शिवुर्जा प्रतिष्ठान पैठण यांच्यामार्फत दरमहा दिव्यांगांसाठी जंगल, दुर्ग भटकंतीचे आयोजन केले जाते. रविवारी राज्यातील वीस दिव्यांग बांधवांनी मनमाडजवळील अनकाई टनकाई या जोड किल्ल्याची भ्रमंती केली.
पुराणकथेत, रामायणात उल्लेख असलेला अनकाई हा किल्ला अगस्ती ऋषींच्या वास्तव्याने पुनित झालेला आहे. गडाची उंची सुमारे 3100 फुट असून गडावरील एका गुहेत अगस्ती ऋषींचे मंदीर आहे. गडावर पाण्याचे तलाव, गोड पाण्याचे बंदिस्त टाके, वाड्यांचे अवशेष आहेत. अनकाई किल्ला उभ्या कातळात असून त्यास भक्कम तटबंदी आहे.हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या अनकाई किल्ल्यावर देवगिरीचे यादव राजे तसेच मोगल सम्राट शहाजहान, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे व पुढे इंग्रजांनी राज्य केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. आठव्या शतकात कोरलेल्या लेण्यांचा समुह येथे पाहायला मिळतो. एका गुहेत दुर्गामातेची मुर्ती, महादेवाची पिंड कोरलेली आहे.
इथली लेणी मुंबईतील घारापुरी लेणीशी साधर्म्य सांगणारी आहे. जैन व शैव लेण्यांचा मिलाफ अनकाईत पाहायला मिळतो.
शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वात शनिवारी अंधारातच मोहीमेत सहभागी असलेल्या दिव्यांगांनी अंकाई किल्ला सर केला. बीडचे दुर्ग अभ्यासक कचरू चांभारे यांनी अगस्ती ऋषी मंदीरात गडाची ऐतिहासिक, धार्मिक व भौगोलिक माहिती सांगितली. अनकाईचे स्थानिक तरूण मुलेही चर्चेत सहभागी झाली होती. रात्रीचे वन सहभोजन करून सर्वांनी सीतागुहेत मुक्काम केला. रविवारी दुपारपर्यंत गडावरील सर्व ठिकाणे पाहून परतीचा प्रवास सुरू केला.
दरी खोरे, तीव्र चढउताराचे खाचखळगे एकमेकांच्या मदतीने पार करत, सुरक्षितपणे ही मोहीम पार पडली. सहभागी दिव्यांगांना शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे व सचिव कचरू चांभारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
मोहीमेत केशव भांगरे अकोले, रमेश गाडे, वैजनाथ देवळकर- बीड, मच्छिंद्र थोरात- घोडनदी शिरूर, कैलास दुरगुडे- पिंपरी चिंचवड, अंजली प्रधान-नाशिक, अतुल पाटील, सोमनाथ- धुळे, विवेक गुंड- सोलापूर, आदित्य निकुंभ- कोपरगाव, जीवन टोपे, सतिश अळकुटे-पुणे, अनंतराव धुळशेट्टे, शाखा अभियंता सचिन गुडे- लातूर, काजल कांबळे, शबाना आझाद पखाली, विकास प्रधान यांचा समावेश होता.
अगस्ती ऋषी मंदीराचे मुख्य पुजारी माऊली महाराज, माजी पं.स.सदस्य डॉ.सुधीर जाधव, शाम व्यापारी, शांताराम राऊत, लखन व्यापारी, शेख अकबर, विजूभाऊ या स्थानिक मान्यवरांसह वैभव, सिद्धेश्वर, केशव, जीवन, संकेत या शाळकरी मुलांनी दिव्यांग बांधवांना खूप सहकार्य केले.
– टीम एनएसटी, 9869484800