनःस्थिती महत्वाची आहे. परिस्थिती अनुकूल असेल, पण मनःस्थिती चांगली नसेल तर माणूस काहीही करू शकत नाही. मनःस्थिती पक्की आणि जिद्द असेल तर काहीही होऊ शकते. माझी अशी पाच पुस्तके आहेत, जसे ‘गगनभरारी’. या पुस्तकात २६ महिलांच्या यशकथा आहेत. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची सुंदर प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
या पुस्तकात एक अंध मुलगी बॅंकेत अधिकारी कशी झाली, खुद्द नगरच्या भाजी विकणाऱ्या कवयित्री – सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड, अशांच्या यशकथा त्या पुस्तकात आहे. म्हणून मी म्हणतो, परिस्थितीला बळी पडू नका, आई वडिलांना नावे ठेऊ नका, देव-परमेश्वर मानत असल्यास त्यालाही नावे ठेऊ नका, तर स्वत:वर विश्वास ठेवा, स्वतः चे उद्दिष्ट ठेवा, उद्दिष्टांसाठी जिद्दीने मेहनत करा, असा सल्ला त्यांनी युवकांना या मुलाखतीतून दिला.
‘प्रेरणेचे प्रवाशी’, आणखी एक पुस्तक ‘करिअरच्या नव्या दिशा’ या पुस्तकात ७०० पेक्षा अधिक कोर्सेसची माहिती दिलेली आहे. आपली आवड ओळखा आणि आपल्या करिअरची दिशा ठरवा, असे आपण सांगत असतो. आई-वडिलांचा आग्रह असतो की, मुलाने किंवा मुलीने डॉक्टर नाहीतर इंजिनिअर व्हावे असा आग्रह असतो. पण मुलांचा कल कशात आहे, हे लक्षात घेऊन त्यांचं करिअर त्यांना निवडू द्या. उगाच त्यांच्यावर प्रेशर आणू नका. त्यांच्या आवडीनुसार त्यांनी क्षेत्र निवडले की, त्यांनाही आनंद वाटेल आणि ते पुढे जातील. गेल्या दहा वर्षात नैराश्यातून आयआयटीमधील पहिल्या ते चौथ्या वर्षांपर्यंतच्या जवळपास ११५ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. एमबीबीएस किंवा एमडीचे शिक्षण घेणाऱ्या १२५ जणांनी गेल्या पाच वर्षांत आत्महत्या केल्या, पोलीस दलातील ४५ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला निर्देश दिले आहेत की, देशातील आत्महत्यांमध्ये युवकांच्या आत्महत्या पहिल्या क्रमांकावर असल्याने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे. दुसरे म्हणजे युवकांमध्ये ताणतणाव वाढलेला आहे आणि तिसरी बाब म्हणजे युवकयुवती व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. या सर्व बाबींचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यापुर्वी तुम्ही स्नेहालयात आला होतात, तर पूर्वीचे स्नेहालय आणि आताचे स्नेहालय यात काय बदल झाला, असे आपणास वाटते ? या प्रश्नावर बोलतांना भुजबळ म्हणाले की, वेश्या हा शब्द आज देखील चारचौघात उच्चारणे सभ्य सभ्यपणाचे समजल्या जात नाही तर चाळीस वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल ? अशा परिस्थितीत स्नेहालय सुरू करणे, ते सातत्याने चालविणे ही फार मोठी गोष्ट आहे. आज इथे काळानुरूप बदल झाले, नवीन प्रकल्प येत आहेत, नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत आणि एकंदरीतच स्नेहालय दिशादर्शक काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आता तुम्ही नगरमध्ये आलात, या शहरात काय बदल झाले असे आपणास वाटते ? या प्रश्नावर बोलताना भुजबळ म्हणाले, नगरमध्ये खूप बदल झालेले आहेत. पूर्वी म्हणजे ४० वर्षापूर्वी ‘जगातील एक खेडे’ म्हणून नगरला म्हटले जात असे. आता मात्र नगरमध्ये रस्ते झाले, फ्लायओव्हर झाले. थोडक्यात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. पूर्वी नगरपालिका होती, आता महानगरपालिका झाली. मेडिकल, इंजिनीयरिंग कॉलेज आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था सुरू झाल्या. देशातील हा महत्वाचा जिल्हा आहे. तो अशासाठी की, या जिल्ह्यात सहकारी संस्था आहेत. लष्कराच्या दृष्टीने हे महत्वाचे केंद्र आहे. रणगाडे केंद्र, व्हीआरडीइ, एमआयडीसी असा खूप बदल झाला आहे आणि होत आहे पण नगरकरांना एक आवाहन करावेसे वाटते, ते म्हणजे वाहतुकीची शिस्त पाळली पाहिजे. कारण वाहतुकीचे कोणतेही नियम, अथवा कायदे आपल्यासाठी, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तयार केले जातात. त्यामुळे दुसऱ्याच्या जीवाची सुरक्षितता तेव्हढीच पाळली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी रेडिओ नगरचे आभार मानताना त्यांनी भविष्य काळात काही योगदान द्यायचे झाल्यास, ते अवश्य देईल, अशी ग्वाही दिली.

ही मुलाखत संपन्न झाल्यावर रेडिओ नगरचे प्रमुख, जेष्ठ पत्रकार श्री भूषण देशमुख यांनी श्री भुजबळ यांचा सत्कार केला. तर भुजबळ यांनी, त्यांचे माध्यमभूषण पुस्तक भेट दिले.

.

— शब्दांकन : शेषराव वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार.
ह. मु. गांधीनगर, गुजरात
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 98694 84800
