“सावकाश गाडी चालव व नीट जा हो बिलावल”, असे म्हणून मी बिलावलला निरोप दिला. त्याच वेळेला शेजारच्या सुनिताकाकू तेथून जात होत्या. सकाळची अकराची वेळ. त्या दोन मिनिटे थांबल्या व म्हणाल्या, “हा मुलगा तुमचा नातेवाईक आहे का ? मी त्याला तुमच्या घरी दोन-तीन वेळा येताना-जाताना पाहिले आहे; म्हणून सहजच विचारते आहे. राग मानू नका हं..”मी हसून म्हटले, “अहो काकू, नातेवाईक या शब्दाचा अर्थसंकोच झालेला आहे. अजूनही जुगार खेळणारा, घोड्याच्या रेसवर पैसे लावणारा, दारू- मद्यपान करणारा, सिगारेट-बिडी ओढणारा असला तरी चालेल; पण तो जर आपला नातेवाईक- नात्यातला असला तर श्रेष्ठच असतो. परंतु एकही व्यसन नसलेली व आपल्याला मदत करणारी एखादी व्यक्ती असली, तर केवळ नातेवाईक नाही यामुळे त्याज्य ठरवला जातो. पण काकू, आपण हा विषय जरा निवांत, दुपारी चहा झाल्यानंतर बोलू यात का ? चालेल काय ?”
“होय तर..! मी तुम्हांला सहजच विचारले बागेश्रीताई. दुपारी चारच्या सुमारास जरूर बोलू या. तुम्ही माझ्या घरी चहाला आलात तर मला फार आवडेल.” आणि सुनिताकाकू निघाल्या.
चहा घेतल्यानंतर दुपारी मी म्हटले, “अजूनही, या एकविसाव्या शतकात स्त्री-पुरुष यांची निरपेक्ष मैत्री याचा फक्त विचारच केला जातो, हे पटत नाही. त्याचप्रमाणे कोणाशी कोणाचे कसे जुळेल…मैत्री या संदर्भात… हा विषयपण वेगळाच आहे.”
सुनिताकाकू म्हणाल्या, “अहो, काही वर्षांपूर्वी माझ्या मेहुण्यांचे…. सख्ख्या बहिणीचे यजमान… मला एक पत्र आले. त्यांनी लिहिले होते, “त्यांच्या सुनेचे एक ऑपरेशन करायचे आहे. तर सुनिता, आम्हाला लवकरच किमान दहा हजार रुपये पाठव. कारण आम्ही तुझे नातेवाईक आहोत.” या पत्रास मी शांतपणे उत्तर दिले, “सुरेशभाऊ, तुमच्या सुनेची प्रकृती लवकर बरी व्हावी ही इच्छा . पण मला पेन्शन नाही. थोडेफार पैसे पित्याकडून मिळालेले आहेत व त्याच्या व्याजावर माझा उदरनिर्वाह चालला आहे.”
मी मध्येच म्हटले, “जाऊ द्या काकू. भूतकाळात किती रमायचे ? बिलावल व माझा परिचय माझ्या पित्याच्या एका मित्रा मुळे, माझ्या चवथ्या पुस्तकाच्या संदर्भात झाला. नंतर आमची मैत्रीच झाली. या मैत्रीलाच पूर्ण दहा वर्षे होतील. बिलावल हा दिवसभर त्याच्या कामात असतो आणि तो चहापण घेत नाही. माझ्या कैलासवासी स्थानिक पालकांना तर या बिलावल बद्दल खूपच चांगले मत होते. त्याचप्रमाणे मला आमच्या एका हितचिंतकांनी म्हटले होते की, “बागेश्रीताई, तू तुझ्या बहिणीच्या मुलींकडेच जाऊन जयपूरला रहावेस. ते तुझे नातेवाईक आहेत किंवा पंढरपूर (गोपाळपूर) येथेपण तुझा भाचा आहे.”
सुनिताकाकू मध्येच म्हणाल्या, “अहो, असे सातत्याने दुसरीकडे राहायचे, म्हणजे तुमचे पूर्ण स्वातंत्र्य जाईल. त्याशिवाय या नातेवाईकांना समजा कधी पैशाची जरुरी लागली, तर तुम्हांला नाही म्हणणे जमणार नाही. तर आपल्याला ज्या व्यक्तीचा कोणत्याही रीतीने उपयोग होतो किंवा त्या व्यक्तीला आपला उपयोग होतो, तीच व्यक्ती आपली नातेवाईक असते.”
सुनीताकाकूंनी व मी एकदमच घड्याळाकडे पाहिले. पावणेपाच ! दोघींनाही चांगली चर्चा केल्यामुळे बरे वाटले व दोघींनीही ‘समाजातील स्त्री-पुरुष, शुद्ध मैत्री, स्वतंत्र राहणे, आत्मविश्वास, शांतचित्त या भावनांवर सर्वत्र सुधारणा लवकरात लवकर निर्माण व्हावी अशी सदिच्छा मनापासून व्यक्त केली. अन् “नंतर भेटूया” म्हणून एकमेकांचा निरोप घेतला.
सहसा कामवाल्या- घरकाम -स्वयंपाक करणाऱ्या सेविकेला दुय्यम स्थान दिले जाते. परंतु ही सेविका एखादा दिवस अनुपस्थित असली की किती अडचण होते ?… त्यामुळे तसे पाहिले तर ती सेविका आपली नातेवाईकच आहे. तिला शक्य तेवढी सौजन्याने वागणूक देण्याचा प्रयत्न करावा. तसेच वर्तमानपत्रांचे वितरण करणारे, दूध देणारे यांच्याबद्दल म्हणता येईल. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीच्या नात्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे, नाही का ?
— लेखन : जयश्री शंकरन्. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
