Homeसंस्कृतीताटी उघडा ज्ञानेश्वरा : ६

ताटी उघडा ज्ञानेश्वरा : ६

“मनाचा आरसा”

ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू ।।
अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ।।
दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा ॥
तुका म्हणे सांगों किती । जळो तयांसी संगती ।।

अवघ्या महाराष्ट्राने गाजविलेला हा तुकोबांचा अभंग. कुणाच्याही भोंदूगिरीवर प्रहार करायचा असेल, तर आपल्याला आधी तुकोबाच आठवतात. अवघ्या चार ओळींत समाजातील दांभिकतेवर त्यांनी जो प्रहार केला आहे, त्याला खरंच तोड नाही. तुकाराम महाराजांनी ज्यांच्यापासून चार हात लांब राहायला सांगितले आहे, असे हे ढोंगी साधू-बैरागी आजही गल्लोगल्ली सापडतात आणि आपण शक्य तितके त्यांच्यापासून अंतर ठेवूनच असतो ; पण स्वतःपासून कसे दूर जाणार ?

आज इंटरनेटवर हव्या त्या विषयाचे हवे ते साहित्य उपलब्ध आहे आणि हातात मोबाईल असलेला कुणीही त्यावर काही ना काही शोधत असतो. गेल्या काही वर्षांत Mental Peace (मानसिक शांतता), Meditation for anxiety (तणावासाठी ध्यान) आणि Yoga या शब्दांच्या सर्चमध्ये दरवर्षी जगभरात १५% ते २०% वाढ होत आहे. Pew Research Center च्या एका अहवालानुसार, भारतात दर ३ पैकी १ व्यक्ती कधी ना कधी योगाभ्यास करते, तर जवळपास ५०% लोक आठवड्यातून एकदा किंवा त्याहून अधिक वेळा ध्यान (Meditation) करतात.

आता हे सगळे खरे मानायचे तर आत्तापर्यंत जगात बऱ्यापैकी शांतता प्रस्थापित व्हायला हवी होती; डिप्रेशन आणि नैराश्य घटायला हवे होते. पण प्रत्यक्षात याच्या उलट चालले आहे. दहा-बारा वर्षांची मुले आत्महत्या करत आहेत. बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे आणि त्यांच्या गुन्ह्यांची तीव्रताही! कोणत्याही महामारीपेक्षा ताणतणावातून उद्भवणारे विकार सर्वाधिक बळी घेत आहेत. असे का ?

कारण एकच – कळते पण वळत नाही! आपण सामान्य माणसे मुद्दाम खोटे वागत नाही. मालिकेतल्या खलनायकासारखा सतत कटकारस्थानात रमणारा किंवा स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना वापरून घेणारा एखादाच असतो. ही चलाखी सगळ्यांना जमत नाही. लोकांना चांगले वागायचे असते, चांगले बोलायचे असते; पण जमत नाही !

वरी भगवा झाला नामें । अंतरीं वश्य केला कामें ॥
त्याला म्हणूं नये साधू । जगीं विटंबना बाधू ॥

सत्य-असत्य, चांगले-वाईट कळते आहे, पण स्वतःवर ताबा राहत नाही. ‘जा, केले तुला माफ!’ असे म्हणणे सोपे असते, पण आतला जाळ स्वस्थ बसू देत नाही. खूप काही चांगले ऐकले आहे, मनापासून अंगीकारायचे ठरवले आहे; पण जमत नाही. परिस्थितीचे चटके बसताच आपला ‘पॉपकॉर्न’ होतो—नुसतेच तडतड उडणे आणि नकळत दुसऱ्याच कुणाचा तरी घास होणे! जगातील सगळे सुविचार एकीकडे आणि दुःख, राग, आवेग दुसरीकडे… या विषम पारड्यात आपण झुलत राहतो; जगाच्या आणि स्वतःच्याही नजरेत दोषी ठरतो.

कारण परिस्थितीवश काहीही केले, तरी मनातील सद्भावना त्याला मान्यता देत नाही. ही पश्चात्तापाची भावना इतकी प्रबळ असते की मूळ घटना बाजूला राहते आणि आपणच आपल्याला पोळून काढतो, स्वतःला हरवून बसतो… तेव्हा पुन्हा मुक्ताईंची आठवण काढावी लागते.

आपआपणा शोधून घ्यावें । विवेक नांदे त्याच्या सवें ॥

जेव्हा बाहेरचे सगळे दरवाजे बंद भासतात, तेव्हा थोडे थांबून आत डोकावायला हवे. जगाला न्यायासनावर बसवून दाद मागत राहिलो, तर आयुष्यभर भटकत राहू. त्यापेक्षा जरा थांबून आपला विवेक जागवायला हवा. मला नेमके काय हवे आहे? आणि तिथे जाणारे सर्वाधिक शुद्ध मार्ग कोणते? याचा शोध घ्यायला हवा… त्या यात्रेवर सर्वस्व त्यागून मार्गस्थ व्हायला हवे. उगाच छातीवर बिल्ले नकोत की मनात उद्याचे इमले नकोत; जे येईल ते स्वीकारत जायचे…

आशा दंभ अवघें आवरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

आपण प्रयत्न करत राहायचे… बाहेरून नाही, आतून ! वाट कधीतरी आपसूकच प्रकाशमान होईल…!
क्रमशः

— लेखन : सृष्टी गुजराथी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments