आज 1 मे, महाराष्ट्र दिन. या निमित्ताने वाचू या महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मायमराठीबद्दलचा हा विचार प्रवर्तक लेख. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला नीट मराठी बोलता आली पाहिजे, समजली पाहिजे हा आग्रह स्वाभाविक, नैसर्गिक आहे. मातृभाषेतून शिक्षण ही मागणी देखील संयुक्तिक आहे. पण प्रत्यक्षात चित्र काय आहे ? मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडल्या आहेत. जे मराठीचा आग्रह करतात त्यांची मुले, नातवंडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच जातात. परदेशात स्थायिक होतात.
काही वर्षापूर्वी इंजिनियरिंग मेडिकल सारखे शिक्षण देखील मराठी माध्यमातून दिले जावे ही मागणी झाली. ती अंमलात आली म्हणे ! मराठी माध्यमात या अभ्यासक्रमाची किती पुस्तके लिहिल्या गेलीत, बाजारात आलीत ? अनेक वर्षापासून नेटाने चालविण्यात आलेली आमच्या हैदराबाद येथील मराठी शाळा, शिक्षण संस्था सध्या दुरावस्थेत आहे. या प्रकल्पाला मदत करावी असे मराठी प्रेमी शासनाला किंवा मराठीचा आग्रह धरणाऱ्या आंदोलक राजकीय नेत्यांना वाटत नाही.. या विरोधाभासाला तुम्ही काय म्हणाल ?
अनेक मराठी शाळांची नावे देखील इंग्रजी आहेत ! मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे नाव सी पी अँड बेरार हायस्कूल. त्यासमोर निलसिटी हायस्कूल.. शेजारी न्यू इंग्लिश हायस्कूल.. हे आजचे नाही. अनेक दशकापूर्वीचे आहे.
आपल्या महाराष्ट्रातील बँकेचे नाव सुद्धा चक्क बँक ऑफ महाराष्ट्र असे इंग्रजी आहे !!
मराठी भाषेत बातम्या देणाऱ्या वाहिन्यांची नवे देखील खिचडी म्हणजे इंग्रजी मिश्रित ! ए बी पी माझा, न्यूज 18 लोकमत, झी मराठी, साम टी व्ही, tv 9 मराठी, NDTV मराठी.. वगैरे. इथे इंग्रजी भाषा वापरत मराठीतून बातम्या दिल्या जातात. हेडलाईन्स, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह, टॉप टेन, न्यूज फ्लॅश असे अनेक इंग्रजी शब्द देवनागरीत लिहितात ! बातम्या देताना ज्या मराठी ओळी खाली येतात त्यातील शुद्धलेखन तर भयानक असते. चुकीचे टाइप केले असते. ते डुलक्या घेणाऱ्या बातम्या देणाऱ्या संपादकाच्या, निवेदिकाच्या लक्षात देखील येत नाही.
मराठी बातम्या देणाऱ्या वाहिन्यांवर निवेदक, निवेदिकाचे पोशाख देखील पाश्चात्य पद्धतीचे, अत्याधुनिक फॅशन चे असतात. आपली संस्कृती जोपासणारे पोशाख वाईट आहेत का? त्याची लाज वाटते का? कशाला पाश्चात्य संस्कृतीचा हा हव्यास ?

पु भा भावे सारखे लेखक शुद्ध मराठी लेखनासाठी आग्रही होते. स्वा सावरकरांनी तर अनेक इंग्रजी शब्दांना सुंदर पर्याय दिले. आपल्या मराठी साहित्यात, लेखनात काळानुसार अनेक बदल झाले.अनेक इंग्रजी शब्द आपण आनंदाने स्वीकारले आपले म्हणून. उदा टेबल, पेन, पोस्ट ऑफिस, रेल्वे, बस, बँक, वगैरे.. विनोदाचा भाग असा की ज्या वाहन चालकाना मराठीतच बोलले पाहिजे असा आग्रह होतो आहे त्यांच्या वाहनाचे नाव मुळी इंग्रजी आहे..(ऑटो, टॅक्सी).
तामिळनाडू या राज्यात असा मातृभाषेचा आग्रह प्रामुख्याने दिसून येतो.मी बंगाल, आंध्र प्रदेश (आता तेलंगण) या राज्यात अनेक वर्षे राहिलो. तिथे बाहेरचे असूनही आम्हाला भाषेचा त्रास फारसा जाणवला नाही. बंगाली, तेलगू चित्रपट आम्ही आवडीने बघितले. ते समजले देखील. (चित्रपटाची भाषा तशीही सहज समजते) तेलंगणात (खास करून हैदराबाद येथे) तर अनेक परप्रांतातले लोक राहतात. पण लोकल भाषा येत नाही म्हणून कुणाचे काही बिघडत नाही. कुणाचा तसा आग्रह नाही. कारण सामाजिक सुधारणा, विकास, सौहार्द, एकी याचा विचार करता बाकीच्या अनेक गोष्टी जास्त महत्वाच्या ठरतात इथे.
भाषा सुधारायची, नीट वापरायची तर त्याची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. आपण किती शुद्ध मराठी बोलतो, लिहितो, किती मराठी पुस्तकं वाचतो, मराठी नाटक, चित्रपट बघतो याचा विचार करा.आपले मराठी चित्रपट का चालत नाहीत आजकाल ? तेलगू, तमिळ चित्रपट का कोट्यवधीचा धंदा करतात ?
मराठी वाहिन्यांवरील मालिकांबद्दल तर बोलायलाच नको. तिथे अभिजात मराठी साहित्य, परंपरा याचा दुष्काळ आहे. जेव्हा की उत्तमोत्तम साहित्य मराठीत निर्माण झाले आहे. उत्तम नाट्य, चित्रपट निर्मिती झाली आहे आधी. मग ती टिकवायची कुणी ? उत्तमोत्तम मराठी मासिके का बंद पडली ? मराठी प्रकाशन व्यवसायाला अवकळा का आली ? मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच चित्रपट गृह का मिळत नाहीत ? मराठी नाट्यगृहे दुरावस्थेत का आहेत ? हे असे कळीचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत.
मराठी भाषा, संस्कृती टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने बुवाबाजी, अंधश्रद्धा या अशा चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या समाजाला विज्ञान, तंत्रज्ञानाचा अभ्यास गरजेचा आहे. आपली संस्कृती, साहित्यिक परंपरा जपणे गरजेचे आहे. आपल्या मुलांना आपल्या भाषेचा, श्रीमंत परंपरेचा सार्थ अभिमान असणे गरजेचे आहे.

युरोप सारख्या देशात केवळ एकाच, म्हणजे मातृभाषेवर भर दिला जात नाही. तर शाळेत किमान चार भाषा शिकवल्या जातात. मुले आपल्या मातृभाषे बरोबर शेजारच्या इतर देशातील भाषा शिकतात. भाषेने संवाद साधता येतो. मैत्री करता येते. माणसे एकत्र येतात ती भाषेच्या सुसंवादामुळेच. मी आय आय टी खरगपूरला असताना तेथील पोस्टमन, कर्मचाऱ्यांशी येईल तशा बंगालीत बोलत असे. त्याचा त्यांना आनंद होत असे. पण गेली अनेक वर्षे हैदराबाद येथे राहूनही मला तेलगू येत नाही.त्याने माझे काहीही बिघडले नाही.किंवा कुणाला त्याचा ताप झाला नाही.पण इतकी वर्षे इथे राहून मी इथली भाषा शिकलो नाही याची लाज मात्र निश्चित वाटते ! (महाराष्ट्राबाहेर राहून मी सातत्याने मराठीत लिहिले, लिहितो आहे, माझी ३५ पुस्तके मराठीत प्रसिद्ध झाली याचा अभिमानही वाटतो. महाराष्ट्रात राहणाऱ्या अनेक मराठी प्रेमी पेक्षा अजूनही मी बरेच मराठी साहित्य नियमित वाचतो हेही नमूद करण्यासारखे आहे!).

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
