Homeलेखसंगती रंग : १४

संगती रंग : १४

कशिदा

शाल्मली, रेवा आणि मधुरा ह्या खास मैत्रिणी. कॉम्प्लेक्समध्ये प्रसिद्ध त्रिकूट ! रेवाची आई उत्तम कशिदा भरत असे. एवढे मोठे कॉम्प्लेक्स असले तरी, त्यामुळे रेवाची आई सर्वाना परिचित होती. लहानग्या मधुराच्या फ्रॉकवर कशिदा काढून घेण्यासाठी आई गेली. सोबत मधुरा होतीच. रेवा आणि मधुरा ह्यांची गट्टीच जमली. शाल्मली थोडी मोठी पण डान्सच्या क्लासमुळे ओळख झाली. मग हे त्रिकूट झाले. लहानपणाची खास दोस्ती. शाळा, इयत्ता वेगवेगळ्या पण सगळे खेळ एकत्र खेळलेले. सोसायटीचा गणपती असो, गॅदरिंग असो तिघींची एकत्र उपस्थिती असायची. उंची वाढत असताना जी मैत्री होते ना, ती घट्ट असते. भावंडं असावीत तसे होते हे नाते. लहानपणीचा धागा चिवट असतो.

ह्या मुली मोठ्या होत गेल्या. कॉलेजमध्ये जाऊ लागल्या. तरीही तिघींचे मेतकूट कायम. एकत्र फिरायला गेल्या असतील आणि समजा, उशीर झाला तर घरचे काळजी करत नसत. निरागस वयापासून एकत्र वाढलेल्या मैत्रिणी आता जॉब करू लागल्या. लग्नाच्या वयाच्या झाल्या.

लग्नानंतर मधुरा ऑस्ट्रेलियामध्ये गेली. तरी संपर्क होताच. मग रेवाचे लग्न ठरले. शाल्मली आता एकटीच राहिली अशी चिडवाचिडवी सुरू झाली. गंमतच होती म्हणा ती. लोकांना चिडवायला काय ! मनासारखा जोडीदार तर मिळायला हवा. त्यात शाल्मलीचं एक ब्रेकअप झालेलं. अर्थात ही काही सर्वाना माहीत असणारी गोष्ट नव्हे. जिवलग मैत्रीण असलेल्या रेवाला माहीत होते. निराश झालेल्या शाल्मलीला रेवाने त्यातून बाहेर काढलं होतं. आताही कुणी लग्नावरून चिडवलं की, रेवा ते परस्परच परतवून लावत होती.

लग्नविधी ठरवायला, बोलणी करायला रेवाकडे भटजी आले होते. दोन्ही पक्षाची मंडळी होती. मानाच्या करवल्या दोन हव्या असतात ना. करा आणि दिवा धरायला ! विवाहित चुलतबहिण होती दिवा धरण्यासाठी. करा धरायला रेवाची धाकटी बहीण रेणुका.
गुरुजी म्हणाले, “करा धरायला जी असते ना, तिचा लग्नयोग लगेच येतो बरं का !”
रेवा म्हणाली, ”मग शाल्मली येऊदे ना, करा धरायला. चालेल ? लग्नयोग लगेच यायला हवा आहे, तिचा ..”
रेवाची सासू म्हणाली,”चालेल की ! मानाचं एक पान वाढलं. त्यात काय ? बहिणीचा मान मैत्रिणीला देते आहेस. कौतुक आहे.”
आई म्हणाली, “दृष्ट न लागो, यांच्या मैत्रीला !”
“रेवापेक्षा दीड एक वर्षानं मोठी असली तर चालेल ना, गुरुजी ?”
आईनं शंका विचारली.
“म्हणजे बरोबरीचीच की ! अहो ह्या रूढी असतात.”

लग्नामध्ये रेणुकाएवढीच मिरवायला पुढे होती, शाल्मली. मेकअप, साडी नेसवणे सगळ्यासाठी ब्युटीशियन होती. तरी रेवाला साडी नेटकी करायला शाल्मलीच लागली. सगळा गेटअप झाल्यावर, “कशी दिसतेय ?” ह्याचं उत्तर रेवाला तिच्याकडूनच हवं होतं.
प्रत्येक प्रसंगाचा खास फोटो ऑस्ट्रेलियामध्ये पोचत होता. मधुरा ऑस्ट्रेलियाहून येऊ शकली नव्हती ना. तिचे सासू सासरे नेमके त्याच सुमारास तिकडे जायचे ठरले होते. मधुराची आठवण सगळेच काढत होते.
लग्नाची धामधूम संपली तरी अजून सण-वार, मिरवणे, नव्या साडीच्या घड्या मोडणे चालूच होते.

मधुरा भारतात येण्याचे ठरले. मग रेवाच्या लग्नाचा व्हिडिओ तेव्हा पाहायचा ठरलं. मोजकी माणसं आणि महत्वाचं म्हणजे हे त्रिकूट. व्हिडियो बघताना शाल्मलीला जाणवले, मैत्रिण म्हणून स्पेशल फोटो कुठेच नाही. अल्बममध्ये एखादा होता. पण तो ग्रुप मध्ये. व्हिडिओमध्ये तर शाल्मली जेव्हा जेव्हा दिसते, रेवाच्या पदराला पिन लावते आहे. तिच्या पायाशी बसून निऱ्या सारख्या करते आहे. एकदा जोडवी सरकवताना पाया पडते आहे असा भास झाला. रेवाच्या पावलांच्या मेंदीचा फोटो काढताना शाल्मलीच्या लक्षात आले की जोडवी नीट दिसत नाहीत. थांबा हं, असं म्हणत तिनं खाली वाकून जोडवी व्यवस्थित केली.

शाल्मली मुळात रेखीव आहे. तिचा एका बाजूने दिसणारा नाकेला चेहरा आणि हाताचा कमनीय आकार शूटरने टिपला आहे. मेंदीने रंगलेले पाऊल आणि नाजूक हातांनी जोडवी सारखी करतानाची इतकी मोहक हालचाल. जास्तच रेंगाळला होता त्याचा कॅमेरा.
मुळात हळवी जागा असेल तर ती लगेच दुखते. दुखऱ्या पायाला ठेच लवकर लागते, नाही का ? शाल्मली दुखावली. अपमान वाटला तिला. मी मैत्रीण की दासी ? प्रदर्शन फक्त माझ्या सेविका ह्या भूमिकेचं ? अभिमान इतका दुखावला, की जिव्हाळ्याचा धागा सैल झाला. मलिन झाला. ती अचानक उठून गेली. मधुराकडे तिनं हे शल्य व्यक्त केलं.

पदराची पिन नेमकी कुठे टोचते ते प्रिय मैत्रिणीला माहीत असते ना ! ह्यात काय वावगे आहे ?
ब्रेकअपमुळे हळवी झालेली ती, एखाद्या निमित्तावर टेकली असेल. दीड दोन वर्षं मोठी आहे, लग्न म्हटले की वय गणले जाते. त्यात लोकांनी सतत छेडले. त्यामुळे ती दुखरी जागा झाली. रेवाच्या ध्यानी मनी नसताना असे घडले मात्र खरे. मधुरा नक्कीच मध्यस्थी करेल, व्हिडिओ मधला तिला आक्षेपार्ह वाटणारा भाग एडिट करून घेता येईल, पण ते मनातून पुसले जाणार नाही.

मन म्हणजे न दिसणारा अवयव. ह्या मनामध्ये मान भारी असतो ! पण मनातलं सांगायला मनापासून प्रेम करणारी माणसं हवी असतात, मनाच्या जवळची हवी असतात. मानाची नाही…

कुठून कुठे असते नात्यांची वीण आणि वेदनेची सलदेखील ! सुईने टाका घालत कशिदा तयार होत असतो. पण अशी कधी कधी नकळत जिव्हारी लागते सुई ! रेवाच्या आईला भीती वाटत होती ती खरी ठरली .शेवटी नजर लागलीच. नात्यांचा कशिदा उसवला गेला हे खरे.
क्रमशः

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६