Homeलेखनिरोप घेईल आता श्रावण.

निरोप घेईल आता श्रावण.

आतुरतेने वाट पहात असतानाच तो अलगद अंगणात ऊभा होता. आपल्यासाठी केलेली तयारी निरखत होता. नकळत आलासुद्धा. घरा घरात सजला सुद्धा. सारी घरेदारे आसमंत श्रावणमय झाली. अंगा अंगात श्रावण भिनत गेला.
आषाढाची संततधार जरा संथावली. पानोपानी हिरव्या छटा दाखवत श्रावणपालवी नाचू लागली. कळ्या फुलांनी लता झुडपे बहरली. शेतेशिवारे हिरवी होत बाळरोपे वा-याबरोबर खेळू लागली. माळरानी तृणाचे जावळ डूलू लागले तर कडेकपारी गर्जत खळखळ निर्झर धबधबे शुभ्र रूपेरी होऊन फेसाळत खाली येऊ लागले. दरीवरून शुभ्र कापूसमेघ तरंगत जाऊ लागले. रानीवनी मोर केकारव करत नाचू लागले. मझेच ऊन सुवर्ण सांडू लागले. तर कधी अचानक अंधारून येत झिम्माड फेसाळ श्रावणसरी बरसू लागल्या. मधेच दिवसभर रिमझिम धार हट्टाने पाझरत राहिली. तलाव तळी भरली. हिरवाई नटली.

घरोघरी मंगलमय वातावरण, चकचकित देवघर अखंड नंदादिप, पूजापाठ, कहाणी कथा, मंदीरदर्शन, हळदीकूंकू, मंगळागौरी, राखी पंचमी, जिवतीपूजा यांची लगबग सुरू राहिली.
श्रावण म्हणजे शृंगाराचा राजाच. निसर्गाचा पुजारी, बळीराजाचा सखा.
श्रावण शेतात शिवारात फुलतो. मोरासंगे रानात आनंदात थुई थुई नर्तन करतो.
जाई जुईचे नाजुक कोमल गज-या सारखे रूप घेऊन कडेकपारीतून कोसळतो.
श्रावण मंदिरात देवघरात पवित्र होतो. सणाला मंगल होतो. झाडाझुडपातून लेकूरवाळा होतो.
पक्षांच्या घरट्यात नवजात चिवचिवतो. सृष्टीबरोबर आपणही चिंब भिजतो. श्रावणझुले खेळतो. माहेरी हंसतो नाचतो.
वारा पाऊस यांच्याबरोबर खट्याळ नाठाळ होतो. मेघांबरोबर द्वाड होतो. वा-याबरोबर ऊनाड होतो.
निर्झरांबरोबर मल्हार गातो. इंद्रधनूशी लपंडाव खेळतो.
सर्व चराचराला खुळावणारा मातीचा गंध, फुलांच्या सुगंधाच्या पालख्या, हिरवाईचे चैतन्य, पावसाची झिम्माड गंमत, पारिजातकाच्या राशी मोतीपोवळ्यांच्या सारे सारे घेऊन येतो. चराचराला आनंद चैतन्य वाटतो आणि आता बैलपोळा करत हळूवार निरोप घेईल.

गोविंदाची आरोळी घुमल्यावर श्रावण निघाल्याची हुरहुर लागतेच. पुढच्या वर्षी लवकर ये असं श्रावणालाही आपण सांगावे हे सुद्धा मनात येते. निरोपाचा क्षण नाहीतरी हळवाच असतो. मन हळवं होते. सृष्टीला हिरवाईचे दान देत, सजवून हा श्रावण हळूवारपणे निरोप घेईल.

— लेखन : अनुराधा जोशी. अंधेरी, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments