हळुवार हाताळ जरा
ते चित्र दिव्य देवतांचे
ह्या सीतेने काढलेले
एकनिष्ठ श्रीरामाचे
हळुवार हाताळ जरा
ते चित्रशिल्प हृदयाचे
हदयापासून काढलेले
माझ्या लाडक्या हृदयाचे
हळुवार हाताळ जरा
ते चित्र बोलक्या गवाक्षाचे
तू एकटा बाहेर जाताना
दिलेल्या गोड चुंबनाचे
हळूवार हाताळ जरा
ते चित्र खट्याळ दर्पणाचे
मी आरशात डोकावताना
तू चोरून न्याहाळतानाचे
हळूवार हाताळ जरा
ते चित्र मयुर पंखाचे
असता मी उदास उदास
तू अलवार फिरवतानाचे
हळुवार हाताळ जरा
हे प्रेम सात्विकतेचे
तू मनात कोरलेल्या
तुझ्या प्रेम देवतेचे
हळूवार हाताळ जरा
पान न पान कवितांचे
तुझ्यासाठीच लिहिलेल्या
मोजक्याच रचनांचे
– रचना : सुचिता कुलकर्णी, मीरा रोड
छान
सुकू (सुचिता कुलकर्णी )
किती कमी कविता पण सगळ्याच सुंदर
मला गर्व वाटतो तुझा .असेच लिहित रहा.
अप्रतिम रचना आहे👌🏻👌🏻
खरोखर अशी किती चित्रे, जपून ठेवावीत…मनात…आणि हळूवार हाताळावीत… मोरपीसांसारखी
चौथे कडवे फार तरल आणि सुंदर!
मनापासून आभार इतक्या सुंदर रचनेसाठी 🙏🏻
खूपच भावस्पर्शी कविता