“एक एक पान गळायला…”
इथे काहीच कायम नसतं, सगळं सतत बदलत असतं. काही बदल हे जलद घडतात, काही बदल हळूहळू होतात. नेमकं आठवत नाही, पण एकदा कुठेतरी जंगलासारख्या भासणाऱ्या बागेच्या ठिकाणी मी गेलो होतो, तिथे झाडांची पाने सुकून सगळी खाली पडलेली होती आणि त्या पानांवरून चालत जाताना सुकलेल्या पानांचा एक विशिष्ट आवाज येत होता. सुरुवातीला छान गंमत वाटली, पण नंतर जाणीव झाली की ज्या सुकलेल्या पानांवर पाय देत आपण चालतोय ही पाने कधीतरी या झाडांवर होती. हिरवीगार होती, त्या पानांमुळे या झाडांचे सौंदर्य खुलून दिसत होते. या पानांमुळे इथला वारा गार होत होता. याच पानांमुळे खाली दाट सावली पडत होती. या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना थंड वारा आणि सावली याच पानांमुळे मिळत होती. हा विचार सुरू असताना सहज वर लक्ष गेलं आणि हे जे विचार मनात आले ते अजूनच गडद झाले. कारण आता वर ते झाड ओके-बोके दिसत होते. पाने गळून पडल्याने त्या झाडाच्या फांद्या उघड्या पडल्या होत्या. त्यातील काही फांद्या सुकून गेल्या होत्या. आता त्या सुकलेल्या फांद्या देखील तुटून खाली पडतील अशा अवस्थेत होत्या. एकंदरीत ज्या पानांवरून चालताना मला सुरुवातीला छान वाटले होते, आता मात्र मला अस्वस्थ वाटत होतं. आणि मी जपून पाऊल टाकू लागलो. ही पाने किंवा तुटून पडलेल्या सुकलेल्या फांद्यांवर मजा म्हणून पाय देताना कुठेतरी आता वेदना होऊ लागल्या होत्या.
कधीकाळी हिरवेगार भरलेले एखादे झाड जेव्हा त्याचे एक-एक पान गळायला सुरुवात होते तेव्हा त्याला काय वाटत असेल? मान्य आहे की ही पान गळती पूर्ण झाली की याच झाडाला नवीन पालवी फुटणार आहे. आज ओके-बोके दिसणारे हे झाड पुन्हा बहरणार आहे. मात्र तरीही हा जो पानगळतीचा काळ असतो तो नक्कीच वेदनादायी असतो. एकत्र असलेली ही पाने, त्या छोट्या फांद्या, ज्यांनी गार वारा दिला, सावली दिली, फळं फुलं निर्मितीमध्ये यांची मुख्य भूमिका होती. अशी ती पाने, फांद्या एकेक करून गळू लागली कायमची…
पालवी फुटेल, पण ती पाने, त्या फांद्या, दोन्ही नव्या असतील जे गळून पडले ते कायमचे गेले…
माणसाचे आयुष्य देखील काहीसे असेच असते. आपण जन्माला येतो, लहानाचे मोठे होतो, कितीतरी व्यक्ती नात्याने आपल्याला दिसतात. मग वय वाढत गेलं थोडी समज आली की त्या आपल्या जीवाभावाच्या असल्याचे आपल्या लक्षात येतं. या आजूबाजूच्या आपल्या हक्काच्या व्यक्ती आपलं सर्वस्व असतात. आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण, इतरही विविध नाती, ही सर्व नाती विविध असली तरी जिव्हाळासारखाच असतो. आपण या सर्वांवर एक सारखचं प्रेम करतो. ही मंडळी देखील सारखाच जीव लावतात, यात कमी-जास्त काही नसतं.

या नात्यात कधी-कधी काही रागलोभ होतो. तेव्हा आपल्याला वाटतं की याचं किंवा त्याचं आपल्यावर प्रेम नाही, आपल्याबद्दल कुणाला काही वाटत नाही, वगैरे वगैरे… मात्र मुळात तसं नसतं. कुठेतरी मनात खोलवर आपल्याला देखील माहित असतं की असं काही नाही. मात्र तरीही क्षणिक रागापोटी आपण कधी-कधी टोकाचे विचार करतो. आणि मग थोड्या वेळाने राग निवला की तीच व्यक्ती पुन्हा आपल्याला आठवते. आपण पुन्हा त्याच व्यक्तीशी बोलायला जातो. लहान असताना आई किंवा वडील आपल्याला काही गोष्टींना विरोध करतात, चिडतात, कधी वेळच आली तर मारतात. आजच्या सध्याच्या पिढीतील लहान मुलांना मार हा प्रकारच माहीत नाही. मात्र माझी जी पिढी आहे, जी सध्या चाळीशीच्या घरात आहे, तिला आईचा मार नक्कीच माहित आहे. जेव्हा ही आई मारायची, तेव्हा मन भरून यायचे. डोळ्यातून अश्रू बाहेर पडायचे. याचे मूळ कारण अंगावर बसणारे फटके नसायचे, तर आई आपल्याला मारते आहे ही भावना जास्त तीव्र असायची. वडील ओरडले, तर त्यांच्या त्या शब्दांमुळेच डोळ्यात पाणी यायचे. याला कारण ओरडणे नसून, वडील ओरडतायेत हा भाग जास्त वेदनादायी असायचा. मग अगदी व्यवस्थित रडून पूर्ण झाले, की हेच आई-बाबा जेव्हा चटकन जवळ घ्यायचे तेव्हा तो सगळा राग, रुसवा, हा क्षणात दूर व्हायचा. यावेळी मन अगदी हलक-हलक व्हायचं, अगदी तसंच जसं झाडावर नवी पालवी फुटते त्याप्रमाणे…
बालपण, शिक्षणाचे वय, पुढे करिअर, मग त्याबरोबर सुरू झालेला संसार, या सगळ्यात आपण गृहीत धरतो की आपल्या जिवाभावाची ही माणसं कायमच आपल्या सोबत असणार आहेत. फळा-फुलांप्रमाणे काही नवीन पाहुणे, म्हणजे आपली मुलं ही मग आपल्या घरात, आपल्या जिवाभावाच्या लोकांमध्ये दाखल होतात. सगळं कसं छान सुरू असतं. आणि मग अचानक एक-एक पान गळायला सुरुवात होते.
ऋतू बदल हा होणारच असतो. पानगळ ही अटळ असते. मात्र आपण बरेचदा त्यासाठी तयार नसतो. निसर्गचक्र कुणालाही चुकलेले नाही. मूकपणे गळणारी पाने झाडही धरून ठेवू शकत नाही. अगदी त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात काळाच्या पडद्याआड जाणारी एक-एक माणसे आपणही धरून ठेवू शकत नाही. आयुष्याच्या या पटावर कोणाचा रोल किती आहे हे कुणालाच माहीत नाही. आपली एन्ट्री सुद्धा आपल्या हातात नव्हती, आणि आपली एक्झिट ही आपल्या हातात नाही. मात्र आपल्या एन्ट्री आणि आपल्या एक्झिट यामधील आपल्या आयुष्याच्या प्रवासात ज्या व्यक्ती आपल्या हक्काच्या म्हणून आपल्याला लाभतात आपण त्यांच्यात गुंततो. जेव्हा त्यांचा रोल अचानक संपतो तेव्हा मात्र धक्का बसतो.
जन्माला आलेला संपणारच आहे, कुणीही अमरत्व घेऊन आलेलं नाही, वगैरे फिलॉसॉफी त्यावेळी कामात येत नाही. सगळं माहित असूनही, समजत असूनही, प्रत्यक्ष व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातून निघून जाते, तेव्हा मात्र ते सत्य स्वीकारणे शक्य होत नाही. त्या वेदना, ते दुःख, शब्दात व्यक्त करता येत नाही. ज्याप्रमाणे एखादा हिरवागार बरलेला वृक्ष, एकेक पान गळताना स्तब्ध मूक उभा असतो. आणि फक्त गळणारी पाने बघत असतो. आपणही एकेक सोडून जाणाऱ्या व्यक्तींच्या आठवणीच जागवू शकतो.
मृत्यूनंतर काय ? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. गळून पडलेली पाने खत निर्मिती करतात. त्यांच्याच ऊर्जेतून झाडाला नवी पालवी फुटते. अगदी त्याप्रमाणेच आयुष्यातून गेलेल्या माणसांच्या विचारातून, संस्कारातून, जिवंत व्यक्तींना पुढील पिढीसाठी जगण्याची ऊर्जा मिळते. मात्र एक नक्की, जिवाभावाची व्यक्ती अचानक निघून गेली, की जी पोकळी निर्माण होते ती खूप वेदनादायक असते.
क्रमशः

— लेखन : किरण आचार्य. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
