परीक्षा पे चर्चा आणि क्रिकेट विश्वातील विक्रम हे विषय सध्या गाजत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्यांनी परीक्षांच्या मैदानावर डॉन ब्रॅडमन प्रमाणे गुणांचा (मार्कांचा) डोंगर रचला व उत्तर आयुष्यात एल आय सी सारख्या जगद्विख्यात संस्थेला जन्म दिला आणि ज्यांचा महाराष्ट्राचा कंठमणी म्हणून गौरव झाला त्या डॉ चिंतामणराव देशमुख यांचा जन्म १४ जानेवारी १८९६ रोजी झाला. त्यांच्या असामान्य कर्तृत्वामुळे त्यांना महत्त्वाचे मानसन्मान मिळाले होते. इतके मानसन्मान क्वचितच कोणाला मिळाले असतील. ब्रिटिश सरकार कडून “कम्पॅनियन ऑफ इंडियन एम्पायर” आणि नाईटहुड म्हणजे सर ही पदवी. त्याच सुमारास 1952 मध्ये त्यांना केंब्रिज विद्यापीठाची ऑनररी फेलोशिप, तसेच 1959 मध्ये असामान्य प्रशासकीय कार्य केल्याबद्दल अतिशय मानाचे असे रॅमन मॅगसेसे पारितोषिक, मग 1975 मध्ये भारत सरकारचा “पद्म विभूषण” हा पुरस्कार मिळाला आणि त्याशिवाय अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी त्यांच्यावर डॉक्टरेटसचा वर्षाव केला.
या लेखामध्ये पुढे त्यांच्या आयुष्याचा धावता आढावा घेतला आहे. त्यांच्या उत्कर्षाचे मूळ कारण म्हणजे लहानपणापासून आय सी एस होईपर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये त्यांना मिळालेले घवघवीत यश. सगळ्या परीक्षांमध्ये त्यांना सर्वोच्च गुण मिळायचे. त्यामुळे त्यांचा कायम पहिला नंबर यायचा. “झाले बहू होतील बहू परंतु या सम हा” ही उक्ती श्री देशमुख यांच्या बाबतीत सार्थ ठरते. त्या शब्दसमूहाचं इंग्लिश मध्ये भाषांतर करायचं झालं तर असं सांगता येईल की – Shri Deshmukh had no parallel and he was obviously one who was second to none. त्यावेळच्या पिढीचे ते अनुकरणीय व्यक्तिमत्व (रोल मॉडेल ) होते.
त्यांच्या आयुष्याचा विचार करता सध्याच्या परिस्थितीत देशमुखांची काही वैशिष्टयें जाणवतात. आजच्या घडीला क्रिकेटचा हंगाम चालू आहे. जुने विक्रम मोडले जात आहेत व नवीन विक्रम रचले जात आहेत, पण क्रिकेट विश्वाशी पहिले नाव जे प्रामुख्याने जोडले गेले ते डॉन ब्रॅडमन यांचे. त्याकाळी ते क्रिकेटमध्ये विक्रमादित्य होते, त्याचप्रमाणे परीक्षेतील गुणांच्या (मार्कांच्या) दुनियेत सी डी देशमुख डॉन ब्रॅडमनच होते असे म्हणायला हरकत नाही. काही उदाहरणे सांगायची म्हणजे- 1912 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत 83% गुण मिळवून देशमुखांनी पहिले येण्याचा विक्रम केला, जो पुढे अनेक वर्षे अबाधित राहिला. मॅट्रिकच्या परीक्षेत देशमुख यांनी मिळवलेल्या अलौकिक यशाने प्रभावित होऊन ज्येष्ठ नाटककार आणि कवी राम गणेश गडकरी यांनी चिंतामण रावांच्या यशाबद्दल “अभिनंदनपर वर्धापन” ही प्रदीर्घ कविता रचली आणि त्याद्वारे त्यांचे कौतुक केले आणि उपदेशही केला. असे भाग्य क्वचितच कोणाच्या वाट्याला आले असेल. या मुलाचे भविष्य उज्वल असेल, ह्याची श्री. गडकरी ह्यांना कल्पना आली असावी; म्हणून त्यांनी श्री. देशमुखांचं कौतुक करण्याकरता आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यावर कविता केली असावी असा कयास आहे. (मुंबई विद्यापीठामध्ये तेव्हा महाराष्ट्र, गुजरात, उत्तर म्हैसूर आणि सिंध प्रांतातील विद्यार्थी सुद्धा त्या परीक्षेला बसले होते. इतक्या विद्यार्थ्यांमधून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला हे विशेष.) त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या इंटरच्या परीक्षेत चिंतामणरावांनी प्रथम क्रमांक पटकावला. सांपत्तिक परिस्थिती अनुकूल नसून सुद्धा वडिलांनी कर्ज काढून चिंतामणरावांना लागू मास्तरांच्या सल्ल्याप्रमाणे पदवी करिता आणि इंडियन सिव्हिल सर्विस म्हणजे आय सी एस ची परीक्षा देण्याकरता इंग्लंडला पाठवलं. आयसीएस परीक्षेऐवजी हल्ली आयएएस ही परीक्षा घेतली जाते. श्री. देशमुख केंब्रिज युनिव्हर्सिटीचे पदवीधर होते- 1917 मध्ये ते केंब्रिज युनिव्हर्सिटीची ट्रायपॉस परीक्षा वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र आणि भूगर्भशास्त्र हे विषय घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले; तर 1918 साली इंग्लंड मध्येच ते आयसीएस ही अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी सहा हजार मार्कांची अत्यंत कठीण परीक्षा प्रथम क्रमांकाने पास झाले.
(त्या परीक्षेला दहा विषय होते आणि त्या विषयांच्या 19 प्रश्नपत्रिका होत्या, चार प्रॅक्टिकल्स सुद्धा होती. ती परीक्षा ऑगस्ट 1918 मध्ये सबंध महिनाभर चालली होती, यावरून ती परीक्षा किती कठीण होती व फक्त उत्तीर्ण होण्यासाठी सुद्धा किती कुशाग्र बुद्धीची आवश्यकता होती याची कल्पना येते).
आयसीएस परीक्षेत त्यांना 6000 मार्कांत 3520 मार्क मिळाले. परंतु , ज्याला दुसरा नंबर मिळाला होता त्याला फक्त 2780 मार्क मिळाले. पहिल्या व दुसऱ्या नंबरच्या मार्कांमध्ये 740 मार्कांचा फरक होता यावरून ते किती हुशार होते ह्याची कल्पना येते. त्यांचा आयसीएस परीक्षेमधील मार्कांचा रेकॉर्ड सुद्धा बरीच वर्षे मोडला गेला नसेल पण ती माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. 1918 मध्ये आयसीएस परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण होणे हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा महत्त्वाचा क्षण ठरला.
1918 साली लोकमान्य टिळकांचे वास्तव्य पण इंग्लंड मध्ये होते. तेव्हा आयसीएस ची परीक्षा पास झाल्यावर देशमुखांनी टिळकांची गाठ घेतली आणि मला स्वातंत्र्य लढ्यात कसा भाग घेता येईल असे त्यांना विचारले. टिळकांनी त्यांना सांगितले की हिंदुस्तानचे स्वातंत्र्य आता फार लांब नाही आणि जेव्हा आपले राष्ट्र स्वतंत्र होईल त्यावेळी राष्ट्राच्या प्रगतीकरता तुमच्या सारख्या प्रशासनाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची गरज लागेल. तेव्हा तुम्ही आय सी एस म्हणूनच काम करून प्रशासकीय कामाचा अनुभव घ्या. या भेटीवरून आपल्याला लोकमान्य टिळकांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो, तसंच देशमुखांनी लोकमान्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या हे त्यांच्या जीवनचरित्रा वरून जाणवतं.
त्यानंतर श्री देशमुखांच्या परीक्षेतील अत्युच्च गुणांबद्दल व त्यांच्या देखण्या चेहऱ्याबद्दल ज्या काही आख्यायिका सांगितल्या जात त्यांचा उल्लेख करावासा वाटतो.
1) प्रश्नपत्रिकेत जर लिहिले असेल की “खालील प्रश्नांपैकी पाच प्रश्नांची उत्तरे लिहा”, तर त्यावेळी श्री देशमुख उत्तरपत्रिकेवर लिहीत “खालील उत्तरांपैकी कोणतीही पाच उत्तरे तपासावीत” . यावरून त्यांचा स्वतःवरचा दृढ आत्मविश्वास लक्षात येतो. 2) उत्तरपत्रिका तपासून झाल्यानंतर परीक्षक त्या उत्तरपत्रिकेवर लिहायचे, “हा विद्यार्थी परीक्षकांपेक्षा हुशार आहे”.
3) श्री. देशमुखांच्या देखण्या व तेजःपुंज व्यक्तिमत्त्वामुळे अशी एक वदंता होती; ते एकदा परदेशी गेले असताना एका मोठ्या हॉटेलच्या दरवाज्याजवळ कोणाची तरी वाट पाहत उभे होते. तेव्हा हॉलिवूड मधील एक नट समोरून येत होता. त्यावेळी तो देशमुखांजवळ येऊन म्हणाला, “तुम्ही कुठल्या सिनेमात काम केले ? मी तुम्हाला आधी पाहिलेले नाही”. श्री देशमुख यांच्या अतिशय सुंदर चेहऱ्यामुळे आणि एकंदर व्यक्तिमत्त्वामुळे ते प्रसिद्ध नट असतील असा त्याचा समज झाला. श्री. देशमुखांनी स्वतःची ओळख त्याला सांगितली व त्याचा गैरसमज दूर केला.
श्री. देशमुखांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने मी पण स्तिमित झालो होतो. 1957 साली गिरगावातील आर्यन हायस्कूलचा हीरक महोत्सव साजरा झाला, तेव्हा त्यांनी संस्कृत मधून भाषण केले आणि त्यानंतर मला त्यांना अगदी जवळून पहायची संधी मिळाली आणि त्यांच्या विद्वत्तेच्या तेजाने झळाळलेला आणि प्रसन्न चेहरा पाहून मी मंत्रमुग्ध झालो. कोणी परदेशी पाहुणे पंडित नेहरूंना भेटायला यायचे तेव्हा श्री देशमुख यांची “माझ्या मंत्रिमंडळातील सर्वात देखणा मंत्री” अशी ओळख करून देत. पण आपल्याला हे माहीत आहे की पंडित नेहरू स्वतः किती देखणे होते.

जीवनामध्ये अनेक महत्वाच्या क्षेत्रात त्यांची सर्वोच्च पदावर नियुक्ती झाली आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी भरीव कामगिरी केली. भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांना ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या त्या त्यांनी केल्या. 1943 पासून 1949 पर्यंत ते रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांना कुठल्याही बँकेचा किंवा अर्थतज्ञ म्हणून पूर्वानुभव नव्हता. परंतु चिंतामणराव अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. “ब्रेटन वुड्स” परिषदेमध्ये स्थापन केलेल्या जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे वर्ल्ड बँक आणि आयएमएफ या दोन्ही संस्थांमध्ये श्री देशमुख दहा वर्षे संचालक होते आणि 1950 मध्ये त्या दोन्ही संस्थांच्या पॅरिसमध्ये भरलेल्या संयुक्त वार्षिक सभेत त्यांचे जे भाषण झाले, ते भाषण त्यांनी चक्क फ्रेंच भाषेमध्ये करून उपस्थितांमध्ये आपला आदरयुक्त दबदबा निर्माण केला.
पंतप्रधान नेहरूंनी आग्रह करून श्री. देशमुख यांना अर्थमंत्रीपद देऊ केले व देशमुखांनी त्या पदाचा स्वीकार केला आणि 1950 पासून 1956 पर्यंत अर्थमंत्री या पदावर ते होते.त्या काळात त्यांनी पहिली पंचवार्षिक योजना आखली आणि यशस्वीपणे तडीस नेली. दुसरी पंचवार्षिक योजना तयार करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. अर्थमंत्री असताना त्यांनी इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करून स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. त्याशिवाय एक अत्यंत धाडसी, क्रांतिकारी आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आणि प्रचंड गुप्तता राखून अमलात आणला तो म्हणजे आयुर्विम्याचे राष्ट्रीयीकरण (आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्याचा हा जगातला पहिलाच प्रयोग होता, म्हणून त्याचे विशेष महत्व) आणि एलआयसीची म्हणजे आयुर्विमा महामंडळाची स्थापना केली आणि त्यामुळे सामान्य विमाधारकाला विमा रकमेची हमी मिळाली आणि देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाकरता प्रचंड रक्कम कायमची आणि सतत उपलब्ध झाली. 38 वर्षांच्या प्रदीर्घ यशस्वी आणि निष्कलंक प्रशासकीय आणि राजकीय कारकीर्दीच्या शिखरावर असताना चिंतामणरावांनी लोकशाहीतील तत्त्वांची बूज राखण्याकरता अर्थमंत्री पदाचा त्याग केला
वयाच्या साठाव्या वर्षी अर्थमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर सुद्धा चिंतामणराव देशमुख यांनी अनेक पदं भूषवली आणि आपल्या उत्कृष्ट कर्तृत्वाची प्रत्येक ठिकाणी छाप पाडली. ती विविध पदं म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे पहिले अध्यक्षपद, दिल्ली विद्यापीठाचे उपकुलगुरू, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष व नॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे प्रेसिडेंट. जगातील राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी तसेच शांतता आणि सामंजस्य नांदावं अशी देशमुख यांची प्रबळ इच्छा होती. म्हणून इंडिया इंटरनॅशनल सेंटर अशी संस्था दिल्लीमध्ये स्थापन करावी असं त्यांना वाटलं; आणि तोच त्यांचा आवडता प्रकल्प (Pet Project) अथक प्रयत्नांनी त्यांनी पूर्णत्वास नेला. त्या संस्थेचे ते 1959 पासून म्हणजेच सुरुवातीपासून स्वर्गवासी होईपर्यंत म्हणजे 1982 पर्यंत संस्थापक संचालक होते.

मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषांव्यतिरिक्त चिंतामणरावांचे बंगाली, फ्रेंच तसेच जर्मन भाषांवरही प्रभुत्व होते. कामात अतिशय व्यस्त असूनही देशमुख यांनी आपले लेखन व्रत सोडले नाही आणि त्यासाठी आवर्जून वेळ काढून त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यातील काही अर्थशास्त्रावर आणि काही संस्कृत वाङ्मयावर आहेत, उदाहरणार्थ, कालिदासाच्या मेघदूताचं मराठी भाषांतर, रिफ्लेक्शन्स ऑन फायनान्स एज्युकेशन अँड कल्चर, वगैरे. त्याशिवाय “The course of my life” – “माझ्या आयुष्याची वाटचाल” हे देशमुख यांचं आत्मचरित्र 1974 साली प्रसिद्ध झालं.

देशमुखांचा आयुष्यक्रम पाहिला तर असे जाणवते की त्यांचे कर्तृत्व प्रचंड होते पण त्याच वेळी एक उमद्या स्वभावाची थोर व आदरणीय व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. याबाबतीत काही गोष्टींचा उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी काही वेळा केलेल्या वेगवेगळ्या विधानांवरून त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य लक्षात येते. त्यांना खूपजणं विचारत की—
(1) प्रत्येक परीक्षेत तुम्ही अत्त्युच्च गुण मिळवता त्याचे रहस्य काय? तेव्हा श्री देशमुख सांगत की सर्वोच्च गुण मिळवायचे हे ध्येय ठेवले व चांगली स्मरणशक्ती आणि कठोर परिश्रम ह्यांची जोड त्याला दिल्यामुळे मला परीक्षेत घवघवीत यश मिळायचे.
(2) श्री देशमुखांची प्रत्येक वेळी विविध क्षेत्रात अत्युच्चपदी नेमणूक कशी झाली? तेव्हा ते गमतीने म्हणत मी नोकऱ्यांच्या मागे लागण्याऐवजी नोकऱ्याच माझ्या मागे लागल्या.
(3) 1954 साली मी नववीत असताना अर्थमंत्री असलेल्या चिंतामणराव देशमुखांना त्यांच्या स्वाक्षरीसाठी विनंती करणारं पोस्टकार्ड पाठवलं. काही दिवसातच संस्कृत सुभाषितासह त्यांची स्वाक्षरी असलेलं पत्र मिळालं. मला सुखद धक्काच बसला. थॉमस कार्लाइलने म्हटलं आहे की “थोर व्यक्तींची थोरवी ही त्या सामान्य माणसांशी कशा वागतात यावर ठरते,” या वचनाचीच मला प्रचीति आली.
बहुतेक संस्थांच्या स्थापनेपासूनच ते प्रमुख पदी असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धती सुरू केल्या व अमलात आणल्या त्यामुळे त्या आस्थापनांनी पुढे नावलौकिक मिळवला.
त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले की भारतात या अर्थमंत्र्याने आयुर्विम्याचे राष्ट्रीयीकरण केले एवढंच पुढच्या पिढीने लक्षात ठेवलं व बाकीचं सगळं विसरलं तरी चालेल. यावरून त्यांच्या विनम्र स्वभावाची कल्पना येते. पण इतकं प्रचंड कार्य करून सुद्धा त्यांनी एल आय सी च्या स्थापनेला सर्वात जास्त महत्त्व दिले हे पण लक्षात घ्यायला पाहिजे.
शेवटी असं म्हणावंसं वाटतं की त्यावेळच्या पिढीने त्यांच्या अभूतपूर्व योगदानापासून प्रेरणा घेतली, तशीच नवीन पिढीने पण प्रेरणा घ्यावी आणि त्यांच्यासारखेच आयुष्यात उत्कृष्ट कार्य करायचे ध्येय मनासमोर ठेवावे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

— लेखन : शशिकांत गद्रे.
— संपादन:देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️9869484800
