बातमीदारी करतानाच्या मागच्या भागात, मंत्रीमहोदय “गंगा पवित्र है, प्रदूषित हो ही नही सकती” असं चुकीचं, अशास्त्रीय, बोलताहेत या विषयी लिहिलं. संसदेच्या मंचावर ते वेडगळ निवेदन करीत होते. राज्यसभा सभापती जस्टीस हमीद हिदायतुल्ला यांच्या सारख्या विद्वानानी आडून आडून सूचित करूनही ती ‘हिंट’ देखील घेत नव्हते. हे मला खूप हास्यास्पद वाटलं होतंच. परंतु याविषयी माझ्या सारख्या बातमीदाराने पुनः काही लिहायचे असेल तर माझ्या हातात काहीतरी भरघोस ठोस पुरावा असला पाहिजे याचे भान मला होते.
त्यानुसानुर दिल्लीपासून दूर वाराणसीला, थोडे वेगळ्या प्रकारचे मी धाडस केले, त्याबद्दल आज.
गंगा नदीचे पाणी प्रदूषित आहे का, ते पाणी प्यायल्या मुळे लोकांना आरोग्याचे प्रश्न भोगावे लागतात का ? मंत्री महोदय म्हणतात ते खरे आहे की नाही ? याविषयी कुणीतरी अधिकृत व्यक्तीने किंवा अधिकाऱ्याने मला सांगणे आणि त्यावर मी लिहिणे आवश्यक होतं. याविषयीची माहिती घेण्यासाठी मी वाराणसीच्या प्रमुख डॉक्टर्सना भेटलो. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वाराणसीच्या अध्यक्षांची सविस्तर मुलाखत घेतली. शहरातले ऐशी टक्के नागरिक पाण्यातून उद्भवणाऱ्या रोगांचे रुग्ण आहेत असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तपशील दिला.
या सगळ्यांच्या नावाचा आणि त्यांच्या हुद्यासहित उल्लेख करीत आणखी एक लेख मी लिहिला. त्यात “गंगा इज पोल्युटेड , गंगा प्रदूषित आहेच” (Ganga is polluted” )असे ठासून सांगणारे डॉक्टर्स यांचा उल्लेख केलेली बातमी होती. ती देखील प्रसिद्ध झाली. राज्यसभेत पुढल्या आठवड्यात पुन्हा एकदा गदारोळ झाला. पुन्हा एकदा मंत्री महोदयांनी आपला हेका कायम ठेवला. “गंगा पवित्र है, वह प्रदूषित हो ही नही सकती’! एव्हाना मंत्री महोदयांचे पितळ पुरेसे उघडे पाडले होते. वर्तमानपत्रात पुरेसे हसे झाले होते. आणखी काही करणे आवश्यक नव्हते. तरीसुद्धा आणखी एक मुद्दा अचानक सुचला. त्याचा पाठपुरावा करायला सुरुवात केली.
वाराणसीच्या मेडिकल कॉलेजच्या ग्रंथालयात जाऊन जर्नल चाळत बसलो. दीड दोन तासाच्या मेहनतीनंतर ब्रिटिश मेडिकल कौन्सिलचे जर्नल पाहत असताना वाराणसीच्या नदीच्या पाण्याविषयीचा एक पेपर मिळाला. ब्रिटिश संशोधकांनी वाराणसीच्या गंगा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी पाण्याचे नमुने घेऊन प्रदूषणाचे टेबल्स प्रकाशित केले होते. त्यावर आधारित निष्कर्ष मांडले होते.
प्रदूषणाची पातळी कुठे, किती आहे, हे मांडले होते. मग पुन्हा एकदा सविस्तर आकडेवारी सकट प्रदूषणाची पातळी किती आहे याविषयी पुरावे असलेला लेख लिहू शकलो. पुन्हा एकदा या विषयावर मंत्र्यांना उघडे पाडणारे पुरावे प्रसिद्ध झाले. बातम्या आणि लेख छापून आले. राज्यसभेत हल्लकल्लोळ माजला. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी सभागृहात होत्या. त्यांनी चर्चेत हस्तक्षेप करत गंगा नदीच्या प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी बनारस हिंदू विश्वविद्यापीठाला केंद्र सरकार तीन कोटी रुपयाचे अनुदान देत आहे अशी घोषणा केली. तोपर्यंत असे प्रदूषणासंबधीचे संशोधन केंद्र अथवा राज्य सरकार यापैकी कोणीही असे काही केलेच नव्हते !
स्वाभाविकपणे इंदिरा गांधी यांच्या या घोषणेला दुसऱ्या दिवशी मोठी प्रसिद्धी मिळाली. वाराणसीच्या दैनिकात तर पहिल्या पानावर आठ कॉलमी हेडलाईन झाली. माझ्या पत्रकारितेच्या वाटचालीत हा एक मोठा सन्मान माझा झाला होता.
माझ्या संपादकांनी माझ्या पाठपुराव्याच्या जिद्दीचे सविस्तर कौतुक करीत टेलिप्रिंटरवर संदेश पाठवला. शंभर रुपयाचे पारितोषिक जाहीर केले.
त्यानंतर काही दिवसांनी वडिलांचा नाशिक येथे मृत्यू झाला आणि कौटुंबिक कारण्यासाठी मला वाराणसी सोडून नाशिकला सहकुटुंब कायमचे जावे लागले.
नाशिकला आमचे यु एन आय चे कार्यालय नव्हते. मला नाशिकला राहून महाराष्ट्रात गरज असेल तेथे कव्हरेजला पाठवा. हे शक्य नसेल तर मी त्यागपत्र देऊन नाशिकला दुसरी नोकरी बघतो असं कळवलं.
आमचे जनरल मॅनेजर आणि मुख्य संपादक, जी जी मिरचंदानी अतिशय सहृदय आणि सहकाऱ्याना प्रोत्साहन देणारे असे गृहस्थ होते. त्यांनी माझी विनंती मान्य करून माझी रोविंग कॉरेस्पॉटड (Roving Correspondent फिरता बातमीदार) म्हणून माझी एक वर्षासाठी बदली केली. सिनिअर वार्ताहराची अशा प्रकारची नियुक्ती भारतीय वृत्तसंस्थेच्या इतिहासात तेव्हा आणि त्यानंतरही आजतागायत माझी एकट्याचीच झालेली आहे. त्यामागे गंगा प्रदूषणाच्या बातम्यांमागील माझी कल्पकता आणि मेहेनत होती हे देखील त्यांनी लिहिलं होतं.
वाराणसीच्या पत्रकार मित्रांनी मला निरोप देण्यासाठी छोटासा समारंभ आयोजित केला. अशावेळी कौतुकाचे, निरोपाचे शब्द वापरायचे असतात ते बहुतेकांनी वापरलेच. त्यातील एकाने ‘ठाकूरजी बडे कर्मठ पत्रकार है’ असा गौरव केला . ‘कर्मठ ‘ म्हणजे काहीतरी नकारात्मक असावे असा माझा समज झाला. एका ज्येष्ठ पत्रकाराला अर्थ विचारला तर तुमचे कौतुकच करत आहेत, चांगलं बोलत आहेत असं त्यांनी सांगितलं.
दुसर्या एकाने किरण ठाकूर बाहेरगावचे असून देखील म्हणजे वाराणसीचे नसून देखील त्यांनी शहरासाठी बातम्या आणि लेख लिहिले आणि मुख्य म्हणजे तीन कोटी रुपयाचा संशोधन प्रकल्प आपल्या साठी खेचून आणला याचा ठळकपणे उल्लेख केला. माझ्या दृष्टीने हे कौतुक महत्त्वाचे होते.
वाराणसी सोडल्यानंतर या गोष्टी मी विसरणे क्रमप्राप्त होते. इंदिरा गांधी यांच्या नंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांनी एकदा अचानक या तीन कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या पाठपुरावा केला. आपले सरकार प्रदूषण हटवण्यासाठी कटिबद्ध आहे हे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर पी व्ही नरसिंहराव, डॉ मनमोहन सिंग, आणि अटल बिहारी वाजपेयी यासारखे कर्तबगार पंतप्रधान होऊन गेले. प्रत्येकाने आपण काही करू असे आश्वासन त्या त्या वेळी दिले. पण फार काहीच घडले नाही.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली तेव्हा सगळ्यांच्याच आशा पल्लवित झाल्या. ते तर वाराणसी मतदार संघाचे प्रतिनिधित्व लोकसभेत करत आहेत. त्यांना दृष्टी आहे, क्षमता आहे आणि निधी चा प्रश्न नाही असा सगळ्यांचाच विश्वास आहे. पण त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अद्याप तरी काम पूर्ण झालेले नाही. त्यांचा कार्यकाल संपेपर्यंत किंवा ते प्रधानमंत्रीपद सोडेपर्यंत ही आश्वासने पूर्ण शकतील का हा प्रश्न आहे.

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
खूप चांगले विवेचन.मी पूर कव्हर करायला वाराणसीला गेलो होतो;तेंव्हा तेंव्हाच्या आमदार चंद्रा त्रिपाठींसमवेत गंगेच्या पात्रातून प्रवासाचा योग आला होता.तहान लागल्याने पाणी मिळेल का असे विचारता त्यांनी गंगामैयाका पानी पिओ असादिलेला सल्ला मी नाकारला होता,त्याचा संबधित बातमीत उल्लेखही केला होता,त्याची आठवण झाली.असेच सातत्याने लिहिते राहा.धन्यवाद.सुरेशचंद्र पाध्ये